Showing posts with label Sharbat. Show all posts
Showing posts with label Sharbat. Show all posts

08 May 2017

कोकम सरबत(Kokum Sharbat)

No comments :

आमसुल किंवा कोकम किंवा यालाच कोकणात रातांबा असेही म्हणतात. कोकम कोकण, गोव्याची खासियत आहे. ही आंबट -गोड चविची रसाळ फळे असतात. कच्ची असताना रंग हिरवा असतो. पिकल्यावर लाल रंग येतो. या पिकलेल्या लाल फळांच्या रसापासून "कोकम सरबत" केले जाते. या सरबतापासून प्रकृतिला थंडावा मिळतो. उन्हाळी उष्णतेच्या अनेक विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी रोज एक ग्लास हे सरबत प्यावे. पित्तशामक आहे. उन्हाळ्यात बाजारी रंग-बिरंगी कृत्रिम सरबत पिण्यापेक्षा हे आयुर्वेदीक सरबत उत्तम आहे. कोकम सरबताला फ्रिजमधे ठेवायची आवश्यकता नहीं. बाहेरही वर्षभर टिकते. कोकमची फळे उन्हाळी सिझनमधे येतात. याच्या रसापासून सरबत (किंवा याला "आगळ " ही म्हणतात) तयार केले जाते. शक्य असेल तर फळे विकत आणून घरीच करून ठेवावे. अथवा आजकाल बाजारात तयार आगळ मिळते. घरी आणून गरजेनुसार साखर, मीठ,पाणी घालून सरबत तयार करावे. कोकम सरबत कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
अर्क तयार करण्यासाठी,
* कोकम फळे १ किलो
* साखर फळे बुडतील इतकी. अंदाजे २ ते २.५ किलो
सरबतासाठी,
* मीठ चिमूटभर (ऐच्छीक)
* जिरेपूड
* लिंबू स्वादासाठी (ऐच्छीक) 
* अर्क १भाग +पाणी ३ भाग

कृती :-
प्रथम कोकमची लाल पिकलेली फळे आणून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर चाकूने चिरा माराव्यात.

नंतर त्यामधे साखर मिसळून बरणीत भरून ४ -६ दिवस ठेवावे. मधून मधून बरणी हलवत रहावी.

चार-सहा दिवसांनी भरपूर रस सुटतो.हा रस गाळणीने गाळून बाटलीमधे भरून ठेवावा. हा झाला अर्क किंवा आगळ. हे वर्षभर टिकते.

आता गरजेनुसार जेव्हा प्यायचे तेव्हा एका भांङ्यामधे एक भाग आगळ व तीन भाग थंड पाणी घालावे.

त्यामधे आवडीनुसार जिरेपूड, मीठ व लिंबू घालून ढवळावे व थंडगार प्यायला द्यावे.

आंबट -गोड चवीचे कोकम सरबत खूप सुंदर लागते व तहान भागते. रंगही आकर्षक लाल दिसतो.

टिप :
* तयार करून ठेवलेले आगळ सोलकढी साठी किंवा आमटी, भाजीत स्वयंपाकातही वापरता येते .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 April 2017

द्राक्षाचे सरबत (Grape Juice)

No comments :

केव्हाही फळे सालीसह दातानी चावून खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. परंतु काही वेळा आबाल, वृध्द लोकांना ते शक्य नसते. किंवा काही वेळा सिझनला मुबलक प्रमाणात व स्वस्त फळे येतात. तेव्हा असे प्रकार मी करते. तर कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* काळी द्राक्षाचे २ मोठ्या वाट्या
* साखर पाव वाटी
* लिंबू १
* पाणी १ग्लास

कृती :-

प्रथम द्राक्षे स्वच्छ धुवून १ ग्लास पाणी घालून शिजवून मऊ करून घ्यावीत.

थंड झाल्यावर मँशरने मँश करावे व रस गाळणीने गाळून घ्यावा.

गळालेला रस, साखर घालून गँसवर साखर विरघळेपर्यंत उकळावा. उकळत असताना एका लिंबाचा रस त्यामधे पिळावा.

आता रस थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावा.

प्यायला देताना एक भाग द्राक्षाचा रस व तीन भाग पाणी व आवडीनुसार बर्फ घालावा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


11 April 2017

कलिंगड -डाळींब ज्यूस (Watermelon -Pomegranate Juice)

No comments :

उन्हाळा म्हटले की सहाजिकच थंडगार कांही प्यावे वाटते, परंतु बाजारी सरबते किंवा ज्यूस कृत्रिम रंग, टिकण्यासाठी प्रिझर्वेटीव वापरलेली असतात. त्यापेक्षा आपण घरीच निरनिराळ्या ताज्या फळांची सरबते, ज्यूस सहज व पट्कन बनवू शकतो. अशी घरीच बनविलेले सरबत/ज्यूस आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम. तर आज ताजा मस्त थंडगार कलिंगड -डाळींब ज्यूस बनवू साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* कलिंगडाच्या साल काढून केलेल्या चौकोनी फोडी २ मोठ्या वाट्या
* डाळींबाचे दाणे २ वाट्या
* साखर १ टेस्पून (ऐच्छीक)
* सैंधव मीठ चिमूटभर

कृती :-
प्रथम कलिंगडाच्या फोडी व डाळींबाचे दाणे मिक्सरमधे हलकेच फिरवून घ्यावेत. साखर घालायची असल्यास आताच घालावी.

नंतर  गाळणीने गाळून घ्यावे. चोथ्यामधे एक ग्लास थंडगार पाणी घालून व्यवस्थित चमच्याने चोथा दाबून रस काढून घ्यावा.

आता तयार ज्यूस ग्लास मधे घालून चिमुटभर सैंधव मीठ व बर्फाचा खडा (ऐच्छीक) घालून प्यायला द्या.

टिप :-
*मिक्सरमधून फिरवताना फार वेळ फिरवू नये. हलकेच दोन -तिनदा चालू-बंद करत वाटावे. जेणेकरून बीया वाटल्या जाऊ नयेत.
* फुडप्रोसेसर ज्यूसर असेल तर त्यातच वाटावे. गाळायची गरज उरत नाही.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

07 April 2017

मँगो फ्रूटी (Mango Frooti)

No comments :

उन्हाळा म्हटले की कांही थंडगार प्यावे वाटते. तशातच मुलांना उन्हाळी सुट्टी असते. मुलांना तर सतत काही ना काही खायला व खाऊन झाले की प्यायला असे चक्र चालूच रहाते. तर बाजारी पेय विकत आणण्यापेक्षा आपण घरीच मसाला ताक, लस्सी, कोकंम सरबत, लिंबू सरबत, जलजिरा, कैरीचे पन्हे, मँगो फ्रूटी  अशी पेयं आलटून -पलटून  तयार करून फ्रिजमधे ठेवावी. घरातले स्वच्छ पाणी वापरून केलेली पेय असल्याने पोटाला बाधिक होण्याची पण भिती नसते. तर आता आंब्याचा सिझन चालू आहे, सर्वाना आवडती अशी "मँगो फ्रूटी" करूया. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मोठा हिरवा कच्चा आंबा (कैरी)- १
* पिकलेले आंबे २
* साखर मोठी पाऊण ते एक वाटी
* पाणी साधारण ४ ग्लास

कृती :-
प्रथम कच्चा व पिकलेला दोन्ही आंबे स्वच्छ धुवून साल काढून घ्यावेत.

नंतर दोन्ही आंब्याच्या  चपट्या छोट्या फोडी करून घ्याव्यात व  कुकरच्या स्टील डब्यात घालून फोडीत पाणी न घालता शिजवून मऊ करून घ्याव्यात.

आता साखरेमधे, साखरेच्या निम्मे पाणी घालावे व गँसवर ठेवावी. सतत ढवळत रहावे. साखर विरघळून उकळू लागले की देान मिनिटानी गँस बंद करावा. साधारणपणे गुलाब जामुनच्या पाकासारखा पाक असावा.

आता शिजलेल्या आंब्याच्या फोडी व पाक दोन्हीही थंड होऊ द्यावे.

नंतर मिक्सरमधे आंब्याच्या फोडी घालून त्यावर निम्मा साखरेचा पाक घालावा व फिरवून काढावे. परत मधे  मिक्सर उघडून राहीलेला पाक न गरजेनुसार थंड पाणी घालून फिरवावे

तयार फ्रूटी गाळणीने गाळून बाटलीमधे भरून फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावी. लगेचच प्यायची किवा द्यायची असल्यास ग्लासमघे आईसक्यूब घालावेत .

टिप :- आवडीनुसार साखरेचे व पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करावे. परंतु थोडे दाटसर व आंबटसर चविचीच "मँगो फ्रूटी " अधिक चवदार  लागते.

अत्यंत कमी साहित्यामघे व पट्कन होणारी अशी ही फ्रूटी अतिशय सुंदर चवीची लागते. तुम्हीही करून बघा, नक्की आवडेल. कशी झाली ते सांगायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

20 April 2016

पुदीना जलजीरा (Pudina Jaljeera)

No comments :
जलजीरा हे एक उन्हाळ्यात पिण्याचे थंड व पाचक पेय आहे. बाजारात तयार पावडर मिळते. परंतु त्यापेक्षा ताजे घरीच तयार केले तर चव खुप छान लागते. यातील जीरे, कोथिंबिर, पुदीना हे घटक आतून थंडावा देणारे तर आले सैंधव मीठ, हींग हे पाचक घटक आहेत. उन्हाळ्यात घशाला कोरड पडणे, डिहाइड्रेशन, उन्हाळी लागणे अशा उन्हाळी विकारांवर तर अतिशय उपयुक्त आहे. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहीत्य :-
* जीरे २ टेस्पून
* सैंधव मीठ १टीस्पून
* पांढरे मीठ १/२ टीस्पून
* हींग १/४ टीस्पून
* आमचूर पावडर १ टेस्पून
* पुदीना पाने १ वाटी
* कोथिंबीर १ वाटी
* आलं एक इंच
* लिंबू २ नग
* थंड पाणी ४ ग्लास

कृती :-
प्रथम जीरे भाजून कुटून घ्या. नंतर कोथिंबीर, पुदीना व आलं धुवून मिक्सरमधे वाटून पेस्ट करा.

एका जारमधे पेस्ट काढा. त्यामधे लिंबू पिळा. पाणी घाला. आता जीरा पावडर, सैंधव मीठ, पांढरे मीठ, हींग व आमचूर पावडर घाला. व्यवस्थित ढवळा.

थंडगार प्यायला द्या. आवडत असेल तर ग्लास मधे वरून बर्फ घाला.

चवीला तर छान लागतेच व रंगपण हिरवा थंड नेत्रसुखद वाटतो. करायलाही सोपे आहे. तुम्हीही करून बघा. व कसे झाले ते इथे सांगायला विसरू नका.

टीप :- जीरे, सैंधव मीठ, मीठ, हींग व आमचूर पावडर एकत्र करून पावडर, हवाबंद डबीत भरून ठेवा. व ऐनवेळी पुदीना,कोथंबिर पेस्ट व लिंबूरस ग्लास मधे घ्या त्यामधे गार पाणी किवा सोडा घाला व वरून ही तयार पावडर टाका चमच्याने ढवळा. झटपट तयार!
तसेच ही पावडर ताका मधे घालून प्यायलाही छान लागते. 
किंवा नुसत्या थंडगार पाणी/ सोडा मधे घालून प्यालो तरी चालते.जल व जीरा!

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

लिंबू सरबत (Lemon Sharbat)

No comments :

लिंबू सरबत सर्वांच्या परिचयाचे आहे. उन्हाळ्यात तर हमखास प्रत्येक घरी, अधून-मधून केले जातेच. कधि घरच्यांच्या साठी तर,कधी घरी आल्या- गेल्यांसाठी! लिंबू मधे विटामिन 'सी' भरपूर असते. तसेच पाचक व तहान शमवणारे आहे. सहजसोपे व पट्कन होणारे आहे.

साहीत्य :-

* लिंबू 2 नग
* थंड पाणी  4 ग्लास
* पिठी साखर 2 टेस्पून
* मीठ चविनूसार
* वेलचीपूड (ऐच्छिक)

कृती :-
       प्रथम एका भांड्यामधे पाणी घ्या. त्यामधे मीठ, साखर घालून ढवळा व साखर विरघळवून घ्या.

आता लिंबू हाताने जमिनीवर दाबून फिरवून मऊ करा व आडवे चिरून दोन भाग करा. लिंबू यंत्रातून दाबून रस काढून मीठ,साखर विरघळलेल्या पाण्यात घाला. वरून वेलचीपूड घाला  व व्यवस्थित ढवळून थंडगार प्याला द्या.

टीप :- सरबत करायच्या 15 मिनिट आधि लिंबू फ्रिज मधून बाहेर काढून कोमट पाण्यात टाकल्यास रस जास्त निघतो.

19 May 2015

कलिंगड ज्यूस (Watermelon Juice )

No comments :

कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातिल पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळाचे अजून बरेच काही फायदे व उपयोग आहेत. कोणतेही फळ शक्यतो चिरूनच खावे. परंतू काहीवेळा वृध्द,लहान आजारी माणसांना रस काढून देणे आवश्यक असते .तर कसा काढावा ते पहा -

* प्रथम कलिंगड चिरून त्यातील बिया काढून  लहान फोडी करून घ्या. फोडी करताना त्यातील फक्त  लाल भागच घ्यावा.रस पण छान लाल व गोड होतो.

* नंतर मिक्सर किंवा ब्लेडरमधे पाणी न घालता फोडी घुसळाव्यात. घुसळताना त्यामधे एक-दोन टेस्पून गुलकंद घालावा .म्हणजे गोडीपण वाढते व उन्हाळ्यात गुलकंद थंड असतो शरीराला.

* नंतर तयार रस मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावा व त्यामधे आवडीप्रमाणे सैधव मीठ व चाट मसाला घालावा.

* आता छानश्या ग्लासमधे घालून सजावटीला वरून पुदीन्याची पाने ,एखाद दुसरा कलिंगडाचा लहान तुकडा व आईसक्यूब घालून सर्व्ह करा.

टीप :- या ज्यूसमधे आपण बरीच विविधता आणू  शकतो. गुलकंदा ऐवजी पुदीन्याची पाने , तर कधी तुळशी , रूहअब्जा कधी लिंबू पिळावे.

जर बर्फ चालत नसेल तर आधीच कलिंगड चिरून गार होण्यासाठी फ्रिजमधे ठेवावे.नंतर रस काढा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.