14 July 2017

कोल्हापुरी तांबडा -पांढरा रस्सा (Kolhapuri Rassa)

1 comment :

रस्सा म्हटले की डोळ्यासमोर मस्त लालभडक नाँनवेज झणझणीत कोल्हापुरी रस्सा येतो. पण मी वेज तांबडा व पांढरा रस्सा बनवलाय. कारण शाकाहारी लोकांनाही मस्त चमचमीत खायला आवडते मात्र फक्त शाकाहारामधे. मग काय करावे?  खरे पहाता मांसाहारी व शाकाहारीमधे जे मसाले वापरले जातात ते सारखेच असतात. फक्त तयार रस्यामधे मटण वापरले तर मांसाहारी व बटाटे, भाज्या, कडधान्य वापरले तर शाकाहारी रस्सा. तर आता रस्सा कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
तांबडा रस्सा
* मोठे कांदे २
* उकडलेला बटाटा २
* लसूण पाकळ्या ८ -१०
* आलं १ इंच
* सुकं खोबरं १ /४ वाटी
* तिळ १ टेस्पून
* खसखस १/२ टेस्पून
* काळे मिरे ७-८
* लवंगा ४
* दालचिनी २ इंच
* धणे १ टीस्पून
* जीरे १/२ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टेस्पून
* हळद १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* तेल १ वाटी (जास्त कट/तवंग पाहीजे असेल तर जास्त)
* पाणी गरजेनुसार

साहित्य
पांढरा रस्सा :-
* कांदे २
* आलं-लसूण
* नारळाचे दूध २ वाट्या
* खसखस १ टेस्पून
* तिळ १ टेस्पून
* काजू ८ -१०
* काळी मिरी ४+४
* लवंगा २+२
* दालचिनी २ इंच
* तमालपत्रं मोठी दोन
* जीरे फोडणी साठी
* मोठी वेलची दाणे १ वेलचीचे
* हिरवी वेलची २
* तेल २ टेस्पून
* पाणी गरजेनुसार

कृती :-
तांबडा रस्सा
प्रथम कांदा पातळ उभा चिरून घ्यावा. नंतर कढईत आधी कोरडेच तिळ,खसखस, खोबरे भाजून घ्यावे. नंतर सुके खोबरे परतावे. शेवटी किंचित तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. सर्व थंड होऊ द्यावे.

नंतर मिक्सरमधे भाजून घेतलेले साहित्य  व  आलं लसूण, मिरी, लवंग दालचिनी सर्व मिक्सरमधे वाटून पेस्ट तयार करावी.

आता तेल गरम करून हळद, लाल मिरचीपूड घालावे. त्यावर तयार पेस्ट घालावी. गरजेनुसार पाणी घालावे. उकळी आली की चविनुूसार,मीठ घालावे व शेवटी बटाट्याच्या मोठ्या फोडी घालाव्यात. चांगले उकळवावे. तांबडा रस्सा तयार. भाकरी, भातासोबत किंवा अगदी ब्रेडसोबतही मस्तच लागतो. आवडत असल्यास सोबत कांदा, लिंबू घ्यावे.

पांढरा रस्सा -
हा सूप प्रमाणे जेवणाच्या आधी पितात. अँक्च्युली यामधे मटण शिजवताना जे पाणी वापरतात ते पाणी स्टाँक म्हणून वापरतात. पण मी साधे पाणी व नारळाचे दूध वापरून वेज पांढरा रस्सा बनवलाय.

प्रथम कांदा सोलून उकळत्या पाण्यात टाकून उकडून घ्यावा. नारळाचे दूध मिक्सरमधे तयार करून घ्यावे. तिळ, खसखस व काजू आधीच पाण्यात भिजत टाकून घ्यावेत.

आता उकडलेला कांदा, आलं-लसूण, तिळ, खसखस, काजू यांची एकदम मऊ पेस्ट करून घ्यावी. पेस्ट तयार करताना बाकी मसाले लवंग, दालचीनी, काळे मिरे, वेलची सर्व घालावेत.

नंतर एका पातेल्यात तेल गरम करावे व जीरे लवंगा, दालचिनी मिरे व तमालपत्रं फोडणीत घालावे. त्यावर वाटून तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट घालावी व थोडेच परतून २ वाट्या पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून चांगले उकळून घ्यावे.

सर्वात शेवटी नारळाचे दूध घालावे व एकच उकळी आणून गॅस बंद करावा. जास्त उकळले तर नारळाचे दूध फाटते.

गरमा-गरम सूप प्रमाणे प्यावा. सर्व मसाल्यांचा मस्त सुगंध येत असतेा. नुसतेच प्यायला खूप छान लागतो.

टिप्स :-
आपल्या आवडीनुसार तांबड्या रश्यामधे बटाच्याऐवजी मोडाची मटकी,सोया चंक्स किंवा इतर कडधान्ये पण वापरू शकतो.

पांढरा रस्सा फोडणी अगदी कमी तेल वापरावे.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

1 comment :