"बटाटा-शाबूदाणा पापड " उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे. उपवासा दिवशी किंवा इतरही वेळीही चहासोबत तळून खायला खुसखूषीत लागतात. परंतु त्याआधी करून, उन्हात वाळवून डब्यात ठेवल्यातरी पाहीजेत ना.. . कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* १ वाटी साबुदाणा
* बटाटे मध्यम आकाराचे ४-५ (शक्यतो चिकट नसणारे जुने बटाटे)
* ४-५ हिरव्या मिरच्या भरड वाटून
* प्रत्येकी १ टीस्पून - जिरे, जिरे पूड
* चवीप्रमाणे मीठ
* पाणी २ वाट्या
कृती :-
प्रथम शाबूदाणा रात्रीच धुवून वर अर्धा इंच पाणी ठेवून भिजवावा. बटाटे उकडून ठेवावेत.
सकाळी बटाटे सोलून किसून घ्यावेत. शाबूदाणा हाताने मोकळा करावा.
नंतर गँसवर २ वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यामधे मीठ, मिरचीची भरङ, जीरे व जीरपूड घालावी.
आता भिजलेला शाबूदाणा त्यामधे घालावा व शिजू द्यावा. सतत हलवत रहावे. शिजत आल्यावर किसलेला बटाटा घालून ५ मिनिट रटरटू द्यावा. गँस बंद करावा.
नंतर पळीने आपल्या आवडीच्या आकाराचे पापड प्लास्टिक कागदावर उन्हातच घालावेत. दोन ते तीन दिवस उन्हात कडक वाळवावेत.
वाळलेले पापड घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.केव्हाही काढून तळून खावेत.
टिप:- उकडलेल्या बटाच्याऐवजी कच्चा बटाटा किसून घातला तरी चालतो. बटाटा रात्रीच किसून, धुवून तुरटीच्या पाण्यात घालून ठेवावे. सकाळी पाणी निथळून काढावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment