श्रीखंड हा पदार्थ गुजरात मधून आला. आता मात्र जगभरात स्वीटडीश म्हणून खाल्ला जातो. श्रीखंड श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ असल्याने त्याच्या नैवेद्यासाठी सुध्दा वापरतात. थंडगार, मलईदार गोड श्रीखंड जेवणात पक्वान्न म्हणून पण केले जाते. तसे तर एरव्ही विकतचे निरनिराळ्या कंपन्यांचे तयार श्रीखंड आणून खाल्ले जातेच. परंतु खास मराठी नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे गुढीपाडव्याला आमच्याकडे हमखास धरी चक्का बांधून. श्रीखंड केले जाते. अगदी चक्यासाठीचे दहीपण घरीच केले जाते. तसेच आंब्याच्या सिझन मधे 'आम्रखंडही' केले जाते.मी आंब्याचा सिझन संपता संपता थोडा आमरस फ्रिजरला साठवला होता. तर मी आम्रखंड केले.मलईदार,मधुर चवीचे 'आम्रखंड' कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• फुल क्रीम दूध ३ लिटर
• दही पाव कप
• साखर १ किलो
• पिकलेल्या आंब्याचा रस - १कप
• वेलची पावडर १०-१२ वेलचीची
• मीठ पाव टीस्पून
कृती :-
प्रथम दूध एका मोठ्या पातेल्यात ओतून फक्त कोमट करून घ्यावे. ( पुर्ण तापवून, त्यावरची साय काढून नंतर कोमट करून घेऊ नये)
आता कोमट केलेल्या दुधामध्ये पाव कप दही ( फार आंबट ,शिळे नसावे) घालावे व डावाने हलवून घ्यावे व साधारण ६-८ तास ताटली झाकून कडेला ठेऊन द्यावे. विरजण लागते.
आता ६ तासांनी भांडे थोडेसेच हलवून पहावे, घट्ट दही लागलेले असेल. किंवा छोटा चमचा दह्यात एका बाजूला घालून चमच्याने दही काढून बघावे. त्याजागी लगेच पाणी दिसते. दही तयार झाले.
आता दही एका मलमलच्या स्वच्छ सुती कापडावर मोठ्या डावाने काढावे.त्याआधी एका भांड्यावर पीठाची चाळणी ठेवावी व त्यावर कापड पसरावे आणी त्यावर दही काढावे व कापडाची गाठ मारून त्यावर वजन ठेवावे. म्हणजे दह्यातील पाणी गळण्यास सोपे होते.
आता साधारण ६-१०तासांनी दह्यातील पाणी पुर्णपणे निथळते व घट्ट चक्का तयार होतो. ३ लिटर दुधाचा १ ते १.२५० किलो चक्का होतो. दुधाच्या घट्टपणावर चक्क्याचे प्रमाण अवलंबून असते. दूध जितके चांगले घट्ट, तेवढा चक्का अधिक होतो. जेवढा चक्का तेवढीच साखर घ्यावी.
आता चक्का कापडातून काढून चाळणीवर घासून घ्यावा. किंवा पुरण यंत्रातून फिरवून घ्यावा. म्हणजे गुठळ्या रहात नाहीत व एकसंध चक्का तयार होतो. आत्ताच आंब्याचा रस सुध्दा चाळणीवर चमच्याने घासून गाळून घ्यावा.
नंतर तयार चक्क्यामधे ,साखर मिक्सरमधून फिरवून मग मिसळावी.( साखर थोडी बारीक केली की लवकर विरघळते) मीठ, वेलची पावडर घालावे व चक्का चांगला डावाने घोटावा .म्हणजे साखर, मीठ व्यवस्थित मिसळून विरघळते .अर्धा तास चक्का तसाच झाकून ठेवावा.
अर्ध्या तासानंतर आपले मस्त मलाईदार तयार 'आम्रखंड' लहान -लहान दोन तीन डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.
गरजेनुसार एक एक आम्रखंडाचा डबा फ्रिजमधून काढून पोळी /पुरी सोबत फस्त करावा. किंवा आईस्क्रीम सारखे नुसतेच स्वीटडीश म्हणूनही खाता येते. पाहुणे मंडळी येणार असतील किंवा सणवार असेल तर त्या हिशेबाने आधीच तयार करून ठेवले तरी चालते.
घरचे अवीट गोडीचे 'आम्रखंड' तुम्हीही लगेच करून बघा. एकदा घरच्या मलईदार श्रीखंड किंवा आम्रखंडाची चव जिभेला लागली तर विकतचे कोणत्याही कंपनीचे आवडणार नाही. याची खात्री देते तुम्हाला.
टिप्स :
• एकदा चक्का तयार झाला की आवडीनुसार केशर, ड्रायफ्रूट्स किंवा निरनिराळ्या फळांचे गर/ क्रश इसेन्स मिसळून कोणत्याही स्वादाचे श्रीखंड तुम्ही घरी बनवू शकता.
• दूध फुल फँटचेच घ्यावे.
• हवामानानुसार दही लागण्याला कमी-अधिक वेळ लागतो.
• साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी. अथवा शुगरफ्री पावडर वापरावी.मधुमेही पेशंटना खाता येते.
• दह्यातून निथळलेले पाणी अतिशय पौष्टिक असते. (व्हे प्रोटीन असते) ते टाकून न देता फ्रिजमधे ठेऊन रोजच्या स्वयंपाकात कणिक मळताना, भाजी,डाळ शिजवताना वापर करावा. किंवा ताकात मिसळून प्यावे. कढी करावी.
आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.