उन्हाळा म्हटले की कांही थंडगार प्यावे वाटते. तशातच मुलांना उन्हाळी सुट्टी असते. मुलांना तर सतत काही ना काही खायला व खाऊन झाले की प्यायला असे चक्र चालूच रहाते. तर बाजारी पेय विकत आणण्यापेक्षा आपण घरीच मसाला ताक, लस्सी, कोकंम सरबत, लिंबू सरबत, जलजिरा, कैरीचे पन्हे, मँगो फ्रूटी अशी पेयं आलटून -पलटून तयार करून फ्रिजमधे ठेवावी. घरातले स्वच्छ पाणी वापरून केलेली पेय असल्याने पोटाला बाधिक होण्याची पण भिती नसते. तर आता आंब्याचा सिझन चालू आहे, सर्वाना आवडती अशी "मँगो फ्रूटी" करूया. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* मोठा हिरवा कच्चा आंबा (कैरी)- १
* पिकलेले आंबे २
* साखर मोठी पाऊण ते एक वाटी
* पाणी साधारण ४ ग्लास
कृती :-
प्रथम कच्चा व पिकलेला दोन्ही आंबे स्वच्छ धुवून साल काढून घ्यावेत.
नंतर दोन्ही आंब्याच्या चपट्या छोट्या फोडी करून घ्याव्यात व कुकरच्या स्टील डब्यात घालून फोडीत पाणी न घालता शिजवून मऊ करून घ्याव्यात.
आता साखरेमधे, साखरेच्या निम्मे पाणी घालावे व गँसवर ठेवावी. सतत ढवळत रहावे. साखर विरघळून उकळू लागले की देान मिनिटानी गँस बंद करावा. साधारणपणे गुलाब जामुनच्या पाकासारखा पाक असावा.
आता शिजलेल्या आंब्याच्या फोडी व पाक दोन्हीही थंड होऊ द्यावे.
नंतर मिक्सरमधे आंब्याच्या फोडी घालून त्यावर निम्मा साखरेचा पाक घालावा व फिरवून काढावे. परत मधे मिक्सर उघडून राहीलेला पाक न गरजेनुसार थंड पाणी घालून फिरवावे
तयार फ्रूटी गाळणीने गाळून बाटलीमधे भरून फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावी. लगेचच प्यायची किवा द्यायची असल्यास ग्लासमघे आईसक्यूब घालावेत .
टिप :- आवडीनुसार साखरेचे व पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करावे. परंतु थोडे दाटसर व आंबटसर चविचीच "मँगो फ्रूटी " अधिक चवदार लागते.
अत्यंत कमी साहित्यामघे व पट्कन होणारी अशी ही फ्रूटी अतिशय सुंदर चवीची लागते. तुम्हीही करून बघा, नक्की आवडेल. कशी झाली ते सांगायला विसरू नका.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment