10 December 2015

गोडा मसाला/काळा मसाला (Goda Masala)

No comments :

'मसाला ' हा स्वयंपाक घरात बनणार्या प्रत्येक भाजी, उसळी,आमटी यांचा मुख्य 'आत्मा' असतो असे म्हणले तरी चालेल .कारण भाजीची मुख्य चव मसाल्यावरच  अवलंबून असते. आणि हा मसाला प्रत्येक घरात निरनिराळ्या प्रकारचा असतो. घरात पूर्वीपासून परंपरागत असा जो केला जातो तीच चव जीभेवर बसलेली असते व तोच मसाला वापरतात.मसाले ,मेतकूट शक्यतो घरच्या-घरीच करावेत.मसाल्याचा वास चांगला येतो. बर्याच कुटूंबात नुसता गरम मसाला वापरतात तर काही भागात कांदा-लसूण आलं,कोथंबीर व गरम मसाला, मिरची एकत्र कुटून केलेला वापरतात. याला कांदा-लसूण चटणी म्हणतात.गुजराती बांधव शक्यतो धना-जीरा पावडर वापरतात. तर ,साधारण ब्राम्हण समाजात 'गोडा मसाला' वापरतात.यालाच काळा मसालाही म्हणतात. हा मसाला व नुसते तिखट-मीठ घातले भाजीला तरी भाजी चविष्ठ होते.कसा करायचा ते साहीत्य व कृती पहा.

साहीत्य :-

* धणे 250 ग्रॅम
* जीरे  125 ग्रॅम
* सुकं खोबरं 125 ग्रॅम (मोठ्या दोन वाट्या)
* तिळ 50 ग्रॅम
* खसखस 50 ग्रॅम
* खडा हींग 10 ग्रॅम
* मोहरी 10 ग्रॅम ( दोन टीस्पून)
* मेथी 5 ग्रॅम (एक टीस्पून)
* लवंग 5 ग्रॅम (10-12)
* मिरे 5 ग्रॅम
* दालचिनी 5 ग्रॅम ( 2 इंचाच्या 4-5 कांड्या)
* तमालपत्र 5-6 पाने
* चिरफळ 4-5 नग
* मसाला वेलदोडा 4-5 नग
* शहाजीरे 5ग्रॅम
* बदाम फूल  5 ग्रॅम (4-5नग)
* लाल सुकी मिरची 5-6 किवा लाल मिरचीपूड
   पूड दोन टीस्पून
* हळदपूड 2 टीस्पून
* गोडेतेल 1 वाटी
* खडे मीठ अर्धी वाटी

कृती :-

प्रथम मसाल्याचे सर्व सामान वर दिलेल्या प्रमाणात काढून साफ करून निवडून घ्या.

खोबर्याचे पातळ काप करून घ्या.

आता सर्वात आधि तिळ,खसखस,मोहरी या वस्तू नुसत्याच कोरड्या, तेल न घालता भाजून घ्या. एका ताटात काढा.

नंतर धणे,जीरे व खोबरे सोडून बाकीच्या सर्व वस्तू ज्या कमी आहेत त्या अगदी थोडे-थोडे तेल कढईत घालून एक-एक वेगवेगळ्या चांगल्या भाजून घ्या. ताटात काढा.

आता त्याच कढईत परत थोडे तेल घालून जीरे तांबूस भाजून घ्या. ताटात काढा.

नंतर परत तेल घाला कढईत व खोबर्याचे काप तांबूस तळून काढा.

आता सर्वात शेवटी वाटीतले सर्व तेल घाला व धणे तांबूस भाजून घ्या.

याच क्रमाने सर्व साहीत्य भाजून घ्या म्हणजे तेवढ्याच तेलात सर्व नीट भाजले जाते व कढईत तेल शिल्लक रहात नाही . वाया जात नाही व मसाला फार तेलकटही होत नाही.

आता आधी तिळ, खसखस, मोहरी एकत्र मिक्सरच्या लहान भांड्यात कुटून घ्या. परातीत काढा.

नंतर सर्व लवंग, दालचिनी,मिरे असे वर दिलेले सर्व कमी पदार्थ एकत्र करून थोडे मीठ घालून कूटा. चाळून तिळ, खसखसवरच टाका. 

आता राहीलेला चाळ व जिरे थोडे मीठ टाकून परत मिक्सरला कूटा. परत चाळून घ्या.

जिर्याचा राहीलेला चाळ, धणे मीठ टाकून परत कूटा. चाळून घ्या.  चाळ परत-परत दोन-तिन वेळा कूटुन चाळून घ्या.शेवटी राहीलेला थोडा चाळ एकदम बारीक पावडर करा व आता न चाळताच परातीत टाका.

सर्वात शेवटी खोबर्याचे काप मीठ घालून कूटा व परातीतल्या मसाल्यावर घाला.

आता या मसाल्यात हळदपूड व मिरचीपूड टाका व सर्व मसाला हाताने नीट एकत्र कालवा.

हा तयार मसाला कोरड्या काचेच्या बरणीत तळात थोडे बारीक मीठ पसरून त्यावर  दाबून  भरा. वर शेवटीपण बरणीच्या तोंडाला मीठ पसरवा.घट्ट नीट झाकण लावून कोरड्या जागी ठेवून द्या. वर्षभर आरामात टिकतो. कोणत्याही रोजच्या भाज्या, उसळी, आमटी, मसाले भात यांत घालता येतो. झटपट  चवदार पदार्थ बनतो. हा मसाला तयार असेल तर स्वयंपाक पट्कन तयार होतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment