25 July 2019

मेथी नमकीन (Methi Napkin)

2 comments :
संध्याकाळच्या वेळी चहासोबत कांहीतरी चटपटीत तोंडात टाकावे वाटते तसेच मुलांना तर येता -जाता कांहीतरी खायला हवेच असते. तर बाजारी फरसाण, चिप्स खाण्यापेक्षा घरीच कांही पौष्टीक व खमंग असे करून ठेवले तर जास्तच चांगले ना..  म्हणून मी आज हे खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' केले. कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
• गव्हाचे पीठ १ कप
• बारीक रवा २ टेस्पून
• मैदा १ कप
• तेल ४ टेस्पून
• कसूरी मेथी ४ टीस्पून
• तिळ १ टीस्पून
• ओवा १ टीस्पून
• मिर्यांची भरड २ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तळण्यासाठी तेल

कृती :-

प्रथम एका बाऊलमधे गव्हाचे पीठ, मैदा, रवा एकत्र करून घ्यावे. नंतर त्यामधे मीठ,ओवा,कसूरी मेथी,तीळ,मिर्यांची भरड घालून सर्व एकत्र करावे.

आता या मिश्रणामधे मोठे चार चमचे तेल घालून हाताने चोळून चांगले मिक्स करावे. कोरडे पीठ मुठीत घेऊन दाबले तर मुटका होतो का पहावे. नाहीतर अजून एखादा चमचा तेल घालावे.

नंतर अंदाज घेत -घेत पाणी घालून घट्ट पीठ मळावे.   दिलेल्या पीठाच्या प्रमाणासाठी साधारण अर्धा कप पाणी लागते.  १० मिनीटे पीठ झाकून ठेवावे.

आता खूप जाड नाही का खूप पातळ नाही अशी पोळी लाटून लांबट पट्टया कापाव्यात. गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळावेत.

थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. पाहीजे तेव्हा गरमा-गरम चहासोबत खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' चा आस्वाद घ्या.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.




कटाची आमटी (Katachi Aamti)

1 comment :
इस कटाची आमटी हा आमटीचा पारंपारिक प्रकार आहे. पुरणपोळीचे जेवण म्हणजे सोबत कटाची आमटी पाहीजेच.या आमटीला निरनिराळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. कुठे येळवणीची आमटी..  तर कुठे सार! तसेच करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या असतात. पण पदार्थ एकच असतो.  हरभर्याची डाळ शिजवताना मधे मधे वरचे पाणी काढले जाते व त्या पाण्याची आमटी केली जाते ती कटाची आमटी होय.आजकाल डाळ कुकरमधे डाळ शिजवली जाते. म्हणून डाळीत जास्त, म्हणजे डाळीच्या चौपट पाणी घालतात व गाळून कट काढला जातो. तर अशा आमटीसाठी लागणारे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* डाळीचा काढलेला कट ५ वाट्या
* सुके खोबरे एक लहान वाटी, ५० ग्रँम
* लिंबाएवढ्या चिंचेचा काढलेला कोळ
* गूळ लिंबाएवढा
* गरम मसाला १ टीस्पून
* गोडा मसाला २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* फोडणीसाठी तेल एक पळीभर
* हींग, मोहरी, जीरे, कढीपत्ता
* कोथिंबीर

कृती :-
प्रथम सुक्या खोबर्याची वाटी डायरेक्ट गँसवर जाळामधे खरपूस भाजून घ्यावी.

आता भाजलेले खोबरे, जीरे, थोडा कढीपत्ता भाजून, कोथिंबीर सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे.

आता तेल गरम करून त्यामधे जीरे, मोहरी हींग तडतडवून घ्यावेत. त्यामधे कढीपत्ता, हळद, हींग घालावे व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतल्यावर त्यामधे लाल मिरचीपूड, गरम मसाला, गोडामसाला घालून परतावे.

सर्वात शेवटी डाळीचा कट, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून आमटी ५ मिनिट चांगली उकळू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.

अशी ही खमंग कटाची आमटी मोकळ्या भातासोबत खूप छान लागते. तसेच पुरणपोळी खाताना मधे-मधे भुरकायलाही मस्त लागते. बरेचजण आमटीत पोळी बुडवूनही खातात.  कशीही खा पण पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहीजेच.

टिप्स :
* बरेचवेळा आमटीला कट कमी निघतो अशा वेळी थोडी शिजलेली डाळ घोटून घालावी.
* या आमटीला मसाला वाटताना खोबर्यासोबत हिरवी मिरची,आले, लसूण, कोथिंबीर व जाळावर खोबर्याप्रमाणे आख्खा कांदा भाजून घातला तरी चालतो.छान वेगळी चव येते. परंतु मी देवाला नैवेद्य असल्याने कांदा लसूण नाही घातले.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

10 July 2019

दुधीचे मुठीया (Dudhi Muthiya)

No comments :
दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे.एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दुधच आहे. दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते.परंतु दुधीभोपळ्याची भाजी जेवणात आहे म्हटले की नाकं मुरडली जातात. सामान्यपणे लोकांना आवडत नाही. म्हणून मी त्याचे मुठीया केले. जेवणात खा,नाष्टा म्हणून खा किंवा चहासोबत स्नँक्स म्हणून खा उत्तम लागतात व पौष्टीक आहेत. जेणेकरून दुधी पोटात गेला पाहीजे. तर हे मुठीया कसे करायचे पाहुयात.

साहित्य :-
* खिसलेला कोवळा दुधी २ वाट्या
* गव्हाचे पीठ १ वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* चणाडाळीचे पीठ अर्धी वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* तांदुळाचे पीठ पाव वाटी
* बारीक रवा २ टेस्पून
*मीठ
*हळद
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
*धना-जिरा पावडर
* लिंबू रस चमचाभर
* कोथिंबीर
* फोडणी साहित्य तेल,हिंग, मोहरी,तिळ, कढीपत्ता

कृती :-
प्रथम  कोवळा दुधी भोपळा सालं काढून किसून घ्यायचा. थोडं हलक्या हाताने किस पिळून घ्यायचा व निघालेले पाणी पिऊन टाकायचे.  खूप नाही पाणी काढायचे. पण अगदीच न पिळता किस घेतला की पीठ खूप घालावे लागते व चवीला पीठ पीठ खूप लागते.

तर आता दुधीच्या किसात मावेल इतके गव्हाचे, तांदूळाचे व डाळीचे पीठ, रवा थोडासा घालायचे. तसेच मीठ,  हळद, धना-जिरा पावडर, आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट, लिंबू रस, कोथिंबीर चिरून सर्व घालून सैलसर पीठ भिजवावे,

आता त्याचे मुटके करून उकडायचे व गार झाल्यावर कापून हिंग,जीरे,मोहरी,तिळ, कढीपत्ता घालून फोडणी करावी व त्यामधे उकडलेले  मुठीया घालून चांगले तांबूस रंगावर परतायचे व खायचे.

टीप - यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या म्हणजे गाजर, पालक, मेथी मिसळले तरी छान लागते. तसेच पीठही बाजरी, मका, नाचणी मिसळून अधिक पौष्टिक करता येते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.