21 September 2018

बेसन बर्फी ( Besan Burfi)

No comments :

घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल अथवा स्वताला कांही गोड खाण्याची इच्छा झाली तर घरातील उपलब्ध साहीत्यात ही बेसन बर्फी पटकन् करता येते. तसेच चविलाही उत्तम लागते. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बेसन १ कप (१०० ग्रँम)
* साखर १/२ कप ( ७५ ग्रँम)
* तूप १/४ कप ( ५० ग्रँम)
* बदाम, पिस्ता काप
* वेलची पूड

कृती :-
प्रथम पॅनमधे तूप घालून त्यावर बेसनपीठ घालावे व छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.भाजल्यावर थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून ठेवावे.

आता त्याच पँनमधे साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.पाक एकतारी किंवा दोनतारी असा कोणताही नको, तर फक्त साखर विरघळून बोटाला चिकट लागण्याइतपतच म्हणजे एकतारीच्याही अलिकडचा झाला की गँस बंद करावा.त्यामधे वेलचीपूड घालावी व दोन मिनिट थंड करावा.

आता तयार पाकामधे भाजून ठेवलेले बेसनपीठ घालून सर्व मिश्रण एकत्र हलवावे. गँस बंदच असावा.  मिश्रण घट्ट व्हायला लागते. नंतर आधीच तूप लावून ठेवलेल्या थाळीत मिश्रण ओतावे. वरून बदाम, पिस्ता लावावे व मिश्रण पंधरा मिनिट थंड होऊ द्यावे.

आता सुरीने आडव्या उभ्या, लाईन्स मारून ठेवावे.नंतर अजून पंधरा मिनिटानंतर पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.

टिप्स :-
* भाजलेले बेसन व पाक दोन्हीही गरम असेल तर बर्फी कडक होते. म्हणून दोन्हीही साधारण गार करून मगच एकत्र करावे.
* प्रमाणापेक्षा जास्त तूप घातल्यास बर्फी खूपच मऊ लिबलिबीत होते.
* बेसन छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.   अन्यथा चवीला पीठ पीठ लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या.आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

10 September 2018

उकडीचे मोदक करताना घ्यावयाची काळजी

3 comments :

बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय?  तर पुढील टीप्स
जरूर वाचा -
*******************************************
मोदक, म्हटले की गणपती बाप्पा ! असे समिकरणच आहे.त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. 'उकडीचे मोदक' करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते.  बर्याच गृहीणी 'उकडीचे मोदक' म्हटले की,करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे अजिबात अवघड नाही.

* मोदकासाठी पीठी तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती , आंबेमोहोर  व तोही नवा घ्यावा . फार जुना नसावा. त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखर्या(चुण्या) पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पीठी मिळते , खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावी.

* तांदुळ दळून पीठी करणार असाल तर तांदुळ आधी निवडून स्वच्छ धुवावा व पाणी निथळून नंतर सुती कपड्यावर पसरून आठ - दहा तास सावलीतच सुकवावा व नंतर दळून आणावा.  दळून आणल्यावर पीठी बारीक चाळणीने चाळून नंतर पीठी उकडीसाठी वापरावी.

* सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.मोदक खाताना पीठ तोंडात टाळ्याला चिकटते.

* आतल्या सारणासाठी नारळ  फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.

* नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा. म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.

* सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा .खारट नको.

*सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या. तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.

* सारण आदले दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. घाई-गडबड वाचेल.

* मोदक तयार करताना उकड गरम असावी . तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत. यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.

* उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही मोठे चविष्ट लागतात.घरगुती पांढरे लोणी वापरा.

* शक्य असेल तर उकड दूधामधे किंवा अर्धे दूध व अर्धे पाणी  वापरा उकड पांढरी, मऊ होते व मोदक अधिक स्वादिष्ट होतात.

* मोदक  तयार करताना त्याच्या कळ्या पाडणेचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.मुखर्या छान धारदार पाडता येतात . हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.

* उकड मळताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करावा.  तेलामुळे मोदक फुटतात.

* पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. खालून फाटत नाहीत.

* मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे/करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुध्दा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल/ तूप चोळा .

* मोदक उकडायला ठेवताना आधि पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.

* तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिकटून फाटणार नाहीत.

आता इतके त्याचे नखरे संभाळून केलेले 'उकडीचे मोदक' बाप्पाला का नाही आवडणार ? नक्कीच आवडतील. व तुम्हाला पण आवडतील ! ते कसे करायचे , साहीत्य व कृतीसाठी पुढे दिलेल्या लिकवर क्लिक करा.

http://swadanna.blogspot.in/2014/08/blog-post.html?m=0