15 August 2015

शेव अमिरी (Sev Amiri)

No comments :

या पदार्थाचे नांव वाचून तुम्हाला हा काही गुजरात, मध्यप्रदेश तिकडचा पदार्थ असण्याची शक्यता वाटली असणार. पण खरं सांगू हा आपला पारंपारिक असा, जूनाच मराठी पदार्थ आहे ,' वाटली डाळ' ! यालाच कांहीजण 'खमंग डाळ' तर कोणी, ' डाळीचे तिखट' तर कुठे 'मोकळे बेसन' म्हणतात. परवा सहज टीव्ही लावला तर खाद्यपदार्थाचा कार्यक्रम चालू होता. साहीत्य जरा सुटसूटीत वाटले ...नाव पण जरा वेगळे वाटले. हा गुजराती पदार्थ आहे असे सांगितले.. म्हणून पाहीला तर आपली वाटली डाळच की हो। फक्त सर्वात शेवटी देतेवेळी वरून खोबरे-कोथंबिरीच्या जोडीला वरून बारिक नारलाॅन शेव भुरभूरली, झाली 'शेव अमिरी' ! मग वाटले सगळ्या प्रांतात पदार्थ थोड्याफार फरकाने सारखेच असतात, फक्त नांवे वेगवेगळी असतात. पण ही 'वाटली डाळ' तरी कशी करायची पहा !

साहीत्य :-

1) दोन-तीन तास भिजलेली चणा डाळ 2 वाट्या
2) लसूण, हिरवी मिरची आवडीप्रमाणे( लसूण ऐच्छीक)
3) मीठ चवीनुसार
4) साखर अर्धा टीस्पून ( अवश्य घ्यावी कारण ही डाळ थोडी उग्रट असती )
5) वरून घालण्यासाठी ओलं खोबरं , कोथिंबीर व बारिक शेव
6) लिंबू आवडत असल्यास
7) तेल मोठे दोन टेस्पून
8) फोडणीसाठी हिंग, जीरे,मोहरी, कडीपत्ता, हळद

कृती :-

सर्वात आधी भिजलेली चणा डाळ चाळणीवर ओतून पाणी काढून , डाळ निथळून घ्यावी.

आता निथळलेली डाळ , मिरची-लसूण सह भरड वाटून घ्यावी.

नंतर वाटलेली डाळ सरळ कुकरमधे ठेवून एक शिट्टी काढून वाफवावी.

थोड्या वेळाने थंड झाल्यावर ताटात काढून हाताने डाळ मोकळी करावी. कारण शिजल्यावर घट्ट ढिकळा तयार होतो.

आता कढईत तेल गरम करून सर्व फोडणीचे साहीत्य व कडीपत्ता घालून ,चांगली दमदमीत फोडणी करावी. नंतर त्यात मोकळी केलेली डाळ घालून मीठ व साखर घालून परतावे. एक वाफ येऊ द्यावी. पाच मिनीटानी गॅस बंद करा

आता डिशमधे काढून खायला द्या. देताना वरून लिंबू, खोबरे, कोथंबीर व बारीक शेव घाला.

टिप :- कुकरमधे न वाफवता डायरेक्ट फोडणीत डाळ टाकून पण वाफवली तरी चालते पण खाली लागण्याची शक्यता असते. व तेल थोडे अजून जास्त लागते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment