02 November 2018

शेव (Shev)

No comments :

दिवाळीचा फराळ म्हटले की, चिवड्याच्या जोडीला शेव पाहीजेच.शेवेचे बरेच प्रकार बनविले जातात. बारीक, मोठी, पालक शेव, लसूण शेव..  पण मला सहसा मसाला शेवेचा प्रकार आवडतो. कशी करायची साहित्य व कृती-

साहित्य :-
* डाळीचे पीठ १/२ किलो
* तेल ५० मिली.
* पाणी ५० मिली.
* मीठ २ टीस्पून
* लाल मिरचीपूड ४-५ टीस्पून
* हिंग २ टीस्पून
* ओवा १ टीस्पून
* जीरे १ टीस्पून
* हळद १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम बेसनपीठ चाळून घ्यावे. म्हणजे त्यामधे गुठळ्या रहात नाहीत. नंतर ओवा व जिर्याची बारीक पावडर करून घ्यावी.

आता एका बाऊलमधे तेल व पाणी एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये वरील साहित्यात दिलेला मसाला घालावा व हेड ब्लेंङरने सर्व चांगले फेटावे.असे फेटल्यामुळे मसाला नीट विरघळतो व फेटल्यामुळे शेव हलकी खुसखूषीत होते.सोडा वापरण्याची गरज रहात नाही.

आता फेटलेल्या मिश्रणात डाळीचे पीठ घालावे व गरजेनुसार पाणी घालून मळावे. साधारण 200 मिली. पाणी लागते. पीठ फार सैल किंवा घट्ट नको. पीठ अति घट्ट ठेवल्यास घालायला त्रास होतो व शेव कडक होते.तसेच पीठ सैल ठेवल्यास शेवेची प्लेन काडी न येता एकमेकाला चिकटल्याने नागमोडी आकार येतो. पीठ मळून दहा मिनिटे सेट होण्यासाठी झाकून ठेवावे.

दहा मिनिटा नंतर गरम तेलामधे शेव तळून काढावी.तेल अती गरम नको.शेव लाल होते. फार गारही नको मध्यम असावे. शेव लवकर तळली जाते.तेलात घातल्यावर बुडबुडे थांबले की पलटावी व दुसरीकडून तळून घ्यावे.

शेव गार झाली की हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment