'स्वयंपाक घर' हा घराचा आत्मा असतो. स्वयंपाक घर म्हणजे पवित्र महायज्ञाची तयारी जिथे केली जाते ती जागा. कारण उदरभरण म्हणजे ते नुसते पोट भरणे नसते तर ते एक यज्ञकर्म करणे समजले जाते व अशा उदरभरणाची सोय जिथे केली जाते ती जागा म्हणजे यजाची पवित्र जागा, स्वयंपाक घर होय! व या ठिकाणी सर्व काम पवित्र रीतीनेच केले पाहीजे. तसेच चौसष्ट कला पैकी पाककला एक उच्च दर्जाची कला समजली जाते. चविष्ट व पौष्टीक पदार्थ करणे ही एक पाक कला आहे व स्वयंपाक घर एक कला दालन आहे . तर अशा कला दालनामधे वावरताना प्रत्येकाने पाळावित अशी कांही पत्थे व करण्यायोग्य सोप्या गोष्टी.
• स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे. नियमित साफ-सफाई झाली पाहीजे.
• स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी शुचिर्भुत होऊन, सुती व काम करण्यास सोईचे स्वच्छ कपडे परिधान करावेत.
• केस व्यवस्थित एकत्र वर बांधलेले असावेत.
• नेहमी आधी साबणाने हात स्वच्छ धुवूनच मग कामाला सुरवात करावी.
• स्वयंपाकात लागणारे डाळी, तांदुळ, कडधान्ये नेहमी साफ करून ठेवावीत. पीठं चाळून ठेवावीत. शेंगदाणे भाजून कुटून ठेवावेत. रवा भाजून ठेवावा. पोहे चाळून ठेवावेत.
• स्वयंपाकात लागणारे मसाले तीन किंवा सहा महिन्याचेच करावेत. अशाने त्यांचे स्वाद कमी होत नाहीत. पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.
• आधीचे पदार्थ आधी वापरावेत. ते जास्त जूने होऊ देऊ नयेत.
• गवार, घेवडा, मटार सारख्या भाज्या आधीच निवडून, मोडून फ्रीजमधे ठेवाव्यात. पालेभाज्या, कोथिंबीर निवडून ठेवावे. आलं-लसूण पेस्ट तयार करून ठेवावी. ऐनवेळी घाई गडबड होत नाही.
• भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात. चिरल्यावर नाही.
• जो पदार्थ करणार आहोत त्याची आधी पुर्वतयारी करून घ्यावी. नंतरच गँस पेटवून सुरवात करावी. म्हणजे त्या पदार्थाला आवश्यक एखादा पदार्थ नसेल तर पर्यायी सोय करता येते व पदार्थ नीट बनतो. तसेच गँसचीपण बचत होते.
• तयार अन्नपदार्थ नेहमी व्यवस्थित झाकून ठेवावेत.
• आपल्या गरजे इतकेच अन्न पदार्थ तयार करावेत. आजच्या काळात ऐनवेळी कोणीही कोणाकडे जात-येत नाही.
• शक्यतो शिळे अन्न शिल्लक राहूच नये परंतु कांही कारणाने कधी शिल्लक राहीलेच तर लवकरात लवकर त्याचा कांही नविन पदार्थ करून घरातल्या सर्वानी वाटून खाऊन संपवावा. वाया घालवू नये.
• कुठे वाचलेला, खाल्लेला अथवा आवडलेला एखादा नवीन पदार्थ करून पहायचा असेल तर, आधी त्याचा पुर्ण अभ्यास करावा. लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे याची एकदा खात्री करावी. एखादी वस्तू नसेल तर आधीच आणवून घ्यावी व नंतरच शांतचित्ताने प्रयोगाला सुरवात करावी. म्हणजे पदार्थ सहसा फसत नाही.
• नवीन पदार्थ करताना सुरवातीला अगदी कमीत-कमी प्रमाणात साहित्य घेऊन लहान प्रमाणात पदार्थ बनवावा. चुकून बिघडलाच तर फार वाया जात नाही. आवडला तर आणखी बनवता येते.
• स्वयंपाक घरात नेहमी एखादे पेन व कागद छोट्या पँडला लावून लटकवून ठेवावे. एखादा पदार्थ संपला तर लगेच लिहून ठेवावे. म्हणजे बाजारातून सामान आणताना सर्व वस्तू न विसरता घरी येतात व ऐनवेळची धावपळ वाचते.
• स्वयंपाक घर आपल्या कुवतीनुसार सर्व आवश्यक त्या जुन्या व अत्याधुनिक साधनानी म्हणजे भांडी, चमचे, पँन, कढई, तवे, मिक्सर, ब्लेडर इत्यादि.. नी सुसज्ज ठेवावे व पदार्थ तयार करताना योग्यवेळी योग्य ती साधने आळस न करता वापरावित. पदार्थ अधिक रूचकर व लवकर होतो. उदा. शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी जुन्या पध्दतिने बिडाच्या खलबत्त्यात कुटली तर अधिक रूचकर लागते.. तेच धण्या -जिर्याची पावडर मिक्सरमधे चांगली बारीक होते.
• सर्वात शेवटी महत्वाचे, स्वयंपाक करताना आनंदी वृत्तीने, मनापासून करावा. पदार्थ अधिक चवदार व चांगला होतो. आदळाआपट करत चिडचिड्या वृत्तीने कधीच करू नये. हा अन्न देवतेचा अपमान असतो. व असे अन्न घरातल्या खाणार्याच्या कधीच अंगी लागत नाही व समाधानही मिळत नाही. बरकत रहात नाही.
एकूणच फक्त पदार्थ करता येणे म्हणजे 'सुगरण' नव्हे तर त्या जोडीला स्वच्छता, नियोजन, बचत, शास्त्र अशा सर्व कला तिला अवगत असाव्यात तरच अशा सुगरणीला अन्नपुर्णा देविचा वरदहस्त लाभतो.
आपण जे काम करतो ते मनापासून व आनंदाने करावे. पुर्ण क्षमतेने करावे. स्वतालाही आनंद मिळतो व समोरच्यालाही मिळतो.
धन्यवाद 🙏
स्वादान्न