06 July 2017

भाताचे थालीपीठ (Rice Thalipith)

No comments :

आपण घरात रोज शक्यतो मापात गरजेइतकाच स्वयंपाक करतो. तरीही एखादे दिवशी घरातले नोकरी -उद्योगानिमित्त बाहेर  गेलेले मेंबर कांही कारणाने म्हणजे आँफीस मधील सहकार्यांचे वाढदिवस, निरोप संमारंभ किंवा इतर कांही कारणाने बाहेरून खाऊन येतात. मग घरी जेवायला भुक नसते. परिणामत: अन्न शिल्लक रहाते व या शिल्लक अन्नाचे करायचे काय प्रश्न पडतो. बरं शिळे अन्न खाऊ नये म्हणतात. एकतर ते पचायला जड, दुसरे म्हणजे शिळ्या अन्नात कांही सत्व नसतात. नुसता चोथाच असतो. त्यामुळे शरीराला याचा कांहीच उपयोग नाही. झाला तर अपायच! इतके सर्व माहीत असूनही आपल्या हातून अन्न फेकून देणे, वाया घालवणे जमत नाही. बरं खावे तर ती शिळं अन्न संपवण्याची जवाबदारी एकटया गृहीणीवरच पडते. मला तर गार, शिळं अन्न अजिबात आवडत नाही. मग कधी पोळी उरली तर फोडणीची कर,लाडू कर किंवा भात असेल तर फोडणीचा किंवा दहीभात कालव असे  करायचे व घरातील सर्वानाच खाऊ घालायचे. असे केले की सर्वजण आवडीने खातात. पण कधी -कधी हेही करून किंवा खाऊन कंटाळा येतो. तर मी यांत बदल म्हणून भाताची थालीपीठं केली. अतिशय खमंग व खुसखूषीत होतात. आपल्या नेहमीच्या नुसत्या पीठाच्या थालीपीठापेक्षाही जास्त चांगले लागते. व गंमत म्हणजे यालाच घरात जास्त मागणी वाढली.. एकेकदा तर मी मुद्दाम ताजा भात शिजवून अशी थालीपीठे करते. ☺ तुम्हीही करून बघा. आणी हो, अजून एक म्हणजे मोठे उपवास असले की त्यादिवशी उपवासाचे बरेच पदार्थ केले जातात. त्यामुळे जर वरीचा भात शिल्लक राहिल्यास दुसरे दिवशी कोण खाणार? तर तो ही वापरला तरी चालतो. मी शिल्लक वरीचा भात वापरूनच फोटोतील थालीपीठं केलीत. तर ही खमंग थालीपीठं कशी करायची साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* शिजवलेला मऊ भात
* थालीपिठाची भाजणी पीठ
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* धना-जिरा पावडर
* हळद, हिंग
* मीठ
* कांदा बारीक चिरून
* कोथंबिर चिरून
* तेल भाजण्यासाठी

कृती :-

प्रथम, भात जर फडफडीत असेल तर पाण्याचा हबका मारून कुकरला एक शिट्टी काढून मऊ करून घ्यावा.

नंतर आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट व भात एकत्र मिक्सरमधे फिरवून काढावे.

नंतर ताटात काढून त्यामधे गोळा होण्या इतपत, मावेल तेवढे भाजणीचे पीठ, हळद, मीठ, हिंग, धना-जिरा पावङर व बारीक चिरलेला कांदा, कोथंबिर सर्व मसाला घालून मळावे. पीठ मळताना हाताला चिकटू नये म्हणून फक्त पाण्याचा ओला हात घ्यावा. पीठात पाणी घालू नये.

आता गार तव्याला तेल लावून, पीठाचा लहान गोळा त्यावर थापावा. थोडे जाडसर ठेवावे. मधे छिद्र करून तेल सोडावे. कडेने पण तेल सोडून झाकून ठेवावे. दोन मिनिटानी उघडून खरपूस भाजू द्यावे. एक बाजू झाली की दुसरी बाजूही तेल सोडून खरपूस भाजावी. थालीपीठ भाजताना गँस मंद ठेवावा. नाहीतर फक्त वरवर भाजले जाते व मऊ लागते. तेल जरा सढळ हातानेच सोडावे. मस्त खरपूस व खुसखूषीत होतात. लगेच गरमा-गरम खमंग थालीपीठ दही, लोणी, लोणच्यासोबत खायला द्या.

आता लगेच दुसरे थालीपीठ लावायला घ्यावे. मात्र आता तवा गरम असणार आहे. तर पहिले थालीपीठ भाजत असतानाच प्लास्टिक पिशवी, कागदाला तेल लावून त्यावर थालीपीठ थापून तयार करा व पहिले काढले की गरम तव्यावर तेल सोडून दुसरे टाका व पहिल्याप्रमाणेच भाजून घ्यावे.

अशा पध्दतीने तुम्हीही "भाताची थालीपीठं" करून बघा. नक्की आवडतील.

टिप्स :-
* भात शिळा, फडफडीत असेल तरच परत शिट्टी घेऊन, मिक्सरमधून काढावा. ताजा घेणार असाल तर मऊच शिजवावा व हाताने मळावा.
* भाजणीचे पीठ नसेल तर ज्वारीचे, गव्हाचे, बाजरी, तांदुळ किंवा सर्व पीठं थोडी- थोडी घेतली तरी चालते .
*  बारीक चिरून पालक, मेथी किंवा कसूरी मेथी पीठात घातली तर अजून एक छान वेगळी चव लागते.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment