Showing posts with label Masale. Show all posts
Showing posts with label Masale. Show all posts

21 February 2017

दाबेली मसाला (Dabeli Masala)

No comments :

"कच्छी दाबेली मसाला" हा दाबेलीसाठी आवश्यक असतो.हा मसाला बाजारात तयार सुध्दा मिळतो. परंतु शक्यतो गरज असेल तेव्हा घरीच ताजा -ताजा तयार केला तर मसाल्याचा वास अधिक छान उमटतो. व करायला फारसा वेळही लागत नाही तर घरीच तयार करू. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* धणेपूड २ टेस्पून
* जीरे १ टेस्पून
* दालचिनी २ इंच
* लवंगा ४-५
* काळे मिरे ७ -८

कृती :-
प्रथम सर्व मसाल्याचे जिन्नस वेगवेगळे व हलकेच, कोरडे भाजून घ्यावेत.

थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरमधे बारीक पूड करावी.

तयार मसाला दाबेलीच्या भाजीत वापरावा.

टिप :- आपल्या गरजेनुसार दिलेल्या प्रमाणात साहित्य जास्त घेऊन जास्तीचा सुध्दा करून हवाबंद बाटलीमधे ठेवला  तरी टिकतो. मी लागेल तसा थोडा -थोडाच करते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 December 2015

गोडा मसाला/काळा मसाला (Goda Masala)

No comments :

'मसाला ' हा स्वयंपाक घरात बनणार्या प्रत्येक भाजी, उसळी,आमटी यांचा मुख्य 'आत्मा' असतो असे म्हणले तरी चालेल .कारण भाजीची मुख्य चव मसाल्यावरच  अवलंबून असते. आणि हा मसाला प्रत्येक घरात निरनिराळ्या प्रकारचा असतो. घरात पूर्वीपासून परंपरागत असा जो केला जातो तीच चव जीभेवर बसलेली असते व तोच मसाला वापरतात.मसाले ,मेतकूट शक्यतो घरच्या-घरीच करावेत.मसाल्याचा वास चांगला येतो. बर्याच कुटूंबात नुसता गरम मसाला वापरतात तर काही भागात कांदा-लसूण आलं,कोथंबीर व गरम मसाला, मिरची एकत्र कुटून केलेला वापरतात. याला कांदा-लसूण चटणी म्हणतात.गुजराती बांधव शक्यतो धना-जीरा पावडर वापरतात. तर ,साधारण ब्राम्हण समाजात 'गोडा मसाला' वापरतात.यालाच काळा मसालाही म्हणतात. हा मसाला व नुसते तिखट-मीठ घातले भाजीला तरी भाजी चविष्ठ होते.कसा करायचा ते साहीत्य व कृती पहा.

साहीत्य :-

* धणे 250 ग्रॅम
* जीरे  125 ग्रॅम
* सुकं खोबरं 125 ग्रॅम (मोठ्या दोन वाट्या)
* तिळ 50 ग्रॅम
* खसखस 50 ग्रॅम
* खडा हींग 10 ग्रॅम
* मोहरी 10 ग्रॅम ( दोन टीस्पून)
* मेथी 5 ग्रॅम (एक टीस्पून)
* लवंग 5 ग्रॅम (10-12)
* मिरे 5 ग्रॅम
* दालचिनी 5 ग्रॅम ( 2 इंचाच्या 4-5 कांड्या)
* तमालपत्र 5-6 पाने
* चिरफळ 4-5 नग
* मसाला वेलदोडा 4-5 नग
* शहाजीरे 5ग्रॅम
* बदाम फूल  5 ग्रॅम (4-5नग)
* लाल सुकी मिरची 5-6 किवा लाल मिरचीपूड
   पूड दोन टीस्पून
* हळदपूड 2 टीस्पून
* गोडेतेल 1 वाटी
* खडे मीठ अर्धी वाटी

कृती :-

प्रथम मसाल्याचे सर्व सामान वर दिलेल्या प्रमाणात काढून साफ करून निवडून घ्या.

खोबर्याचे पातळ काप करून घ्या.

आता सर्वात आधि तिळ,खसखस,मोहरी या वस्तू नुसत्याच कोरड्या, तेल न घालता भाजून घ्या. एका ताटात काढा.

नंतर धणे,जीरे व खोबरे सोडून बाकीच्या सर्व वस्तू ज्या कमी आहेत त्या अगदी थोडे-थोडे तेल कढईत घालून एक-एक वेगवेगळ्या चांगल्या भाजून घ्या. ताटात काढा.

आता त्याच कढईत परत थोडे तेल घालून जीरे तांबूस भाजून घ्या. ताटात काढा.

नंतर परत तेल घाला कढईत व खोबर्याचे काप तांबूस तळून काढा.

आता सर्वात शेवटी वाटीतले सर्व तेल घाला व धणे तांबूस भाजून घ्या.

याच क्रमाने सर्व साहीत्य भाजून घ्या म्हणजे तेवढ्याच तेलात सर्व नीट भाजले जाते व कढईत तेल शिल्लक रहात नाही . वाया जात नाही व मसाला फार तेलकटही होत नाही.

आता आधी तिळ, खसखस, मोहरी एकत्र मिक्सरच्या लहान भांड्यात कुटून घ्या. परातीत काढा.

नंतर सर्व लवंग, दालचिनी,मिरे असे वर दिलेले सर्व कमी पदार्थ एकत्र करून थोडे मीठ घालून कूटा. चाळून तिळ, खसखसवरच टाका. 

आता राहीलेला चाळ व जिरे थोडे मीठ टाकून परत मिक्सरला कूटा. परत चाळून घ्या.

जिर्याचा राहीलेला चाळ, धणे मीठ टाकून परत कूटा. चाळून घ्या.  चाळ परत-परत दोन-तिन वेळा कूटुन चाळून घ्या.शेवटी राहीलेला थोडा चाळ एकदम बारीक पावडर करा व आता न चाळताच परातीत टाका.

सर्वात शेवटी खोबर्याचे काप मीठ घालून कूटा व परातीतल्या मसाल्यावर घाला.

आता या मसाल्यात हळदपूड व मिरचीपूड टाका व सर्व मसाला हाताने नीट एकत्र कालवा.

हा तयार मसाला कोरड्या काचेच्या बरणीत तळात थोडे बारीक मीठ पसरून त्यावर  दाबून  भरा. वर शेवटीपण बरणीच्या तोंडाला मीठ पसरवा.घट्ट नीट झाकण लावून कोरड्या जागी ठेवून द्या. वर्षभर आरामात टिकतो. कोणत्याही रोजच्या भाज्या, उसळी, आमटी, मसाले भात यांत घालता येतो. झटपट  चवदार पदार्थ बनतो. हा मसाला तयार असेल तर स्वयंपाक पट्कन तयार होतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 March 2015

कोल्हापूरी कांदा-लसूण चटणी/मसाला(Kolhapuri Chuteny/Masala)

No comments :
कोल्हापूरी मसाला चटणी ही सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर या भागात विशेष करून स्वयंपाकात वापरतात.उन्हाळी कामातले हे एक कामच असते . एकदम वर्ष -सहा महीन्याची करून ठेवली की रोजचा स्वयंपाक करणे सोईचे व झटपट होते. सर्व भाज्या ,आमटी यामधे वापरली जाते.तसेच नुसती सुध्दा तेल घालून भाकरी सोबत खायला चांगली लागते.एखादा लहान कांदा, ही घेतला तर आणखी मजा येते जेवणाला. भाजीची आठवणही नाही येत. ही मसाला चटणी करणे मोठे कष्टदायक काम आहे.पण घरी बनवलेली चव काही न्यारीच असते. मग त्यात आपण एक शाॅर्टकट वापरू शकतो. अगदी मिरच्या आणणे, वाळविणे, कुटणे व मिरची पूड करणे,व नंतर पुढे मसाला करणे .या महाकष्टमय कामापेक्षा मिरचीपूड तयार आणावी व बाकी सर्व गरम मसाले,ओला मसाला घरी आणून मग चटणी करावी. लवकर होते.शहरी भागात रहात असू तर मिरच्या आणणे व वाळवणे जिकीरीचे होते.माझ्या घरी स्वयंपाकात गोडा मसाला वेगळा व लाल मिरचीपूड वेगळी असे वापरण्याचीच पध्दत आहे.पण काही भाज्यामधे म्हणजे भरले वांगे,दोडका अशा भाज्याना हाच मसाला छान लागतो. मग मी घरीच मिक्सरवर गोडा मसाला म्हणजे त्यात सर्व गरम मसाले येतातच अधिक मिरची पूड व ओला मसाला कांदा,लसूण,आले व कोथंबिर असे सर्व धेऊन कुटून थोडासा करून ठेवते.व नुसता ही खायला भाकरी,चपाती सोबत  सर्वाना आवडतोच ! चला तर मग हा झटपट मसाला कसा करायचा पाहू !

साहीत्य :-

* लाल मिरचीपावडर १ किलो
* बारीक मीठ २५० ग्रँम
* कांदा उभा पातळ चिरून १किलो
* लसूण १००ग्रँम
* आलं १००ग्रँम
* कोथिंबिर १ जूडी निवडून
* गोडा मसाला ५०० ग्रँम
गोडा मसाला कृती या लिंकवर पहा 👇
http://swadanna.blogspot.in/2015/12/goda-masala.html?m=1

कृती :-

प्रथम कांदा तेलावर भाजून घ्या. आलं-लसूण कुटून घ्या. थंड होऊ द्या. कोथिंबिर चिरून घ्या.

आता मिक्सरमधे कांदा,आलं-लसूण व कोथिंबिर थोडे मीठ घालून एकत्र वाटून घ्या.

नंतर मिरचीपावडर व तयार गोडा मसाला एका मोठ्या परातीमधे घ्या. मोठ्या चमच्याने एकत्र करा. त्यामधे वरील वाटलेला मसाला घाला व हाताने सर्व एकत्र मिसळा.

शेवटी परत एकदा सर्व एकत्रित केलेला मसाला थोडा -थोडा मिक्सरमधे फिरवून काढा. म्हणजे व्यवस्थित एकजीव होतो.

आपली झटपट कोल्हापूरी मसाला चटणी तयार!

तयार मसाला स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा.नुसता सुध्दा तेल घालून भाकरीसोबत  खायला छान लागतो.भाजी-आमटीची चव तर अप्रतीम लागते.तुम्हीही नक्की करून बघा !

टीप:
मी वर्षभराच्या हिशेबाने मापे दिलीत. परंतु मिरचीपूड व गोडा मसाला वेगवेगळा तयार असेल तर २-३ महीन्यातून थोडी -थोडी ताजी तयार करा. चव चांगली लागते. मसाले वेगवेगळे ठेवल्याने, ज्यांचे घरी कांदा लसूण सर्वच भाज्यामधे घालत नाहीत त्यानाही सोईचे होते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.