Showing posts with label Burfi. Show all posts
Showing posts with label Burfi. Show all posts

21 September 2018

बेसन बर्फी ( Besan Burfi)

No comments :

घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल अथवा स्वताला कांही गोड खाण्याची इच्छा झाली तर घरातील उपलब्ध साहीत्यात ही बेसन बर्फी पटकन् करता येते. तसेच चविलाही उत्तम लागते. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बेसन १ कप (१०० ग्रँम)
* साखर १/२ कप ( ७५ ग्रँम)
* तूप १/४ कप ( ५० ग्रँम)
* बदाम, पिस्ता काप
* वेलची पूड

कृती :-
प्रथम पॅनमधे तूप घालून त्यावर बेसनपीठ घालावे व छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.भाजल्यावर थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून ठेवावे.

आता त्याच पँनमधे साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.पाक एकतारी किंवा दोनतारी असा कोणताही नको, तर फक्त साखर विरघळून बोटाला चिकट लागण्याइतपतच म्हणजे एकतारीच्याही अलिकडचा झाला की गँस बंद करावा.त्यामधे वेलचीपूड घालावी व दोन मिनिट थंड करावा.

आता तयार पाकामधे भाजून ठेवलेले बेसनपीठ घालून सर्व मिश्रण एकत्र हलवावे. गँस बंदच असावा.  मिश्रण घट्ट व्हायला लागते. नंतर आधीच तूप लावून ठेवलेल्या थाळीत मिश्रण ओतावे. वरून बदाम, पिस्ता लावावे व मिश्रण पंधरा मिनिट थंड होऊ द्यावे.

आता सुरीने आडव्या उभ्या, लाईन्स मारून ठेवावे.नंतर अजून पंधरा मिनिटानंतर पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.

टिप्स :-
* भाजलेले बेसन व पाक दोन्हीही गरम असेल तर बर्फी कडक होते. म्हणून दोन्हीही साधारण गार करून मगच एकत्र करावे.
* प्रमाणापेक्षा जास्त तूप घातल्यास बर्फी खूपच मऊ लिबलिबीत होते.
* बेसन छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.   अन्यथा चवीला पीठ पीठ लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या.आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

11 January 2018

तिळाची कुरकुरीत वडी (Crispy Til Burfi)

No comments :
संक्रांत, भोगी म्हटले की, गुळपोळी, तिळ-गुळाच्या वड्या, तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी असे पदार्थ केले जातात. हे उष्ण पदार्थ असतात. तिळामधे शरीराला आवश्यक स्निग्धांश असतात. यांच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते. म्हणून थंडी मधेे असे पदार्थ केले जातात. तिळाच्या पारंपारिक मऊ वड्या, लाडू आपण करतोच. आज मी तिळाच्या कुरकुरीत वड्या केल्या. अगदी कमीत-कमी व मोजके साहित्य लागते व पट्कन होतात. कशा केल्या साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तिळ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ ऐच्छिक
* काजू, बदाम काप ऐच्छिक
कृती :-
प्रथम तिळ स्वच्छ निवडून चाळून ध्यावेत. पोळपाट- लाटण्याला तूपाचा हात चोळून घ्यावा.
प्रार्थमिक तयारी केल्यावर आता गँसवर कढई ठेवून मंद आचेवर तिळ भाजून घ्यावेत. जास्त भाजू नयेत.,कडू लागतात.
आता तिळ ताटात काढून त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप पातळ झाले साखर घालावी.  मंद आचेवरच साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,गँस बंद करून लगेच भाजलेले तिळ, ड्रायफ्रूट्सचे पातळ काप घालावेत व सर्व साहित्य झटपट एकत्र करावे.
आता मिश्रणाचा तयार गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर काढावा व गरम असतानाच हवे त्या जाडीची (शक्यतो पातळच) पोळी लाटावी. चाकूने रेषा पाडाव्यात. ही वडी लगेचच सुकते. म्हणून सर्व कृती झटपट करावी.
आता मस्त कुरकुरीत वड्या काढाव्यात व हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. महीनाभर सुध्दा छान कुरकुरीत रहातात.
तुम्हीही अशा पध्दतीने वड्या करून बघा. नक्की आवडतील.
टिप :
* तिळ तांबूस रंगाचे वापरावेत. पांढरे पाँलीशचे नको. तांबूस तिळ चविला अधिक खमंग असतात. मी तेच वापरलेत.
* साखरे ऐवजी गुळ वापरला तरी चालतो. परंतु गुळ नुसता विरघळून न घेता त्याचा गोळीबंद पाक करावा. 
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.



06 October 2017

सात कप वडी (Seven Cup Burfi)

No comments :

'सात कप वडी ' हा एक पारंपरिक मिठाईचा पदार्थ आहे. पौष्टीक व झटपट होणारा आहे. पारंपारिक प्रकारामध्ये फक्त एकूण साहित्य सात कप असते. म्हणून सात कप वडी नांव पडले. परंतु मी थोडा बदल करून मिल्क पावडर व सुकामेव्याची पावडर घेऊन टोटल सात पदार्थ घेऊन सात कप मिश्रण केले व थोडी अधिक पौष्टीक करण्याचा प्रयत्न केला व छान यशस्वी झाला. कशी केली साहित्य व कृती -

साहित्य :-
* बेसन पीठ १ कप
* ओलं खोबरं १ कप
* तूप १ कप
* दूध १ कप
* मिल्क पावडर १/२ कप
* ड्रायफ्रूट भरड १/२ कप
* साखर २ कप

कृती :-
प्रथम सर्व साहित्य मापाने मोजून काढून घ्यावे. नंतर नाँनस्टीक पँनमधे डाळीचे पीठ साधारण म्हणजे कच्चेपणा जाण्याइतपत भाजून घ्यावे.

नंतर तूप, दूध, ओलं खोबरं, साखर घालून ढवळत रहावे. साखर विरघळली की ड्रायफ्रूट पावडर व मिल्क पावडर घालावी.

सर्व साहित्य गोळा होईपर्यंत ढवळत रहावे. कडेने तूप सुटून एकत्र गोळा तयार झाला की तूप लावलेल्या ताटात काढावे  व हाताने किंवा वाटीने थापावे. आवडत असल्यास वरून बदाम पिस्ता काप लावावेत. मिश्रण थंड झाले की वड्या कापाव्यात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

09 February 2017

गुळ पापडी (Gul Papadi)

No comments :

"गुळ पापडी" हा पारंपारिक व पौष्टीक असा गोड पदार्थ आहे. वाढत्या वयाच्या मुलांना भुक लागते व सततच येता-जाता तोंडात टाकायला कांहीतरी हवे असते. तर ही घरच्या-घरी उपलब्ध सामग्रीतून पौष्टीक "गुळ पापडी" बनवून ठेवली तर सोयीचे होते. तसेच ही बरेच दिवस टीकू शकते. कशी बनवायची साहित्य व कृती-

साहित्य :-
° गव्हाचे पीठ २ कप
° गुळ १ कप
° तूप 3/४ कप
° जायफळ, वेलचीपूङ १ टीस्पून
° ड्रायफ्रूट्स काप ऐच्छीक

कृती :-
प्रथम एका जाड बुडाच्या कढईत गव्हाचे पीठ भाजण्यासाठी घालावे. थोडे भाजले की परतत परतच थोडे - थोडे तूप घालत रहावे. सतत हलवत रहावे. बेसन लाडूच्या पिठाप्रमाणे पातळ झाले पाहीजे. तोपर्यंत तूप घालत रहावे. गुलाबी तांबूस रंग आला व खमंग वास सुटला की पीठ भाजले समजावे.

नंतर भाजलेल्या पीठामधे चिरलेला गुळ घालावा व हलवावे. गुळ विरघळला की लगेच गँस बंद करावा व तयार मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतावे. वाटीने एकसारखे पसरवून हलकेच थापावे. गरम असतानाच चाकूने आडव्या -उभ्या रेषा मारून ठेवा.

आता १० मिनिटानंतर थंड झालेल्या खुसखूषीत वड्या काढून डब्यात भरून ठेवा. आपण व मुलं येता-जाता खाऊन फडशा पाडा. किंवा मुलांना छोट्या डब्याच्या सुट्टीसाठी द्या.

टिप :- गव्हाचे पीठ थोडे मोटसर दळलेले असेल तर अधिक उत्तम!

तूप घालण्यामधे अजिबात कंजूसी नको. गव्हाच्या पीठाला भरपूर तूप लागते.

जर मऊ वड्या हव्या असतील तर भाजलेले पीठ पाच मिनीटे गार होऊ द्यावे, फार गार नको.गूळ विरघळण्यासाठी थोडा गरम हवा.एकदम गरम पिठात गूळ घातला की वडी कडक होते. मला स्वतःला कडक आवडते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

15 December 2016

बाँम्बे-कराची हलवा (Bombay-Karachi Halawa)

No comments :
"बाँम्बे -कराची हलवा " हा सिंधी मिठाईचा एक प्रकार आहे. साधारण जेलीसारखा दिसतो व लुसलू़शित पण chewy असा अाहे. मिठाईच्या दुकानात खूप आकर्षकरीत्या अशी ही रंगी -बिरंगी मिठाई सजवून ठेवलेली असते. फार गोडही नाही. सणासुदीला किंवा पाहुणे येणार असतील तर करायला सोपी अन् दिसायला छान दिसते. कशी केली, साहित्य व कृती-
साहित्य :-
* काँर्नफ्लोअर १/२ कप (measuring cup)
* पाणी १ १/२ कप
इतर-
* साखर १ १/२ कप
* पाणी १ कप
* लिंबू रस १ टीस्पून
* तूप ४ टेस्पून
* फूडकलर आवडीचा कोणताही, ४-५ थेब
* वेलचीपूड
* काजू -बदाम काप १ टेस्पून

कृती :-
प्रथम एका नाँनस्टीक पँनमधे साखर व पाणी एकत्र करून, लहान गँसवर ठेऊन द्या. साखर विरघळे पर्यंत मधे -मधे हलवत रहा.
तोपर्यंत एका बाऊलमधे काँर्नफ्लोअर घ्यावे व त्यामधे दीड वाटी पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. गुठळ्या अजिबात राहू देऊ नयेत.

आता साखर विरघळली असेल तर त्यामधे ही तयार काँर्नफ्लोअर पेस्ट घालावी व सतत हलवत रहावे. तळापासून हलवावे. खाली लागण्याची शक्यता असते.

पांच मिनिटानी मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल तर त्यामधे लिटेस्पून व रंगही घालावा व हलवत रहावे. ५-५ मिनिटानी हलवत हलवतच १-१ चमचा तूप घालावे. असे २० मिनिटे सतत हलवत रहावे.

आता मिश्रण पारदर्शी दिसू लागलेले असते. आताच त्यामधे काजू-बदामचे काप व वेलचीपूड घालावी. एकत्र सर्व हलवावे व असेल तर शक्यतो काचेच्या ट्रेमधे किंवा कोणत्याही ट्रेमधे तूपाचा हात चोळावा व तयार मिश्रण त्यावर ओतावे. वरून थोडे काजू -बदाम काप पेरावेत व मिश्रण १५ मिनिट गार होऊ द्यावे.
थंड झाले की बोट लावून पहावे. रबरासारखे मऊ लागते हाताला. नंतर तयार मिश्रणाच्या सुरीने कापून वड्या काढाव्यात.

या रंगीत वड्या खूप आकर्षक दिसतात तसेच इतर मिठाईच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

टिप :-
* काँर्नफ्लोअर पेस्ट तयार करताना अजिबात गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर हलवा व्यवस्थित होत नाही.

* साखर फक्त विरघळवायची आहे. कोणताही एकतारी, दोनतारी पाक करायचा नाही.

* तूप दिलेल्या प्रमाणातच घालावे. कोणतीही तडजोड नको.

* सर्वात महत्वाचे दिलेल्या प्रमाणातच सर्व साहित्य मोजून घ्यावे.

* ही पाककृती करताना पूर्णपणे मंद गँसवर करावी. वाढवू नये.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

09 July 2016

गुलकंद बर्फी (Gulakand Burfi)

No comments :

गुलकंदाचे,गुलकंद लस्सी, गुलकंद फालुदा असे बरेच प्रकार करतात. शरिरात उष्णता वाढली असेल तर गुलकंद व दूध घेतले जाते. अशा गुणी गुलकंदाची मी बर्फी केली, साहित्य व कृती,

साहित्य :-
* गुलकंद १/२ वाटी
* साखर १ १/२ वाटी
* ओले खोबरे खवून २ वाट्या
* मिल्क पावडर १/४ वाटी
* तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी

कृति :-

प्रथम एक जाड बुडाची कढई किंवा पातेले घ्या व साखर, खोबरं एकत्र करून शिजत ठेवा. तळाला लागणार नाही याची काळजी घेउन सतत हलवत रहा.

नंतर मध्यावर आले की,गुलकंद मिसळा व हलवत रहा.

आता मिश्रण कडेने सुटायला लागले व  गोळा झाले की मिल्क पावडर घालून हलवा व तूप लावलेल्या ताटात गोळा काढा.

वाटीने किंवा प्लास्टिक कागद वर घालून हाताने मिश्रण थापून सारखे करा. वर सुरीने आडव्या -उभ्या रेषा मारून ठेवा.

गार झाल्यावर वड्या काढा. गुलकंद बर्फी खूप सुंदर चवीची  लागते. तूम्हीही करून बघा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 December 2015

बीटाची बर्फी ( Beetroot Burfi)

No comments :

बीट हे एक रसाळ कंद आहे. गडद लाल-किरमिजी रंग असतो व आतून एकदम लालभडक असते. बीटापासून खाद्यरंग तयार केला जातो. साॅस, सरबते, जेलि, आईस्क्रीम इत्यादी मधे वापरतात. तसेच बीटामधे आयर्न भरपूर प्रमाणात असते.बीट रोजच्या आहारात वापरल्यास शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. शक्तिवर्धक व रक्तवर्धक आहे. बीटमधे नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते.तरीसूध्दा कॅलरीज कमी असतात. पाश्चिमात्य देशात बीटापासून साखर तयार केली जाते.बीटाला तशी काही स्वताची अशी खास चव नसते.काहीसे गोडसर लागते. मात्र याचा रंगच अधिक मोहक असतो. बीट सॅलडमधे कच्चे, उकडून भरीत तसेच किसून कोशिंबीर, सूप , पराठे, पूर्या, हलवा इ. अशा अनेक प्रकारे वापरता येते. बीट जास्तीत- जास्त कसे पोटात जाईल ? हा विचार करून ही बीटरूट बर्फी केली. कशी केली ती कृती व साहीत्य,

साहीत्य :-
* उकडून साल काढून बीटाचा किस 1 वाटी
* साखर 1 वाटी
* ओल्या नारळाचा चव 1 वाटी
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* अर्धा कप दूधावरची जाड साय/ खवा पाव  
   वाटी
* पाव कप दूध
* वेलचि पाडर अर्धी टीस्पून
* सजावटीसाठी काजू-बदामाचे काप ऐच्छिक

कृती :-

प्रथम खोबरे व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून शिजत ठेवा.

नंतर साखर विरघळून खोबर शिजत आले की, त्यातच किसलेला बीट घाला.सतत हलवत रहा. हलवत-हलवतच आधी साय व दूध घाला. नंतर मिल्क पावडर घाला. एकसारखे हलवत रहा.

आता  काही वेळाने मिश्रण आटत येते व एकत्र गोळा होऊन कढई पासून सुटत येते.वेलची पूड घालून परत एकदा हलवा. गॅस बंद करा व मिश्रण एका ट्रेमधे किंवा थाळीमधे ओता. वरून काजू/बदामाचे पातळ काप पसरवा व हाताने किवा प्लास्टीक शीट ठेवून वाटीने वरून अलगद थापा. गरम असतानाच सूरीने वड्या कापून म्हणजे रेषा मारून ठेवा.

साधारण दीड-दोन तासानी वड्या सुकतात. आता त्या वड्या ट्रे मधून सुट्टया करून काढा व डब्यात भरून ठेवा. कोरडी थंड हवा असेल तर साधारण हवामानात चार दिवस सहज टिकतात. किवा मग फ्रीजमधे ठेवा. सिझन नूसार ठेवा.

आपल्या घरी कोणी येणार असेल किवा लहान मुलांचा वाढदिवस असेल तर अथवा दिवाळीत फराळाच्या ताटात रंगीत वड्या छान दिसतात. यांचा रंगच खूप सुंदर दिसतो.अतिशय रूचकर, पौष्टीक व सोप्या आहेत. तूम्हीही करून बघा  व प्रतिक्रीया द्यायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 September 2015

स्ट्राॅबेरी बर्फी ( Strawberry Burfi)

No comments :

स्ट्राॅबेरी म्हणले की मस्त लाल-गुलाबी रंग व रसाळ ,साधारण आंबटगोड चवीचे फळ डोळ्यासमोर येते. मात्र हे फळ हिवाळ्यातच येते. तसे आजकाल बाराही महीने सर्व मिळते. स्ट्राॅबेरी क्रश, जाम, विविध मिठाया तसेच आईसक्रीम, असे बरेच प्रकार बनवले जातात. आजकाल लहान मुलांची बरीच औषधे, खोकल्यावरच्या गोळ्या ...एकंदरीत त्याचा स्वाद व मोहक रंग सगळ्यांनाच आवडतो. तुम्हालाही आवडेल कशा करायच्या साहीत्य व कृती ...

साहीत्य ;-

* ओल्या नारळाचे खवलेले खोबरे 2 वाट्या
* साखर 1 1/2 (दीड) वाटी
* स्ट्राॅबेरी क्रश पाव ते अर्धी वाटी किवा जाम 2 टेस्पून
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* पिठी साखर 2 टेस्पून
* रोज किवा स्ट्राॅबेरी इसेन्स 5-6 थेंब

कृती :-

प्रथम जाड बुडाची कढई किवा नाॅनस्टीक पॅन घ्या. वर दिलेल्या साहीत्यापैकी पिठीसाखर व इसेंन्स सोडून बाकी सर्व साहीत्य एकत्र करा व मंद आचेवर शिजत ठेवा.

सतत ढवळत रहा.खाली लागण्याची शक्यता असते. करपले तर बर्फीचा रंग व चव बदलते. म्हणून काळजी घ्यावी.

आता पंधरा मिनिटांनी सर्व मिश्रण कढईपासून सुटायला लागेल. मिश्रण आळून येईल. तर आता शेवटी पिठीसाखर व इसेंन्स घालून, गॅस बंद करून चांगले घोटा. कोणत्याही वडीचे मिश्रण जितके जास्त घोटाल, तितके बर्फी चिकट न होता खुटखुटीत होते व लवकर सुकते.

नंतर मिश्रण ताटात घाला व प्लॅस्टीक शिट किवा पिशवी त्यावर घालून हाताने व्यवस्थित थापा. थोडे थंड झाले की सुरीने रेषा पाडून ठेवा.

अर्धा तासाने पुर्ण थंड होईल, मग वड्या काढा व डब्यात ठेवा.

खुप छान गुलाबी लाल रंग येतो व आकर्षक दिसतात. तसेच चवीला पण उत्कृष्टच लागतात.

25 May 2015

आंबा वडी (Mango Burfi)

No comments :


आपण अनेक प्रकारच्या गोड/ तिखट वड्या नेहमीच करत असतो. गोड वड्यामधे सुध्दा गाजर,टोमॅटो,भोपळा,गुलकंद आंबा इ.अनेक प्रकारच्या वड्या करता येतात.त्यातीलच एक आंबा वडी ही  वेगवेगळ्या पध्दतिने केली जाते. नुसता आंब्याचा रस आटवून ,मावा मिसळून तर कधी ओला नारळ मिसळून करतात. आज मी ओला नारळ घालून वडी केली.कशी पहा.
साहीत्य :-
* नारळ खवलेला ४ वाट्या
* साखर  ४ वाट्या
* आंब्याचा रस २ वाट्या(मध्यम २ आंब्यांचा)
* वेलचीपूड
* मिल्कपावडर २ टेस्पून
* पिठीसाखर २ टेस्पून
* तूप १ टीस्पून
कृती :-
       प्रथम एक जाड बुडाची कढई/पातेले घ्यावे. त्यामधे खवलेला नारळ ,साखर व आंब्याचा रस एकत्र करावा. भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवावे.

मिश्रण सतत हलवत रहावे . खाली लागण्याची शक्यता असते.साधारण आळत आले की,त्यामधे मिल्कपावडर व पिठीसाखर घालावी. परत एकसारखे हलवत रहावे.मिश्रण एकत्र गोळा होऊन कढईपासून सुटायला लागले की तयार झाले असे समजावे व गॅस बंद करावा.वेलचीपूड घालावी व आधिच तूपाचा हात लावून तयार केलेल्या ताटामधे ओतावे. व जाड प्लास्टीक बॅग पसरून हाताने अलगद थापावे.


थोडे थंड झाले की चाकूने रेषा पाडून ठेवाव्यात. पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात व डब्यात भरून ठेवाव्यात.




टीप :- या वड्या शक्यतो चार-आठ दिवसात संपवाव्यात.ओला नारळ असल्याने खराब होण्याची शक्यता असते.अन्यथा फ्रिज मधे ठेवून खाव्यात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 

22 March 2015

गाजर बर्फी (Carrot Burfi )

No comments :

गाजर एक कंदमुळ वर्गीय भाजी आहे.गाजरात जीवनसत्व 'अ' मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यासाठी खूप उपयुक्त आहे.गाजर नुसते तर खाता येतेच,शिवाय त्यापासून खूप पदार्थ केले जातात. चटणी,कोशिंबीर,भाजी,खीर,हलवा, गाजर रोल,कटलेट,सूप ! अशा खूप सार्या पदार्थांची नावे घेता येतील. मी आज गाजराची बर्फी करणार आहे.काय साहीत्य व कशी ते पहा .

साहीत्य :-

1) गाजराचा किस 2 वाट्या
2) ओल्या नारळाचा चव 2 वाट्या
3) साखर 3 वाट्या
4) सायीसह दूध 1 वाटी किवा फ्रेश क्रीम (अमूल) 1/2 वाटी
5) मिल्क पाडर 1टेस्पून
6) वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स आवडीनुसार
7) तूप 1 टेस्पून

कृती :-

प्रथम गाजराचा किस व खोबरे एका पॅनमधे तुपावर थोडे परतावे.

नंतर त्यात दूध / क्रीम घालावे. चांगले शिजू द्यावे.

आता त्यात साखर घाला.सतत हलवत रहा. थोडा गोळा होत आले की मिल्क पावडर घाला. हलवत रहा.गोळा होऊन कडेने सुटत आला की गॅस बंद करा.

नंतर खाली उतरवून वेलची पावडर घाला व तूप लावलेल्या ताटात ओतून थापावे. थापताना आधि वरून ड्राय फ्रूट्स घालावेत. थोडे थंड झाल्यावर चाकूने रेषा मारून ठेवा.व थंड होऊ दे.

आता पूर्ण थंड झाले की वड्या कापून डब्यात भरा.आठ दिवस आरामात फ्रिज शिवाय रहातात.

28 September 2014

ओल्या खोबर्याच्या वड्या(Coconut Barfi)

No comments :

साहीत्य:-
* नारळाचे खवलेले खोबरे २ वाट्या
* साखर २ वाट्या
* दूध १कप किवा एक लिटर दूधावरची साय अथवा ५०ग्रँम खवा
* मिल्क पावडर पाव वाटी (नसेल तरी चालते
* वेलची पूड

कृती:-
 एक जाड बुडाचे पातेले अथवा कढई घ्यावी व त्यामधे साखर ,खोबरे दूध, मिल्क पावडर सर्व पदार्थ एकत्र करून शिजायला ठेवावे. सतत हलवत रहावे.नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते.
मिश्रण होत आले की ,गोळा कढईच्या कडेने सुटत येतो.तसे दिसले की मिश्रण झाले असे समजावे व वेलचीपूड घालून हलवून उतररावे.व चांगले घोटून मिश्रण तूपाचा हात लावलेल्या ताटाला थापावा.
थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

टीप:- खोबरे खवताना फार खरवडून खवू नये .नाहीतर खोबरे काळपट येते व वड्यांचा रंग काळा येतो.स्वच्छ पांढर्या होत नाहीत.