लोणी डोसा हा साऊथ इंडियन नाष्ट्याचा पदार्थ आहे. पोटभरीचा व पौष्टीक आहे. गरमा-गरम मऊ मऊ डोसा खायला खूप छान लागतो. तसेच करायला सोपा आहे. सहसा फसत नाही. कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* मोठा तांदुळ २ कप
* पोहे १ कप
* उडीद डाळ १/२ कप
* साबूदाणा १/२ कप
* मेथी दाणे १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* सोडा चिमूटभर गरजेनुसार
* लोणी आवश्यकतेनुसार
कृती 👇
प्रथम तांदुळ डाळ व साबूदाणा, मेथी चार -पाच तास स्वच्छ धुवून भिजत घालावेत.
नंतर सर्व एकत्र मिक्सरमधे वाटून एकदम मऊ पेस्ट करावी. वाटताना पोहे भिजवून घालावेत. तयार मिश्रण आठ तास अंबण्यासाठी ठेवावे.
आता आठ तासानंतर मिश्रण अंबून दुप्पट झाले असेल. त्यामधे चवीनुसार मीठ घालावे व ढवळावे. पीठ तव्यावर डावाने ओतले तर सहज धार पडावी व डोसा आपोआप पसरेल इतपतच पातळ ठेवावे. फार घट्ट अथवा पातळ नको.
आता बिडाचा किंवा आपल्याकडे जो असेल तो तवा गरम करण्यास ठेवावा. तवा खूप गरम नसावा. खूप तापला तर मिश्रण व्यवस्थित पसरत नाही. तवा सुरवातीला एकदाच पाणी शिंपङून कापडाने पुसावा व तेलाने ग्रीस करून घ्यावा. नंतर परत परत करावा लागत नाही.
आता गरम तव्यावर मोठ्या डावाने थोड्या उंचावरून पीठ ओतावे. पीठ आपोआप पसरेल. डावाने पसरायचे नाही. नाहीतर त्याचे टेक्सचर बिघडते. एक-दोन मिनिट झाकून ठेवावा. वरची बाजू शिजून छान जाळी पडते. मग आवडी नुसार त्यावर लोणी घालायचे व डोसा पलटी करायचा. खालची बाजू थोडी गुलाबी भाजली की डोसा तयार झाला.
तयार मऊ लुसलू़शित डोसा चटणी किंवा बटाटा भाजीसोबत खायला द्यावा.
टिप:
* लोणी शक्यतो घरचे पांढरे लोणी वापरावे. डोसा अधिक रूचकर लागतो.
* आपल्या आवडीनुसार डोश्याचा आकार ठेवावा. परंतु लोणी डोसा शक्यतो थोड्या लहान आकाराचाच असतो. साधारण चहाच्या बशीएवढ्या आकाराचा असतो.
* पीठ अंबण्याची क्रिया तापमावर अवलंबून असते. चांगले अंबून फुगले तर सोडा घालू नये.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.