हिवाळ्यात सर्व भाज्या,फळे भरपूर प्रमाणात येतात.अन् खाल्लेही जातात. तर याच दिवसात लाल चुटूक रंगाच्या व हिरवे देठ असणार्या स्ट्राँबेरी बाजारात येतात.आंबट - गोड चवीच्या पिकलेल्या खूप छान लागतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी पण उत्तम फळ आहे. यामधे विटामिन बी व सी भरपूर असते. शिवाय प्रोटीन, फाइबर, पोट्याशियम, मैग्नीशियम, फास्फोरस,आयोडीन अशीही तत्वे आहेत. स्ट्राँबेरी अनेक रोगाशी लढण्याची ताकद देते. जसे उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, कँंन्सर, डायबिटीज.शिवाय स्ट्राँबेरी सेवनाने पोट साफ रहाण्यास मदत होते. स्मरणशक्ति चांगली रहाते. डिप्रेशन कमी होते. महत्वाचे म्हणजे वजन घटण्यास मदत होते. म्हणून स्ट्राँबेरी ला सुपर फुड असेही म्हटले जाते. हे सर्व फायदे पाहून मी बाजारातून नेहमीच स्ट्राँबेरी आणते.पण नुसती खाऊन कंटाळा आला.म्हणून क्रश,बर्फी असे पदार्थ केले. या आधी च्या रेसिपीमधे क्रश केलाय. तेच वापरून ही बर्फी केली. कशी केली साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• खोवलेले ओले खोबरे २ कप
• साखर २ कप
• स्ट्राँबेरी क्रश १/२ कप
• मिल्क पावडर १/२ कप
• फ्रेश क्रिम १ कप
• तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी
कृती :-
प्रथम खोवलेले खोबरे +साखर मिक्सरमधून वाटून घ्यावी.
आता जाड बुडाच्या कढईत वाटलेले मिश्रण घालून मध्यम आचेवर शिजत ठेवावे.सतत ढवळत रहावे. अन्यथा मिश्रण तळाला करपू शकते.
आता मिश्रण अर्धे शिजले की फ्रेश क्रिम घालावे व सतत ढवळत रहावे.
आता कढईच्या कडेने मिश्रण कोरडे होण्यास सुरवात झाली की मिल्क पावङर घालावी. गँसची आच मंद करावी व सतत ढवळत रहावे. पांच ते दहा मिनिटानी मिश्रणाचा गोळा होतो व कढईपासून सुटू लागतो. आता गँस बंद करावा. मिश्रणाचे दोन भाग करावेत व एक भाग तूप लावलेल्या ताटात पसरवून वाटीने दाबावा. दुसरा कढईत तसाच राहू द्यावा. ही सर्व क्रिया झटपट करावी. अन्यथा मिश्रण खळखळीत कोरडे होते व वडी थापली जात नाही.
आता कढईमधे मिश्रणाचा जो अर्धा भाग आहे, त्यामधे स्ट्राँबेरी क्रश घालावे व पुन्हा पाच मिनिट गँस चालू करून शिजवावे.
नंतर आधीच जे पांढरे मिश्रण ताटात पसरलेय त्यावर हे स्ट्राँबेरी चे मिश्रण पसरावे. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित थापून घ्यावे. थोडे सेट झाले की चाकूने आडव्या उभ्या रेषा पाडाव्यात.
आता पुर्ण गार झाल्यावर ही आकर्षक व सुंदर चवीची बर्फी डब्यात भरून ठेवावी.
टीप्स :
*,फ्रेश क्रिम च्या ऐवजी घरच्या एक लिटर दूधावरची जाड साय व एक कप दूध घेतले तरी चालते.
• साखरेचे प्रमाण थोडे कमी-जास्त केले तरी चालते.
° खोबरे कायम खवणीने खोवून नंतरच मिक्सरमधे वाटावे.अन्यथा बर्फीला अपेक्षित आकर्षक रंग येत नाही.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.