21 March 2017

दुधीचे लाडू (Bottle Gourd Laddu)

No comments :

सहसा दुधीची भाजी  म्हटले की नाक मुरडले जाते. आवडीने खाल्ली जात नाही. परंतु दुधी प्रकृतीला थंड भाजी आहे. ह्रदयरोगासारख्या आहारात रूग्णाला दुधीचे सेवन करण्यास सांगितले जाते. अतिशय गुणी भाजी आहे. तर याच दुधीचे मस्त हिरवट पोपटी रंगाचे पौष्टीक लाडू केले तर खूप आवडीने खाल्ले जातात. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ताजा व  कोवळा दुधी मध्यम आकाराचा १
* साखर किसाच्या निम्मी
* वेलचीपूड
* डेडिकेटेड कोकोनट २-३ टेस्पून
* खरबूज बिया किंवा काजूचे तुकडे

कृती :-
प्रथम दुधी धुवून साल काढून घ्यावा. नंतर मधला पांढरा भाग काढून किसणीने किसून घ्यावा.

आता किस चाळणीवर पांच मिनिट ठेवावा व न दाबता सहज जेवढे पाणी निघून जाईल तेवढे जाऊ द्यावे.

आता नाँनस्टीक पँनमधे किस व साखर मिसळून मंद आचेवरच शिजायला ठेवावे. मधून मधून हलवत रहावे. साखर विरघळली की पाच मिनिट झाकून ठेवावे.

आता पांच मिनिटानंतर झाकण काढावे. किस मऊ झाला असेल. आता त्यात वेलचीपूड घालावी व शिल्लक असलेला पाक आटेपर्यत हलवत रहावे.

मिश्रणाचा ओलावा जाऊन गोळा व्हायला लागले की गँस बंद करावा. पँन खाली घेऊन त्यामधे डेडिकेटेड कोकोनट घालून एकजीव करावे. मिश्रण जर सैल वाटले तर अजून थोडे डेडिकेटेड कोकोनट घालावे.

आता मिश्रण हातात घेण्यासारखे  थंड झाले की,  वरून काजू तुकडा लावून लहान-लहान लाडू वळावेत.

मस्त हिरवट पोपटी अशा आकर्षक रंगाचे पौष्टीक लाडू तयार. वरून आवडत असेल तर चांदीचा वर्ख लावून सजवावे.

दिसायला आकर्षक असे हे लाडू दिसताच क्षणी तोंडात टाकले जातात. तसेच घरी कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा कोणाकडे जाताना न्यायला हे लाडू सोईचे होतात व चांगलेही दिसतात. तुम्हीही करून बघा, नक्की आवडतील.

टिप्स :
* डेडिकेटेड कोकोनट ऐवजी मिल्क पावङर घेतली तरी चालते. थोड़ी वेगळी चव येते.
* आवडत असेल तर हिरवा रंग गडद येण्यापुरते आकर्षक पणा साठी, दोन थेंब हिरवा लिक्विड फूड कलर मिसळावा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment