'वाटली डाळ ' यालाच कोणी 'मोकळी डाळ', 'खमंग डाळ' असेही म्हणतात. हा पारंपारिक पदार्थ आहे. मी फक्त कृतीमधे थोडा बदल केला आहे. जेणेकरून पट्कन व अधिक चविष्ट होईल यावर भर दिला. यामधे चण्याची डाळ असल्याने मुलांना खाण्यास पौष्टीक आहे. हा पदार्थ आपण जेवणात भाजीसारखा, दही घालून नाष्ट्याला, संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर,चहासोबत किंवा अगदी सहज स्नँक्स म्हणून येता -जाता वाटी चमच्यातून तोंडात टाकू शकतो. तसेच गणपती विसर्जनादिवशी प्रसादाला, नवरात्रि मधे देवीच्या प्रसादाला ही केला जातो. पारंपारिक पध्दतिने डाळ केल्यास थोडी जास्त वेळखाऊ प्रक्रिया होते म्हणून मी थोडी वेगळ्या पध्दतिने केली कशी ते पहा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* चणाडाळ २ वाट्या
* तेल १/४ (अर्धा) वाटी
* फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, हळद व कढीपत्ता
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हिरव्या मिरच्या ३ -४
* लसूण, आलं (ऐच्छीक)
* ओलं खोबरं, कोथिंबीर
* लिंबू
कृती :-
प्रथम डाळ स्वच्छ धुवून ३ -४ तास पाण्यात भिजत घालावी.
नंतर पाण्यातून उपसून काढावी व परत एक-दोनदा स्वच्छ धुवावी. १० मिनीटे एका चाळणीवर निथळत ठेवावी.
आता निथळलेली डाळ, जीरे, मीठ, साखर, आले-लसूण, मिरची सर्व एकत्र भरडसर वाटून घ्यावे.
नंतर हे सर्व तयार वाटण कुकरच्या डब्यामधे घालून वरून पाण्याचा शिपका मारून शिजायला लावावे. साधारण दोन शिट्ट्या काढाव्यात. (भाताप्रमाणे बाहेरच्या डब्यात पाणी घालून शिजवावे)
आता कुकरची वाफ जिरल्यावर शिजलेली डाळ ताटात काढावी व थोडी गार झाल्यावर हाताने मोकळी करावी किंवा गहू चाळण्याच्या चाळणी वर घासून घ्यावी.
आता मोकळी केलेली डाळ कढईत तेल गरम करून फोडणी करावी व त्यामधे घालावी. दोन-चार वेळा परतून एक वाफ काढा. झाली डाळ तयार.
आता तयार डाळीवर ओलं खोबरं कोथिंबीर व लिंबू घालून खायला द्यावी.
टिप्स :
* अशा पध्दतीने डाळ केल्याने डाळ फोडणी टाकल्यावर शिजेपर्यंत तळाला करपणयाची शक्यता रहात नाही. व्यवस्थित मऊ शिजून मोकळी रहाते. पारंपारिक पध्दतिने केली जाते त्यात मधे -मधे डाळीचे डिकळे रहातात व कच्ची रहाण्याची शक्यता असते व खाली लागू नये म्हणून तेलही जास्त लागते.
* वाटली डाळ प्रसादाला, नैवेद्याला करायची असल्यास लसूण आलं घालू नये. मात्र एरव्ही खायला करायची असल्यास जरूर घालावे, जास्त खमंग व चविष्ट लागते.