31 January 2018

व्हेजिटेबल दलिया ( Vegetable Daliya)

No comments :

रोज सकाळी नाष्ट्याला काय करायचे? हा प्रश्न नेहमीच गृहीणींसमोर असतो. बरं, नाष्टा पौष्टीक, पोटभरीचा व करायला सोप्पा, पट्कन होणारा हवे. तर माझ्या मते या सर्व अटी पुर्ण करणारा पदार्थ म्हणजे लापशी रव्याचा, 'व्हेजिटेबल दलिया' !  कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* दलिया १ वाटी
* पाणी 3 वाट्या
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* गाजर, शिमला, मटार, फ्लाॅवर चिरून सर्व मिळून २ वाट्या
* कांदा १
* टोमँटो १
* आलं, मिरची चिरून
* कढीपत्ता
* कोथिंबीर, खोबरं, लिंबू
* फोडणीसाठी तेल २ टेस्पून
* फोडणी साहित्य हळद, हींग, मोहरी, जीरे

कृती :-
प्रथम दलिया किंचित तेलावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावा व कुकरमधे पाणी घालून एक शिट्टी काढून, वाफवून घ्यावा. नंतर थंड होऊ द्यावा.

आता कढईमधे तेल घालून फोडणी करावी व त्यात कांदा, कढीपत्ता, आलं, मिरची घालून परतावे.  नंतर त्यामधे चिरलेल्या भाज्या, टोमँटो घालावे व साधारण मऊ होईपरेंत परतावे. फार मऊ शिजवू नयेत, थोडे क्रंची राहू द्यावे.

आता शेवटी शिजलेला दलिया मोकळा करून घालावा. मीठ,साखर घालावे व सर्व साहित्य एकत्र परतावे. वर झाकणी ठेऊन एक वाफ काढावी.

तयार गरमा-गरम दलिया डिशमधे घालून वरून खोबरं -कोथिंबीर घालून वर लिंबूची फोड ठेवावी व खायला द्यावा.  चविला अतिशय उत्कृष्ट लागतो व मस्त पोट भरते. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

11 January 2018

तिळाची कुरकुरीत वडी (Crispy Til Burfi)

No comments :
संक्रांत, भोगी म्हटले की, गुळपोळी, तिळ-गुळाच्या वड्या, तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी असे पदार्थ केले जातात. हे उष्ण पदार्थ असतात. तिळामधे शरीराला आवश्यक स्निग्धांश असतात. यांच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते. म्हणून थंडी मधेे असे पदार्थ केले जातात. तिळाच्या पारंपारिक मऊ वड्या, लाडू आपण करतोच. आज मी तिळाच्या कुरकुरीत वड्या केल्या. अगदी कमीत-कमी व मोजके साहित्य लागते व पट्कन होतात. कशा केल्या साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तिळ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ ऐच्छिक
* काजू, बदाम काप ऐच्छिक
कृती :-
प्रथम तिळ स्वच्छ निवडून चाळून ध्यावेत. पोळपाट- लाटण्याला तूपाचा हात चोळून घ्यावा.
प्रार्थमिक तयारी केल्यावर आता गँसवर कढई ठेवून मंद आचेवर तिळ भाजून घ्यावेत. जास्त भाजू नयेत.,कडू लागतात.
आता तिळ ताटात काढून त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप पातळ झाले साखर घालावी.  मंद आचेवरच साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,गँस बंद करून लगेच भाजलेले तिळ, ड्रायफ्रूट्सचे पातळ काप घालावेत व सर्व साहित्य झटपट एकत्र करावे.
आता मिश्रणाचा तयार गोळा तूप लावलेल्या पोळपाटावर काढावा व गरम असतानाच हवे त्या जाडीची (शक्यतो पातळच) पोळी लाटावी. चाकूने रेषा पाडाव्यात. ही वडी लगेचच सुकते. म्हणून सर्व कृती झटपट करावी.
आता मस्त कुरकुरीत वड्या काढाव्यात व हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. महीनाभर सुध्दा छान कुरकुरीत रहातात.
तुम्हीही अशा पध्दतीने वड्या करून बघा. नक्की आवडतील.
टिप :
* तिळ तांबूस रंगाचे वापरावेत. पांढरे पाँलीशचे नको. तांबूस तिळ चविला अधिक खमंग असतात. मी तेच वापरलेत.
* साखरे ऐवजी गुळ वापरला तरी चालतो. परंतु गुळ नुसता विरघळून न घेता त्याचा गोळीबंद पाक करावा. 
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.



07 January 2018

ओल्या तुरीची उसळ (Turichi Usal)

No comments :

बाजारामधे हिवाळ्यात या ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर येतात. याची आमटी, उसळ, कटलेट केले जातात. चविला खूप छान लागते. परंतु या शेंगा सोलून दाणे काढणे हे किचकट काम आहे. घरात सर्वाना याची उसळ खूप आवडते. मग काय, शेंगा सोलायला ठेवते पुढ्यात! सोलून झाले की मस्तपैकी उसळ करायची व गरमा-गरम भाकरी सोबत खायची. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तुरीचे दाणे २ वाट्या
* टोमँटो १
* कांदा १
* हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट
* ओलं खोबरं १/२ वाटी
* कोथिंबीर
* शेगदाण्याचे कुट २ टेस्पून
* लाल मिरचीपूड,मीठ आवडीनुसार
* काळा मसाला २ टीस्पून
* गूळ सुपारी एवढा
* तेल, मोहरी, हींग हळद फोडणीसाठी

कृती
प्रथम दाणे किंचित परतून, कुकरमधे वाफवून घ्यावेत.

नंतर कढईत फोडणी करून कांदा परतून घ्यावा. आलं-लसूण मिरची पेस्ट घालावी. आता टमाटाही घालून मऊ होईपरेंत परतावा.

आता वाफवलेले तुरीचे दाणे घालावेत. सर्व मसाला तिखट, मीठ, मसाला, ओलं खोबरं, दाण्याचे कुट, गूळ घालावे. किंचित पाणी घालून एक वाफ काढावी. म्हणजे सर्व मसाला व दाणे एकजीव होते. थोडी घटसर पण सरसरीत अशीच ही उसळ ठेवावी.

शेवटी वरून कोथिंबीर घालून गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खावी.

टिप :- या उसळीमधे गूळ अवश्य घालावा. उसळीला गुळचिटपणा येतो. तूर उग्र असते,.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.