30 April 2015

सांडगी मिरची (Stuffed Dried Chilly)

No comments :
सांडगी मिरची हा उन्हाळी वाळवणातला एक प्रकार आहे. एप्रिल-मे म्हणजे चांगली कडक उन्हे तापत असतात.गृहीणीची सांडगे, पापड, कुरडया असे विविध उन्हाळी पदार्थ करण्याची लगबग चालू असते. म्हणजे पूढे येणार्या  पावसाळ्याची बेगमी होते.पावसाळ्यात बरेच वेळा भाज्या चांगल्या मिळत नाहीत किवा पावसामुळे बाहेर जाणे त्रासाचे होते.तेव्हा हे उन्हाळी पदार्थ हाताशी असले तर जेवण चवदार होते.सांडगी मिरची ही तशी एकदम सोपी. हाताशी असली की फोडणीच्या कढईत तळून तेवढीच जेवणाची लज्जत वाढवता येते .तसेच दहीबुत्ती,दहीपोहे ,वेगवेगळी भरीत,कोशिंबीर याना फोडणी द्यायला पण कामी येते.खूप खमंग लागते.तसेच मी तर पालक ,चाकवत अशा गरगटी भाज्यांच्या फोडणीत ,दडप्या पोह्यामधे सुध्दा वापरते. घरात सर्वानाच खूप आवडते.मी इथे जागे अभावी फारसे उन्हाळी पदार्थ करू शकत नाही.मात्र हौस आहे.मग  उन्हाळा आला की ,थोड्याशाच मिरच्या आणायच्या इथे-तिथे खिडकीत गॅलरीत ठेवून वाळवायचे असे करते. या मिरच्या करण्यासाठी मंडईत खास मोठ्या व  कमी तिखट मिरच्या येतात. पण मी नेहमीच्या वापरातल्याच पण कमी तिखट असणार्या मिरच्या आणते.ज्वाला मिरची आणू नये. म्हाणजे लहान-लहान खाण्यास सोईच्या होतात.मी कशा केल्या ते साहीत्य व प्रमाण पूढीलप्रमाणे,
साहीत्य :-
1) हिरव्या मिरच्या 1/2 कि.
2) धणे 2 वाटी (200 gm)
3) मोहरी 1/2 वाटी, जीरे 1/4 वाटी 
4) तिळ 1/4 वाटी
5) मेथी दाणे 2 टेस्पून
6) हींग 2 टीस्पून
7) मीठ 3 टेस्पून 
8) हळद पावडर 2 टीस्पून
कृती :-
मसाला कृती
 प्रथम धणे, मोहरी, तिळ, हींग,मेथी हे सर्व कढईत नुसते गरम करून घ्यावेत. भाजायचे नाही. गार झाले की मिक्सरवर तिळ सोडून बाकी सगळ्याची छान बारीक पावडर करावी.दळतानाच त्यामधे मिठ घालावे म्हणजे जिन्नस चांगले बारीक व्हायलाही मदत होते.नंतर काढून त्यात हळदपूड व तिळ मिसळावे मसाला तयार. हा मसाला सवडीने आधिही करून ठेवला तरी चालतो. मिरच्या आणल्या की लगेच भिरच्या करू शकतो.
मिरची कृती
            मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात. नंतर त्याचे पूर्ण देठ न कापता अर्धेच
कापावे व पोटात उभ्या चिराव्यात. आरपार चिरू नये आत मसाला भरता आला पाहीजे.
नंतर एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात चमचाभर मीठ टाकावे व त्यात या चिरलेल्या मिरच्या टाकाव्यात. पाण्यात टाकल्याने त्यांचे बी काही प्रमाणात निघून जाते व तिखटपणा ही कमी होतो.तसेच पाण्यात टाकल्याने एकदम उकलल्या जातात व मसाला भरणे सोईचे होते. हे काम सकाळच्या कामातच करून ठेवा.
रात्रीची जेवणे उरकली की मिरच्या पाण्यातून काढून चाळणीवर निथळण्यास ठेवा.पूर्ण पाणी निथळून कोरड्या झाल्या मिरच्या की, वर तयार असलेला कोरडाच मसाला एक-एक मिरची मधे दाबून नीट भरावा.एका पसरट भांड्यात भरलेल्या मिरच्या एकावर एक भरून भरून रचाव्यात. रात्रभर तसेच झाकून राहू दे.
सकाळी उठल्यावर या मिरच्या परत एकदा  हाताने मसाला दाबून दाबून एक एक सुट्ट्या परातीत किवा सुपात पसरून ठेवा.व परात कडकडीत उन्हात नेऊन ठेवा. असे चार ते पाच दिवस कडक उन्हात वाळवाव्यात.
आता उन्हात कडक वाळून तयार झालेल्या मिरच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. गरज पडेल त्यानूसार डब्यातून काढा व तेलात तळा.अतिशय खमंग व खुसखूषीत लागतात.
गरमा-गरम डाळीची मऊ खिचडी त्यावर साजूक तुपाची धार , सोबत चवीला अशी खमंग तळलेली एखादी मिरची  बाहेर पाऊस पडतोय अहा..हा स्वर्गसुखच जणू !! बघा तुम्ही पण करून.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment