चाट मधे पुरी नेहमीच वापरली जाते. तर थोडा वेगळा व आकर्षकपणा साठी ही चाटची कटोरी केली जाते. तसेच लहान मुलांची बर्थ-डे पार्टी किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर थोडा वेगळा म्हणून या कटोरी मधून चाट सर्व्ह करता येते. तसेच या कटोर्या आधीच करून हवाबंद डब्यात ठेवता येतात. त्यामुळे ऐनवेळी पटकन् हे चाट करता येते. तर कटोरीचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* मैदा १ कप
* मीठ चिमूटभर
* ओवा पाव टीस्पून
* मोहनसाठी गरम तेल २ टेस्पून
* तळणीसाठी आवश्यक तेवढे तेल
* पाणी
एवढ्या साहित्यात फोटोत दाखविलेल्या आकाराच्या पांच कटोर्या तयार होतात.
कृती :-
प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यामधे घ्यावा व त्यामधे मीठ, ओवा मिसळावा.
नंतर त्यामधे तेल गरम करून घालावे व पीठाला हाताने चोळावे. आता अंदाज घेत पाणी घालून घट्ट पीठ मळावे. दहा -पंधरा मिनिट झाकून ठेवावे. अंदाजे फक्त पाव कपच पाणी पुरते.
आता मंद आचेवर तेल गरम करावे. पीठाची लहान गोळी घ्यावी व मध्यम जाडीची पुरी लाटावी. त्यावर काटेचमच्याने टोचावे व एक वाटी त्यावर ठेऊन तिला पुरी लपेटावी व वाटीसह गरम तेलात सोडावी व मंद आचेवरच तळावी. तळताना हळू हळू झार्यान वाटीवर े तेल उडवावे वाटी सुटून येते ती चिमट्याने अलगद बाहेर काढा. आता तेलातील पीठाची वाटी उलट-सुलट तांबूस रंगावर तळावी. (अधिक सविस्तर कृतीसाठी फोटो पहा)
तयार कटोर्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. छान खुसखूषीत कडक रहातात. चाट करण्याचे वेळी पुरी घेऊन त्यामधे चाटचे सर्व साहित्य भरले की झाले कटोरी चाट!
टिप :-
* कटोरी अगदी मंद आचेवरच तळावी.
* पुरी फार पातळ अथवा जाड लाटू नये. फार पातळ लाटली तर हाताळणीमधे कटोरी मोडते व लगेच चाट मऊ पडते. व फार जाड ठेवली तर कटकटीत होते व खाताना चाट चांगले लागत नाही. चाटची कटोरी नेहमी खुसखूषीतच असावी.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment