13 May 2015

चिरमुर्याचे भडंग/चिवडा ( Chiwada )

No comments :

चिरमुर्याचे भडंग हा अगदी सोपा व काॅमन प्रकार आहे .घरोघरी आपापल्या चवीने व पध्दतीने बनविला जातो.फक्त चिरमुरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. संध्याकाळच्यावेळी चहासोबत तोंडात टाकणेसाठी किवा मुलांना येता-जाता खाण्यासाठी आपण करतो.पट्कन होणारा प्रकार आहे तसेच तेलकट नसतो,पचायला पण हलका असा हा चिवड्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मी जास्त विस्तारपुर्वक रेसिपी देत नाही . मात्र बरेच वेळा त्यात घातलेले शेगदाणे ,खोबरे जळते, कडीपत्ता , लसूण  करपतो.चिरमुरे किवा पोहे एकीकडे पिवळे तर दुसरीकडे पांढरे रहाते ,मीठ साखर,मसाला सगळीकडे नीट लागत नाही .असे काही होऊ नये म्हणून कांही टीप्स देते.

* तेल, मोहरी तडतडण्याइतकेच गरम करा. तेलातून धूर निघेपर्यत गरम नको.म्हणजे मोहरी,जिरे,तिळ न जळता फोडणी छान खमंग होते.

* फोडणी तडतडल्यावर त्यामधे सर्वात आधि शेंगदाणे घाला मंद गॅसवर तळत रहा.थोडेसे अर्धे-कच्चे तळले की मग खोबरं काप घाला .कारण खोबरे कमी वेळात तळते व शेगदाणे जास्त वेळ लागतो.मग लसूण अर्धवट ठेचून टाका.सतत हलवत रहा. सर्व गुलाबी रंगावर झाले की आता गॅस चक्क बंद करा. पुढच्या वस्तू तळायला आहे तेवढा तेलाचा व कढईचा गरमपणा पूरे होतो.

* आता अनुक्रमे फुटाणा डाळं ,कडीपत्ता ,हिरवी मिरची तुकडे टाका.हलवत रहा.हे सर्व न जळता छान कुरकूरीत होते व कडीपत्त्याचा रंग हिरवाच रहातो व छान वास येतो.

*आता सर्व तळून झाले की गॅस बंदच ठेवून आरामात लाल तिखट पूड ,हळद ,हींग,साखर , मीठ ,मेतकूट किवा धनाजिरा पावडर तयार फोडणीत टाका .जळत नाही रंग चांगला येतो व मीठ साखर विरघळते व सगळीकडे लागते . आता चिरमूरे किवा पोहे घाला. आणि व्यवस्थित हलवा की, जेणेकरून सर्व मीठ मसाला तिखट चिरमुर्याना लागेल.

*आणि आता सर्वात शेवटी कढई परत गैसवर ठेवा व एकदम मंद गैस ठेवा व पंधरा मिनिटे मधून मधून हलवत रहा की खाली लागणार नाही .किवा दुधाखाली ठेवतात ती जाळीची प्लेट असेल तर ठेवा व परतत रहा.छान कुरकूरीत व खमंग होते

* आता ते गार होईपर्यंत कढईतच राहू दे.नंतर गार झाल्यावर डब्यात भरताना आधि त्यातील कडीपत्ता मिरची हाताने चूरडून टाकावे म्हणजे खाताना मधे येत नाही ,चव पण लागते व काढून टाकले जात नाही सर्वेच खाल्ले जाते.

अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून भडंग किवा कोणताही चिवडा केला तर छान खमंग चव व रसरशीत रंग येतो. नाहीतर जळके दाणे,खोबरे तोंडात कडू लागतेय ,काळा करपलेला कडीपत्ता काढून टाकतात ,लसूण दाताखाली आला तर जळका नाहीतर कच्चाच लागतोय , रंगपण हळद ,तिखट करपून काळापट व एकीकडे पांढरे,पिवळे चिरमुरे असा रंगबिरंगी दिसते.म्हणून थोडेसे लक्षपूर्वक करावे व आरामात अशा खमंग कुकूरीत भडंगाचा आस्वाद घ्यावा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment