आमसुल किंवा कोकम किंवा यालाच कोकणात रातांबा असेही म्हणतात. कोकम कोकण, गोव्याची खासियत आहे. ही आंबट -गोड चविची रसाळ फळे असतात. कच्ची असताना रंग हिरवा असतो. पिकल्यावर लाल रंग येतो. या पिकलेल्या लाल फळांच्या रसापासून "कोकम सरबत" केले जाते. या सरबतापासून प्रकृतिला थंडावा मिळतो. उन्हाळी उष्णतेच्या अनेक विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी रोज एक ग्लास हे सरबत प्यावे. पित्तशामक आहे. उन्हाळ्यात बाजारी रंग-बिरंगी कृत्रिम सरबत पिण्यापेक्षा हे आयुर्वेदीक सरबत उत्तम आहे. कोकम सरबताला फ्रिजमधे ठेवायची आवश्यकता नहीं. बाहेरही वर्षभर टिकते. कोकमची फळे उन्हाळी सिझनमधे येतात. याच्या रसापासून सरबत (किंवा याला "आगळ " ही म्हणतात) तयार केले जाते. शक्य असेल तर फळे विकत आणून घरीच करून ठेवावे. अथवा आजकाल बाजारात तयार आगळ मिळते. घरी आणून गरजेनुसार साखर, मीठ,पाणी घालून सरबत तयार करावे. कोकम सरबत कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
अर्क तयार करण्यासाठी,
* कोकम फळे १ किलो
* साखर फळे बुडतील इतकी. अंदाजे २ ते २.५ किलो
सरबतासाठी,
* मीठ चिमूटभर (ऐच्छीक)
* जिरेपूड
* लिंबू स्वादासाठी (ऐच्छीक)
* अर्क १भाग +पाणी ३ भाग
कृती :-
प्रथम कोकमची लाल पिकलेली फळे आणून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर चाकूने चिरा माराव्यात.
नंतर त्यामधे साखर मिसळून बरणीत भरून ४ -६ दिवस ठेवावे. मधून मधून बरणी हलवत रहावी.
चार-सहा दिवसांनी भरपूर रस सुटतो.हा रस गाळणीने गाळून बाटलीमधे भरून ठेवावा. हा झाला अर्क किंवा आगळ. हे वर्षभर टिकते.
आता गरजेनुसार जेव्हा प्यायचे तेव्हा एका भांङ्यामधे एक भाग आगळ व तीन भाग थंड पाणी घालावे.
त्यामधे आवडीनुसार जिरेपूड, मीठ व लिंबू घालून ढवळावे व थंडगार प्यायला द्यावे.
आंबट -गोड चवीचे कोकम सरबत खूप सुंदर लागते व तहान भागते. रंगही आकर्षक लाल दिसतो.
टिप :
* तयार करून ठेवलेले आगळ सोलकढी साठी किंवा आमटी, भाजीत स्वयंपाकातही वापरता येते .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment