Showing posts with label Raita. Show all posts
Showing posts with label Raita. Show all posts

18 May 2016

कोबी-काकडी रायता (Raita)

No comments :

रोजच्या जेवणात नुसती पोळी-भाजी खाण्यपेक्षा जोडीला लोणचे, कोशिंबिर, रायते असे पदार्थ ताटात डाव्या बाजूला असले की,जेवणाची लज्जत आणखी वाढते. तसेच हे पदार्थ रोज जेवणात असावेतच. म्हणून मी आज फ्रिजमधे शिल्लक होते त्या भाज्या घेऊन झटपट रायते केले. कसे पहा साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* काकडी एक बारीक कोचून
* कोबी चिरून 1वाटी
* एक लाल टोमँटो चिरून
* कांदा 1 बारीक चिरून
* डाळींबाचे दाणे मूठभर
* कोथंबिर चिरून
* हिरवी मिरची बारीक चिरून 1
* मीठ व साखर चविनुसार
* ताजे घट्ट दही 4 टेस्पून

कृति:-

एक बाउल घ्या. त्यामधे वरील चिरलेले सर्व साहीत्य घाला.

चविला मीठ व साखर घाला.

शेवटी ऐत्यावेळी दही घाला.

सर्व व्यवस्थित हलवा.
जेवताना ताटात डाव्या बाजूला वाढा. लाल, हिरवे, पांढरे अशी रंगसंगती खूप छान दिसते व लहान मुले सुध्दा आवडीने खातात. तूम्हीही करून बघा. 

टीप: आपल्या जवळ जे साहीत्य उपलब्ध असेल ते व आपल्या आवडीच्या प्रमाणात घ्या

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 December 2015

वांग्याचे भरीत ( Brinjal Raita)

No comments :

वांग्याचे भरीत हा पदार्थ फार पुर्वीपासून केला जाणारा जुनाच व सर्वाना माहीत असणारा पदार्थ आहे. फक्त प्रत्येक प्रांतानुसार किंवा आवडीनुसार करण्याची पध्दत निरनिराळी आहे.
कुठे भरीतात दही घातले जाते तर कुठे दाण्याचे कुट किंवा काही घरात नुसते भाजलेल्या वांग्याचा गर,मीठ,मिरची फोडणी घालून केले जाते . आज मी माझ्या घरात ज्या पध्दतिचे आवडते व केले जाते, त्याची साहित्य व कृती सांगते,

साहित्य :-
* मोठ भरताचे वांग १ नग
* लाल टोमँटो मध्यम २
* मोठा कांदा १
* लसूण पाकळ्या ६-७
* हिरवी मिरची २-४ किंवा आवडीनुसार
* कोथंबिर
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हळद, हिंग, मोहरी फोडणीसाठी
* तेल २ टेस्पून

कृती :-

प्रथम वांगे स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करावे व थोडे तेल चोळावे. मंद गँसवर जाळी ठेउन सर्व बाजूनी व्यवस्थित भाजावे.

वांगे भाजेपर्यंत कांदा, टोमँटो, लसूण, मिरची व कोथंबिर बारीक चिरून घ्यावे.

आता भाजलेले वांगे गार झालेले असेल तर अलगद हाताने सर्व साल सोलून काढावे व गार पाण्याने स्वच्छ धुवावे. म्हणजे भाजलेली काळी साल पुर्णपणे निघून जाईल.

आता धुतलेले वांगे चाँपिंग बोर्डवर ठेवून सुरीने कापावे व नंतर बाउलमधे ठेउन मँशरने अथवा हाताने मँश करावे.

नंतर तेल गरम करून हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी. फोडणीमधे कांदा (थोडा कच्चा गरात मिसळा),लसूण मिरची घालून परतावे. कांदा मऊ झाला की, चिरलेला टोमँटो घालावा व परतून मऊ झाला की लाल मिरचीपूड, मीठ व चिमूटभर साखर घालावी. शेवटी वांग्याचा गर व थोडी कोथंबिर घालावी व  सर्व नीट एकजीव करावे, पाण्याचा हबका मारावा व झाकून एक वाफ आणावी.

तयार भरीत बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर घालावी. गरमा-गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खावे. अतिशय रूचकर लागते. आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 September 2015

पौष्टिक सलाद (Healthy Salad )

No comments :

नेहमीच आहारात कच्या भाज्या, मोड आलेली कडधान्य असावीत असे म्हणतात .पण या धकाधकीत कुठे सगळे रोज करणे व खाणे जमते ? तर हे सर्व  व झटपट कसे करून  पोटात जाईल ते बघा .

साहीत्य :-

* मूग मोड आलेले
* पातीचा कांदा
* कोबी
* टमाटा
* बीट
* एखादी बारीक चिरून हिरवी मिरची
* कोथिबिर
* लिंबू
* मीठ
* चाट मसाला

कृती :-

वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून , बारीक चिरून घ्याव्यात.

एका बाऊलमधे चिरलेले सर्व साहीत्य व मूग घ्या .त्यावर मीठ, लिंबू, चाट मसाला घाला व हलवा.शक्यतो ऐत्यावेळी मीठ लिंबू मसाला घाला.

जेवताना घ्या किवा आधीच जरी भुक लागल्यावर डिश मधे घेऊन खा किवा सकाळच्या नाष्ट्यात घ्या. यावरच संध्याकाळचे वेळी थोडा चिवडा किवा बारीक शेव घालून मुलांना दिले तरी भेळेसारखेपण होते.

भाज्या घरात असतातच .फक्त हिरवे मूग दोन-तीन दिवसातून मोड आणून ठेवा फ्रिजमधे ! केव्हाही खाता येते व पौष्टीक होते.

ज्या काही उपलब्ध असतील त्या भाज्या आपल्या आवडीच्या प्रमाणात घ्या. फक्त घेताना शक्यतो  रोज आलटून पालटून भाज्या घ्या. म्हणजे एक दिवस कोबी तर उद्या त्याजागी काकडी, टोमॅटो आज तर उद्या गाजर, कांदापात/ पालक , लेट्यूस सिमला एकूण काय तर थोडी रंगसंगती व सर्वच आलटून पालटून पोटात जाईल इकडे थोडे लक्ष द्या.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

पडवळचे भरीत (Snake Gourd Rayata)

No comments :

पडवळ ही एक वेल वर्गीय फळ भाजी आहे. बहुतेक सर्वांच्या परिचयाची आहे. पडवळ हे ह्रदयासाठी उत्तम टाँनिक आहे. कमी कँलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी सुध्दा खातात. पडवळाची पाने, रस व बियासुध्दा विविध तक्रारीवर उपयुक्त आहेत. सामान्यपणे आपण पडवळाची भाजीच करणे पसंत करतो पण, भरीत म्हणजेच रायते सुध्दा रूचकर लागते. पडवळाचे भरीत हा एक पारंपरिक पदार्थ आहे. कसा केला साहीत्य व कृती :-

साहीत्य :-

* पडवळ पाव किलो
* ताजे दही अर्धी वाटी
* चविनुसार मीठ व साखर
* फोडणीसाठी तेल व फोडणी साहीत्य
* हिरवी मिरची एखादी
* कोथंबिर

कृती :-

सर्वात आधि पडवळ स्वच्छ धुवून, चिरून त्याच्या मधील गर व बिया काढून टाका. (बियांची वेगळी चटणी होउ शकते) मोठे -मोठे एक एक इंचाचे तुकडे करून घ्या.

केलेली तुकडे कुकरमधे वाफवून घ्या. शक्यतो डाळ -भाताच्या कुकर सोबत वेगळ्या डब्यात वाफवले तरी चालते .

वाफवलेले तुकडे थंड झाल्यावर हाताने कुस्करावेत व त्यामधे दही, मीठ, साखर घालावे.

आता कढल्यात तेल गरम करून हींग, जिरे,  मोहरी व थोड़ी हळद घालून फोडणी करा. फोडणीमधेच मिरचीचे तुकडे घाला. फोडणी थंड होऊ दे.

आता थंड झालेली फोडणी तयार भरीतावर घालावी. वरून बारीक चिरलेली कोथंबिर घालून सर्व एकत्रित व्यवस्थित हलवा.

चटकदार तयार भरीत जेवणात डाव्या बाजूला वाढावे. जेवणाची लज्जत वाढवते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

31 March 2015

आंबे डाळ/ कैरी डाळ ( Mango Dal)

No comments :

उन्हाळ्याची चाहूल लागली की मला थंडगार वाळ्याचं माठातलं पाणी, कैरीचं गारेगार पन्हं, चमचमीत आंबा डाळ, कैरी बारीक चिरून केलेलं तात्पुरतं ताज लोणचं, हे लहाणपणीचे सर्व आठवू लागते.चैत्र लागला की,चैत्रातले हळदी-कुंकू एखाद्या मंगळवारी ,शुक्रवारी केले जाते. तेव्हा खास कैरीचे पन्हे व आंबा डाळ करतात. अतिशय रूचकर लागते.अशी आंबेडाळ किवा डाळीची कोशिंबीर कशी करायची व साहीत्य काय ते पहा.

साहीत्य :-

1) चणाडाळ, 2 वाट्या (2-3 तास भिजवलेली) 2) मध्यम एक कैरी साल काढून किसून,
3) हिरव्या मिरच्या 2-3
4) मीठ साखर चवीनुसार, 
5) बारीक चिरलेली कोथिंबीर,
6) रिफाईंड तेल, मोहरी ,जिरे, हळद, हिंग,मेथीदाणे फोडणीसाठी, दोन लाल सुक्‍या मिरच्या. कडीपत्ता

कृती:-

प्रथम भिजवलेली डाळ जाडसर कुटावी. खलबत्यात कुटली तर जास्त चांगली होते.रद्दा होत नाही.नाहीतर आजकाल मिक्सर मधे करतातच पण अवल-चवल अशी भरड ठेवा.
कुटताना पाव चमचा जिरे,मीठ,मिरची व साखर सर्व घालून कुटावे. म्हणजे नीट मिक्सही होते.

नंतर त्यात किसलेली कैरी व कोथिंबीर घालून नीट कालवून घ्यावी.

आता तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे,मेथी, हिंग, लाल मिरच्या,कडीपत्ता घालून फोडणी करावी. शेवटी हळद थोडी जास्त घालावी.
ही फोडणी गार करून डाळीत मिसळावी व डाळ नीट कालवून घ्यावी.

सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरावी. ही डाळ जेवणात पण कोशिंबीर म्हणून वाढता येते व नुसतीसुध्दा बशीत घेऊन खातात.परंतू चना डाळ पचायला जड असते व त्यात आंबे डाळ कच्चीच असते.त्यामुळे आपले प्रकृतीमान संभाळून खावी.

टीप:-कैरीचा आंबटपणा पाहून प्रमाण कमी-जास्त करावे.

ही माझी रेसिपी २ मे २०१५ महाराष्ट्र टाइम्स, च्या,"चख दे " या  सदरा खाली प्रसिद्ध झाली होती.


 

23 September 2014

लाल भोपळ्याचे भरीत(Pumpkin Raita)

No comments :

साहित्य:-
* लाल भोपळ्याच्या छोट्या फोडी (साल काढून)
* हिरव्या मिरच्याचे तूकडे
* कोथिंबीर, बारीक चिरून
* तेल २ टेबलस्पून
* मोहरी ,जीरे हळद,हिंग
* घट्ट दही जरूरीइतके
* चवीनुसार मीठ, साखर

कृति:-
प्रथम भोपळ्याच्या साल काढून केलेल्या फोडी कूकरमध्ये थोडेसे पाणी शिंपडून उकडून घ्याव्यात.

थंड झाल्यावर बाउलमधे काढून चमच्याने मॅश करून घ्याव्यात.

 नंतर त्यावर ,पळीमधे तेल गरम करावे. मोहरी जीरे आणि हळद, हिंग,मिरची घालून फोडणी करून  घालावी. कोथंबिर व चवीनुसार मीठ आणि साखर घालावी.

जेवायच्या ऐनवेळेला दही घालून छान मिक्स करावे. आधीपासून घातले तर पाणी सुटते. 

टीप:-
भरीत उपवासासाठी करायचे असेल तर ,फोडणीमधे मोहरी ,हींग व हळद घालू नये.फक्त जीरे व मिरची वापरावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.