22 February 2018

चिंचेचा भात (Tamarind Rice)

No comments :

दक्षिणेकडे भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे भाताचेच विविध प्रकार केले जातात. हा चिंच राईस तेलगू मधे "पुलिओरा" (pulihora Rice) म्हणून ओळखला जातो. एक-दोन वेळा बालाजी मंदिर मधे प्रसाद म्हणून दिलेला हा भात खाल्ला. मला खूप आवडला. म्हणून चवीवरून व गुगलवरून त्याची रेसिपी शोधून मी    सेम टेस्टचा "चिंचेचा भात " केला. सर्वाना हा भाताचा प्रकार आवडला, तेव्हापासून आमच्या घरी वरचेवर, रात्रीच्या जेवणात फारशी भूक नसेल तर वन डिश मिल म्हणून हा भात बनतो. कसा केला साहित्य व कृती-👇

साहित्य -
* शिजवलेला भात २ वाट्या
* चिंचेचा कोळ पाव वाटी
* सुक्या लाल मिरच्या २
* कढीपत्ता
* उडीद डाळ १ टीस्पून
* चणा डाळ १ टीस्पून
* शेंगदाणे मुठभर
* मीठ चवीनुसार
* गुळ सुपारीइतका
* हळद  ( ऐच्छीक)
* फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम कढईत तेल गरम करून त्यामधे हिग, मोहरी, जीरे तडतडवून घ्यावेत.

नंतर त्यामधे लाल मिरची, कढीपत्ता, डाळी व शेंगदाणे घालून तांबूस परतावे.

आता त्यात चिंचेचा कोळ, मीठ, गूळ घालून मिश्रण घट्ट होऊन तेल सुटेपर्यंत परतावे व शेवटी शिजलेला भात घालून परतावे. भात तयार!

तयार चिंचेचा भात गरमा-गरम सर्व्ह करावा. सोबत लोणचे, पापड द्या. अतिशय रूचकर लागतो. पोट भरते.

टिप 

* भात मोकळा शिजलेला असावा. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

07 February 2018

झटपट लिंबू लोणचे (Instant Lemon Pickle)

1 comment :

लिंबाचे लोणचे अनेक वेगवेगळ्या पध्दतिने बनविले जाते. मुळात लोणचे म्हटले की च, तोंडाला पाणी सुटते. त्यात लिंबूचे लोणचे आवडत असेल तर याला मुरायला बरेच दिवस लागतात. तर असे झटपट होणारे लोणचे केले तर कोणाला नाही आवडणार? हे लोणचे मुरायची वाट बघायची अजिबात गरज नाही. लिंबू बाराही महीने उपलब्ध असतात. गरजेनुसार थोडेच लिंबू आणून ताजेच केले तरी चालते. हे लोणचे लहान मुलांना किंवा वृध्द लोकांना अधिक आवडते गोडसर चविचे व चावावे लागत नाही. तर याचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* लिंबू मध्यम आकाराचे १२ -१५ नग
* साखर १ /२ किलो ( अडीच कप)
* मीठ लहान अर्धी वाटी
* तयार लिंबू लोणचे मसाला ५० ग्रँम

कृती :-
प्रथम लिंबू स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करून घ्यावेत. नंतर चिरून एका लिंबाच्या आठ फोडी करून त्यातील सर्व बिया काळजीपूर्वक काढाव्यात.

आता बी काढलेल्या फोडी मिक्सरमधे वाटायच्या व गर बाऊलमधे काढून घ्यायचा. वाटताना एकदम गुळगुूळीत पेस्ट करायची नाही बरकां..थोडं मोटसरच ठेवायचे, खाताना क्रंची क्रंची छान लागते. नंतर यात साखर, मीठ व मसाला मिसळायचा. मस्तपैकी सर्व साहित्य एकत्र ढवळायचे व साखर विरघळून घ्यायची . झाले लोणचे तयार!

हे चटकदार लोणचे पराठा, मसाला पुरी, चपातीला लावून खाता येते. मुलांच्या डब्यात ब्रेडला लावून देता येते. अगदी रोजच्या जेवणात चटक -मटक करून मधे मधे चाटून खायला मस्त लागते, तोंडाला चव येते.

तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल कारण झटपट तर होतेच शिवाय अतिशय कमी साहीत्यात होते. शिवाय केल्यावर मुरेपर्येत बरणीकडे बघत बसायला नको. लगेच खाता येते हे जास्त चांगले. लिंबू व मसाला तयार असेल तर अगदी १५ मिनीटांत तयार होते.

टिप्स :
* लिंबू ताजे व रसरशीत पिवळ्या रंगाचे असावेत.
* लिंबाच्या आकारमानानुसार व आवडीनुसार साखर, मीठ कमी-जास्त करावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.