मोठा आवळा! यालाच डोंगरी आवळा असेही म्हणतात.औषधी व अतिशय गुणकारी असा हा आवळा,दिवाळी नंतर साधारण तुळशीच्या लग्नापासून बाजारात यायला लागतो. ते डिसेंबर पर्यंत असतो.डिसेंबर मधे एकदम परिपक्व म्हणजे वर्षाचे लोणचे,सुपारी,मोरावळा करण्यास योग्य असे आवळे असतात. आयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.आवळ्यामधे लोह व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.कोणत्याही रुपात आवळा खाल्ला तर तो आरोग्यदायी आहे.परंतु वर्षभर मिळत नसल्याने वेगवेगळ्या स्वरूपात साठविला जातो.आवळा खाल्याने दृष्टि तेज होते. पित्त, कफ कमी होते. त्वचेला चमक येते व त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच ह्रदयासाठी पण आवळा उत्तम आहे. रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. आवळ्यापासून बरेच पदार्थ करून वर्षभरासाठी साठविले जातात. जसे की, सुपारी,आवळा कँडी, लोणचे, सरबत, मुरांबा. केस काळेभोर रहाण्यासाठी केसांनाही लावण्यासाठी आवळा सुकवून पावडर करून ठेवली जाते. अशा बहूगुणी आवळ्याचा 'मुरंबा' म्हणजेच 'मोरावळा' कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* आवळे १/२ किलो
* साखर १/२ किलो
* वेलचीपूड ऐच्छीक
* सुंठ पावडर ऐच्छीक
* सैंधव मीठ चिमूटभर
कृती :-
मोरावळ्यासाठी आवळे घेताना साधारण तांबूस छटा असलेले, न डागाळलेले चांगले कडक व ताजे आवळे निवडून, वेचून घ्यावेत. असे आवळे चांगले रसाळ व आंबट -तुरट चवीचे असतात.
प्रथम बाजारातून आणलेले निवडक आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.
नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला *आतपर्यंत टोचून भोके पाडावीत.
आता टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच मिनीट उकळून द्यावे. आवळे पांढरट दिसू लागतात.*आता पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच साखर मिसळून घ्यावी.*एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी साखर विरघळून पाणी सुटलेले असेल तर आता मंद गँसवर पातेले ठेवावे.(वेगळे पाणी घालू नये) सतत ढवळत रहावे. साखरेचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील तर आताच वेलची पूड, मीठ घालावे व गँस बंद करावा. साधारणपणे अर्धा तास तरी लागतो. पाक मधासारखा असावा. अति घट्ट किंवा पातळ नको.
गार झाल्यावर मोरावळा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. तीन- चार दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य आंबट -गोड - तुरट चवीचा होतो. पाक आतपर्यंत मुरला जातो. हा मोरावळा फ्रिजशिवाय बर्षभर टिकतो.
असा मुरलेला एक आवळा रोज सकाळी अनशापोटी खाल्ला व वरून कोमट पाणी प्याले तर अतिशय आरोग्यदायी असते. ज्यांना पित्त किंवा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो त्यानी आवर्जून हा उपाय करावा.
टिप्स :
* जर वेळ नसेल तर साखर मिसळून एक रात्र न ठेवता, साखरेचा दोनतारी पाक करून त्यामधे उकडलेले आवळे घालावे. परंतु या पध्दतीत पाण्याचा वापर असल्याने मोरावळा जास्त कालावधीपर्यत टिकण्यात साशंकता निर्माण होते.
* आवळे आतपर्यंत नीट टोचून घ्यावेत.पाक चांगला मुरतो.
* आवळे उकडलेले पाणी टाकून न देता, त्यात मीठ, साखर घालून सरबत करून प्यावे. अथवा आमटी, भाजी, पराठे करताना वापरावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.