रोज तीच तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो.म्हणून पोळी भाजीसारखेच पण थोडी वेगळी म्हणजे कधी पराठे तर कधी पुरी भाजी असे पदार्थ केले जातात.आज विचार केला 'गार्लिक नान' करावेत. तेवढाच जेवणात बदल म्हणून केले.पुढे साहित्य व कृती पहा.
साहित्य :-
• गव्हाचे पीठ २ कप
• दही १/२ कप
• पाणी १/२ कप
• बेकींग पावडर १/२ टीस्पून
• सोडा १/४ टीस्पून
• मीठ १/२ टीस्पून
• साखर १ टीस्पून
• तेल २ टीस्पून
• बारीक चिरून कोथिंबीर
• कलौजी १ टेस्पून
• बारीक चिरून किंवा खिसून लसूण ८-१० पाकळ्या
• बटर ऐच्छिक
कृती:-
प्रथम गव्हाचे पीठ चाळून एका बाऊलमधे घेऊन त्यामधे दही, मीठ, साखर, बेकींग पावडर, सोडा व एक चमचा तेल घालून एकत्र करावे.
नंतर त्यामधे अर्धा कप कोमट पाणी घालून कणिक सैलसर अशी चांगली मळून घ्यावी. मळलेल्या गोळ्याला तेलाचा हात लावून किमान १५- २० मिनीटे झाकून ठेवावे. ( रात्री भिजवले व दुसरे दिवशी सकाळी नान केले तर अधिकच चांगले)
एव्हाना आता कणिक चांगली फुलली असेल .परत थोडी मळा व लहान लहान गोळे करावेत. इतक्या साहित्यात सहा गोळे म्हणजे सहा नान होतात.
आता एक गोळा घेऊन, पोलपाटावर थोडे सुके पीठ पसरून लंबगोल आकाराचे किंवा गोल आकाराची थोडी जाडसर पोळी लाटून किंवा हाताने पसरून त्यावर थोडी कलाौजी , लसूण व कोथिंबीर पसरावी व हाताने अलगद दाबावी किंवा अलगद लाटणे फिरवावे .
नंतर पोळीची मसाला लावलेली बाजू पोलपाटावरच उलटी करून टाकावी व वर आलेल्या बाजूवर ब्रशने किंवा हातानेच पाणी लावावे .
आता मध्यम आचेवर तापलेल्या तव्यावर पाण्याची बाजू तव्याला चिकटेल अशा बेताने पोळी तव्यावर टाकावी.
दोन मिनीटांनी लहान लहान फुगे येऊ लागतात तर आता तवा हँंडलला धरून अथवा चिमट्यात धरून गँसच्या ज्वाळेवर उलटा धरून पोळी खरपूस भाजून घ्यावी.
आता तवा सरळ करून भाजलेल्या पोळीवर बटर लावावे व गरमा गरम खुसखूशीत 'गार्लिक नान' छोले मसाला किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही ग्रेव्ही सब्जी सोबत खावा.
टीप:
• लसूण कणिक मळतानाच पीठामधे घातला तरी चालतो. परंतु काही वेळा कोणाला प्लेन म्हणजे लसूण नको असतो तर कोणाला पाहीजे असतो तर एकाच पीठात दोन्ही देता यावे म्हणून मी वरून लावले.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.