21 May 2015

आंबा आईसक्रिम (Mango Ice-cream)

No comments :
आईसक्रीम ! म्हटले की लहान-थोर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते.आईसक्रीम आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच.उन्हाळा म्हटले की हमखास आईसक्रीम ची आठवण येतेच.मला तर माझ्या लहानपणी घरात केल्या जाणार्या आईसक्रीमची आठवण येते. ती चव अजून आठवते.पुर्वी आजसारखी अधुनिक साधने नव्हती.आईसक्रीम घरी बनवणे म्हणजे मोठ्ठा कार्यक्रम असायचा. आईसक्रीम साठी खास मिळणारे तो लाकडी पाॅट भाड्याने आणायचा. बर्फ,खडेमीठ त्या भांड्यात बाहेरून घालायचे. मग आतल्या भांड्यात दूध , साखर वगेरा आपले आईसक्रीमचे मिश्रण घालायचे व दंड भरून येईपर्यत फिरवावे लागायचे.मग घरातल्या प्रत्येक सदस्याचा त्याला फिरवण्यासाठी हात लागायचा. मधून मधून घट्ट झाले का सारखे पहायचे. आम्ही लहान मुले वाटी,चमचा घेऊन सतत तिथे घुटमळायचो.मग मोठ्ठ्यांचा ओरडा. जेवण झाले की मिळेल असा. मग केव्हा एकदा जेवण होते व आईसक्रीम मिळते असे व्हायचे. मग एकदाचे जेवण उरकले की सर्वानी मिळून आईसक्रीम खायचे ! अहाह: काय चव लागायची ! कारण हॅडल फिरवून घाम निघालेला असायचा ना. त्यामुळे ते आजपर्यंत लक्षात पण राहीले.पण आजकाल आईसक्रीमचे तितके अप्रूप राहीले नाही. अनेक कंपन्यांचे विविध स्वादाचे आईसक्रीम सहज उपलब्ध आहे. त्यात आणि हेल्थ काॅन्शिअस लोक खाणेच टाळतात. कारण कॅलरीज् ची भिती !पुन्हा त्यात रंग,जिलेटीन,प्रिझर्वेटीवस् असे बरेच रासायनिक पदार्थ असतात. तर हे सर्व टाळण्यासाठी मी घरच्याघरी, झटपट पण तितकेच सोपे व पूर्ण नैसर्गिक आईसक्रीम कसे करायचे ते सांगते.

साहित्य :-
१. ताजा आंबाचा रस/गर १कप
२. पीठीसाखर १ कप
३. थंड व्हिपिंग क्रीम १ १/२ कप
४. मॅगो इसेंन्स १ टीस्पून ऐच्छीक

कृती :-
प्रथम आंब्याचा रस काढून ,रस व पिठीसाखर व्यवस्थित घुसळून घ्यावे.

नंतर थंड व्हिपिंग क्रीम एका खोलगट काचेच्या बाऊलमधे घेऊन हॅन्ड मिक्सर( किवा इलेक्टीक बिटर) ने आधि मध्यम स्पीडला व दोन मिनिटानी फास्ट घुसळावे अंदाजे पाच मिनिटसाठी. क्रीम एकदम हलके व फ्लपी झाले पाहीजे.पण इतके ही घुसळू नये की त्याला तूप सुटेल.नंतर यामधे वर तयार केलेला मॅगोपल्प व इसेन्स घालून परत एकदा मिक्स होण्याइतके घुसळावे व एका एअरटाईट प्लॅस्टीक डब्यात हे मिश्रण ओतावे. ओतताना त्यात थोडे आंब्याचे लहान चौकोनी तुकडे टाकावेत.छान लागते.

नंतर फ्रिजर मधे एक ते दीड तासा साठी थोडे कुलिंग वाढवून ठेवावे.समजा फ्रिजचे कुलिंग चांगले नसेल तर थोडावेळ जास्त ठेवावे.मस्त नैचरल आईसक्रीम तयार ! वरून परत एखाद दोन आंब्याचे तुकडे सजावटीला घालून थंडगार आईसक्रिम सर्व्ह करावे.

अशा पध्दतीने आपण कोणत्याही फळाचा गर घेऊन साॅफ्ट आईसक्रीम घरच्याघरी बनवू शकतो.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment