उन्हाळ्याच्या दिवसात वाळवणाचे साठवणी पदार्थ बरेच केले जातात. उपवासाचे, बिन उपवासाचे कुरडई, विविध प्रकारचे सांङगे ,पापड इत्यादी...की,जेणेकरून येणार्या पावसाळ्याची बेगमी झाली.एखादे दिवशी भाजी नसेल तरी तोंडीलावण्याची उणीव भासू नये. तसेच उपवासाचे काही पापड्या, चिवडा असेल तर फराळाला सोयीचे होते. आणि ते सर्व राहूदे, तळलेले चटपटीत पदार्थ चहासोबत खायला कोणाला नाही आवडत? सर्वानाच आवडतात. तर उन भरपूर आहे. "तांदुळाचे कुरकुरे" करून वाळवून ठेवा. कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तांदुळाची पीठी मोठ्या २ वाट्या (3 दिवस तांदुळ भिजत घालून केलेली)
* पाणी २.५ + २ वाट्या
* मीठ चविनूसार (सपाट १ टीस्पून)
* ओवा, जीरे प्रत्येकी १/२ टीस्पून
* मिरची पावडर किंवा हिरवी मिरची वाटून प्रमाण आवडीनुसार (ऐच्छिक)
कृती :-
प्रथम तांदुळाची पीठी २. ५ वाट्या पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यावी. पंधरा मिनिट झाकून ठेवावी.
नंतर गँसवर २ वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे व पाण्यात तिखट,मीठ, जीरे, ओवा घालावे. पाण्याला उकळी आली की, आधी भिजवून तयार केलेल्या पीठाची धार हळू एकसारखी त्या पाण्यात सोडावी व उलथन्याच्या टोकाने एकसारखे ढवळत रहावे. जेणेकरून गुठळी होणार नाही. पांच मिनिट झाकून वाफ आणावी. नंतर गँस बंद करून तसेच झाकून १५ मिनिट राहू द्यावे.
पंधरा मिनिटानंतर तयार पीठ घोटावे व चकली पात्रात घालून त्याच्या लांब लांब सरळ रेषा ताटात किंवा कापडावर घालाव्यात. चकली पात्राला चकली ऐवजी गाठीयाची चकती बसवावी.
उन्हात ३-४ दिवस चांगले कडकडीत वाळू द्या. नंतर हवाबंद डब्यात ठेवून द्यावे. खावे वाटेल तेव्हा तेलात तळावे व आवडत असल्यास वरून चाटमसाला, लाल मिरचीपूड शिंपडावे व खावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment