20 April 2016

पुदीना जलजीरा (Pudina Jaljeera)

No comments :
जलजीरा हे एक उन्हाळ्यात पिण्याचे थंड व पाचक पेय आहे. बाजारात तयार पावडर मिळते. परंतु त्यापेक्षा ताजे घरीच तयार केले तर चव खुप छान लागते. यातील जीरे, कोथिंबिर, पुदीना हे घटक आतून थंडावा देणारे तर आले सैंधव मीठ, हींग हे पाचक घटक आहेत. उन्हाळ्यात घशाला कोरड पडणे, डिहाइड्रेशन, उन्हाळी लागणे अशा उन्हाळी विकारांवर तर अतिशय उपयुक्त आहे. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहीत्य :-
* जीरे २ टेस्पून
* सैंधव मीठ १टीस्पून
* पांढरे मीठ १/२ टीस्पून
* हींग १/४ टीस्पून
* आमचूर पावडर १ टेस्पून
* पुदीना पाने १ वाटी
* कोथिंबीर १ वाटी
* आलं एक इंच
* लिंबू २ नग
* थंड पाणी ४ ग्लास

कृती :-
प्रथम जीरे भाजून कुटून घ्या. नंतर कोथिंबीर, पुदीना व आलं धुवून मिक्सरमधे वाटून पेस्ट करा.

एका जारमधे पेस्ट काढा. त्यामधे लिंबू पिळा. पाणी घाला. आता जीरा पावडर, सैंधव मीठ, पांढरे मीठ, हींग व आमचूर पावडर घाला. व्यवस्थित ढवळा.

थंडगार प्यायला द्या. आवडत असेल तर ग्लास मधे वरून बर्फ घाला.

चवीला तर छान लागतेच व रंगपण हिरवा थंड नेत्रसुखद वाटतो. करायलाही सोपे आहे. तुम्हीही करून बघा. व कसे झाले ते इथे सांगायला विसरू नका.

टीप :- जीरे, सैंधव मीठ, मीठ, हींग व आमचूर पावडर एकत्र करून पावडर, हवाबंद डबीत भरून ठेवा. व ऐनवेळी पुदीना,कोथंबिर पेस्ट व लिंबूरस ग्लास मधे घ्या त्यामधे गार पाणी किवा सोडा घाला व वरून ही तयार पावडर टाका चमच्याने ढवळा. झटपट तयार!
तसेच ही पावडर ताका मधे घालून प्यायलाही छान लागते. 
किंवा नुसत्या थंडगार पाणी/ सोडा मधे घालून प्यालो तरी चालते.जल व जीरा!

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment