21 October 2016

करंजी (Karanji)

No comments :

करंजी हा पदार्थ महाराष्ट्रामधे खास दिवाळीला केला जाणार पारंपारिक पदार्थ आहे. दिवाळीचा फराळ तयार करायला सुरवात करायची तर गोड करंजी सर्वात आधि करायची पध्दत आहे. त्यामुळे करंजीला "शुभाची करंजी " असे म्हणतात. करंजी मधे सहसा चकली प्रमाणे बिघडण्याचा धोका नसतो परंतु लाटणे, भरणे,तळणे अशासाठी किमान दोघींची मदत असेल तर करणे कंटाळवाणे होत नाही.  दिवाळीत शाळांना सुट्टया लागलेल्या असतात. मग घरातली चिल्लर कंपनीसुध्दा करंजा भरण्याच्या, भरलेल्या चिरण्याने कातरायच्या कामाला हौसेने येते .किंवा शेजारणी सुध्दा दिवस ठरवून आज तुझ्याकडे, उद्या माझ्याकडे असे ठरवून पदार्थ करत असत. बाकी काहीही असो परंतु दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण नाहीच.तर अशी "करंजी" कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
वरच्या पारीसाठी -
* मैदा २ वाट्या
* बारीक रवा २ वाट्या
* मोहन २ टेस्पून
* दूध १ कप
* मीठ चिमूटभर
* पाणी गरजेनुसार

साहित्य :-
सारणासाठी -
* किसलेले सुके खोबरे १ १/२ वाट्या
* रवा १ /४ वाटी
* पिठी साखर १ १ /२ वाट्या
* खसखस १/४ वाटी
* वेलची पूड
* बेदाणे, चारोळी काजू,बादाम तुकडा आवडीनुसार
तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती :-

प्रथम रवा व मैदा एकत्र करून त्यामधे चविला मीठ व गरम तूप (मोहन) घालून चोळावे. नंतर दूध घालावे व गरजेनुसार पाणी घेऊन घट्ट मळावे. मळलेले पीठ ओल्या कपड्याखाली अर्धा ते एक तास झाकून ठेवावे. तोपर्यंत सारण तयार करावे.

सारण कृती -
आता कढईत खसखस कोरडीच भाजून घ्यावी. नंतर रवा भाजावा. आता किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर खोबरे हाताने चुरडावे. त्यामधे रवा, साखर, वेलचीपूङ, ड्रायफ्रूट्स कापून घालावे.सारण तयार.

आता करंजी करण्यासाठी आधी मळून ठेवलेले पीठ कुटून किवा फूड प्रोसेसर मधून फिरवून काढावे. मळलेल्या पीठाच्या लहान -लहान गोळ्या करून पुरीसारखे लाटून घ्यावे. नंतर चमच्याने सारण भरावे व पारी दूधाचे बोट लाऊन बंद करावी. नक्षीदार चिरण्याने कापावी. अशा १५ -२0 करंजा करून ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे. नंतर कढईत तेल गरम करून मंद गँसवर गुलाबी रंगावर तळावे.

खुसखूषीत तयार करंजा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

टिप्स :-
* सारणात साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी.
* खोबर्याच्या वाट्या थोडावेळ कोमट पाण्यात टाकाव्यात व नंतर त्याची काळी पाठ काढावी व किसावे. किस पांढराशुभ्र होतो.करंजीसुध्दा स्वच्छ रंगाची दिसते. अथवा सारणामुळे काळपट रंग येतो.
* सारण आदले दिवशीच करून ठेवले असता जास्त सोयीचे होते. म्हणून आदले दिवशीच सवडीनुसार निगुतीने करून ठेवावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment