एखादा मोठा उपवास म्हणजे आषाढी-कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र असेल तर घरात लहान-थोर सर्वचजण करतात. आपणही मग त्यानिमित्ताने चार उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण होते काय शाबू वडा, थालीपिठ, वेफर्स असे चटपटीत पदार्थ लगेच संपतात व एखाद वेळी वरीचा भात (भगर) शिल्लक रहातो. परंतू दुसर्या दिवशी आधिच शिळे व त्यात परत उपवासाचे असे काही खायला नकोसे होते. व या महागाईच्या दिवसात वाया घालवणे पटत नाही. कालच एकादशी झाली. थोडा वरीचा भात उरला , विचार केला व द्वादशीच्या इतर साग्रसंगीत जेवणासोबत त्याची भजी करून टाकली ! मी-तू करून सर्वानी फस्त केली...कशी केली बघा.
साहीत्य :-
1) शिजलेला वरीचा भात(भगर) 2 वाट्या
2) मिरची, आल-लसूण पेस्ट
3) कोथंबिर बारीक चिरून
4) चना डाळ पिठ 2 टेस्पून
5) तांदूळ 1 टेस्पून
6) मीठ चवीला
7) धना-जिरा पावडर 1टीस्पून
8) हिंग चिमूटभर
9) तेल तळणीसाठी
कृती :-
प्रथम वरीचा भात हातानेच चूरून घ्यावा. पण जर भात कोरडा व फडफडीत असेल तर पाण्याचा हबका मारून कुकरला एक वाफ आणून घ्या किवा मिक्सरला एकदा थोडे फिरवून घ्या.
नंतर मऊ केलेल्या भातात वर दिलेल्या साहीत्यातील सर्व मसाला व पीठं घालावित व हातानेच नीट एकजीव करावे. हाताने तेलात भजी सोडता येतील इतपत सैलसर पीठ ठेवावे. गरज वाटली तर डाळ किवा तांदुळचे पीठ कमी-जास्त करा किवा पाणी घाला.
आता तयार मिश्रणाची लहान-लहान भजी गरम तेलात सोडून मंद आचेवर तळा. तळून टिश्यू पेपरवर काढा.
मस्त कुरकरीत भजी तयार. कशीही खा ! जेवणात खा किंवा चटणी- साॅस काही घेऊन नुसतीच खा. मस्तच लागतात.
टिप :- या भजीला सोडा किवा गरम तेल पोटात घालण्याची अजिबात गरज नाही. तांदुळच असल्याने अतिशय हलकी व कुरकूरीत होतात.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.