बीट हे एक रसाळ कंद आहे. गडद लाल-किरमिजी रंग असतो व आतून एकदम लालभडक असते. बीटापासून खाद्यरंग तयार केला जातो. साॅस, सरबते, जेलि, आईस्क्रीम इत्यादी मधे वापरतात. तसेच बीटामधे आयर्न भरपूर प्रमाणात असते.बीट रोजच्या आहारात वापरल्यास शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. शक्तिवर्धक व रक्तवर्धक आहे. बीटमधे नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते.तरीसूध्दा कॅलरीज कमी असतात. पाश्चिमात्य देशात बीटापासून साखर तयार केली जाते.बीटाला तशी काही स्वताची अशी खास चव नसते.काहीसे गोडसर लागते. मात्र याचा रंगच अधिक मोहक असतो. बीट सॅलडमधे कच्चे, उकडून भरीत तसेच किसून कोशिंबीर, सूप , पराठे, पूर्या, हलवा इ. अशा अनेक प्रकारे वापरता येते. बीट जास्तीत- जास्त कसे पोटात जाईल ? हा विचार करून ही बीटरूट बर्फी केली. कशी केली ती कृती व साहीत्य,
साहीत्य :-
* उकडून साल काढून बीटाचा किस 1 वाटी
* साखर 1 वाटी
* ओल्या नारळाचा चव 1 वाटी
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* अर्धा कप दूधावरची जाड साय/ खवा पाव
वाटी
* पाव कप दूध
* वेलचि पाडर अर्धी टीस्पून
* सजावटीसाठी काजू-बदामाचे काप ऐच्छिक
कृती :-
प्रथम खोबरे व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून शिजत ठेवा.
नंतर साखर विरघळून खोबर शिजत आले की, त्यातच किसलेला बीट घाला.सतत हलवत रहा. हलवत-हलवतच आधी साय व दूध घाला. नंतर मिल्क पावडर घाला. एकसारखे हलवत रहा.
आता काही वेळाने मिश्रण आटत येते व एकत्र गोळा होऊन कढई पासून सुटत येते.वेलची पूड घालून परत एकदा हलवा. गॅस बंद करा व मिश्रण एका ट्रेमधे किंवा थाळीमधे ओता. वरून काजू/बदामाचे पातळ काप पसरवा व हाताने किवा प्लास्टीक शीट ठेवून वाटीने वरून अलगद थापा. गरम असतानाच सूरीने वड्या कापून म्हणजे रेषा मारून ठेवा.
साधारण दीड-दोन तासानी वड्या सुकतात. आता त्या वड्या ट्रे मधून सुट्टया करून काढा व डब्यात भरून ठेवा. कोरडी थंड हवा असेल तर साधारण हवामानात चार दिवस सहज टिकतात. किवा मग फ्रीजमधे ठेवा. सिझन नूसार ठेवा.
आपल्या घरी कोणी येणार असेल किवा लहान मुलांचा वाढदिवस असेल तर अथवा दिवाळीत फराळाच्या ताटात रंगीत वड्या छान दिसतात. यांचा रंगच खूप सुंदर दिसतो.अतिशय रूचकर, पौष्टीक व सोप्या आहेत. तूम्हीही करून बघा व प्रतिक्रीया द्यायला विसरू नका.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment