04 September 2015

शाही लाडू (Shahi Laddu)

No comments :

याच्या नावातच शाहीपण असलेने यात सर्व शाहीच  वस्तू वापरल्या आहेत. सामान्यपणे नुसते ड्रायफ्रूट्स काही रोज आपल्या आहारात खाल्ले जात नाहीत. मुलं तर अजिबात खात नाहीत. फक्त बेदाणे मनुके इतकेच वेचून खातात . तर मग काजू, बदाम,अक्रोड,पिस्ते इ.असे सर्वच ड्रायफ्रूट कसे पोटात जातील ? मुलांच्या व आपल्यापण ! तसेच नैवेद्याला व उपवासालापण चालतात. पुढे सांगितल्या प्रमाणे लाडू करून ठेवा. एकदम सोपे व पौष्टीक असेआहेत. रोज एक जरी खाल्ला तरी पुरेसे आहे.

साहीत्य :-

* काजू
* बदाम
* अक्रोड
* पिस्ता सर्व प्रत्येकी एक वाटी
* खारीक पूड 1 वाटी
* काळा अरेबियन खजूर10-15 बिया
* सुके अंजिर 10-15 नग
* बेदाणे 1 वाटी
* मनुका 1 वाटी
* खसखस भाजून 2 टीस्पून
* वेलचीपूड
* जायफळ अर्धे पुड करून
* चांदीचा वर्ख ऐच्छिक

कृती :-

प्रथम सर्व सुकामेवा एका प्लेटमधे वेगवेगळा काढावा .बेदाणे ,मनुक्याच्या असतील तर देठ, खजुराच्या बिया असे सर्व काढून साफ करून घ्या.अंजिराचे तुकडे करा.अक्रोड फोडून घ्या.

आता मिक्सरमधे  आधीकाजू, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची भरड करून घ्या. बाजूला काढून ठेवा.

आता अंजिर,मनुका व बेदाणे मिक्सरमधे घालून वाटा. लगदा तयार होईल.

आता या लगद्यात आधिची भरड व खारिक पावडर मिसळा. खसखस, वेलची,जायफळ पुड घाला व व्यवस्थित हाताने किवा मिक्सरमधेच थोडे फिरवून एकजीव करा. मिश्रण कोरडे वाटले तर थोडे शुध्द तूप घालू शकता.अन्यथा नकोच.

आता तयार मिश्रणाचे लहान-लहान लिंबाच्या आकाराचे लाडू बनवा. शोभेसाठी वरून चांदीचा वर्ख लावा. नाही लावला तरी चालतो.

हवाबंद डब्यात भरून ठेवा.बरेच दिवस टिकतात.

टीप :- सुकामेवा आवडीनुसार कोणताही कमी-अधिक करू शकता. फक्त सुकामेव्याची व खारकेची मिळून भरड, ही तयार लगद्याच्या दुप्पट असावी. तर लाडू वळता येतात.

यामधे आवडत असेल तर डींक पण तुपात तळून घातला तर पौष्टीकपणा अजून वाढतो.

No comments :

Post a Comment