25 May 2015

आंबा वडी (Mango Burfi)

No comments :


आपण अनेक प्रकारच्या गोड/ तिखट वड्या नेहमीच करत असतो. गोड वड्यामधे सुध्दा गाजर,टोमॅटो,भोपळा,गुलकंद आंबा इ.अनेक प्रकारच्या वड्या करता येतात.त्यातीलच एक आंबा वडी ही  वेगवेगळ्या पध्दतिने केली जाते. नुसता आंब्याचा रस आटवून ,मावा मिसळून तर कधी ओला नारळ मिसळून करतात. आज मी ओला नारळ घालून वडी केली.कशी पहा.
साहीत्य :-
* नारळ खवलेला ४ वाट्या
* साखर  ४ वाट्या
* आंब्याचा रस २ वाट्या(मध्यम २ आंब्यांचा)
* वेलचीपूड
* मिल्कपावडर २ टेस्पून
* पिठीसाखर २ टेस्पून
* तूप १ टीस्पून
कृती :-
       प्रथम एक जाड बुडाची कढई/पातेले घ्यावे. त्यामधे खवलेला नारळ ,साखर व आंब्याचा रस एकत्र करावा. भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवावे.

मिश्रण सतत हलवत रहावे . खाली लागण्याची शक्यता असते.साधारण आळत आले की,त्यामधे मिल्कपावडर व पिठीसाखर घालावी. परत एकसारखे हलवत रहावे.मिश्रण एकत्र गोळा होऊन कढईपासून सुटायला लागले की तयार झाले असे समजावे व गॅस बंद करावा.वेलचीपूड घालावी व आधिच तूपाचा हात लावून तयार केलेल्या ताटामधे ओतावे. व जाड प्लास्टीक बॅग पसरून हाताने अलगद थापावे.


थोडे थंड झाले की चाकूने रेषा पाडून ठेवाव्यात. पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात व डब्यात भरून ठेवाव्यात.




टीप :- या वड्या शक्यतो चार-आठ दिवसात संपवाव्यात.ओला नारळ असल्याने खराब होण्याची शक्यता असते.अन्यथा फ्रिज मधे ठेवून खाव्यात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 

21 May 2015

आंबा आईसक्रिम (Mango Ice-cream)

No comments :
आईसक्रीम ! म्हटले की लहान-थोर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते.आईसक्रीम आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच.उन्हाळा म्हटले की हमखास आईसक्रीम ची आठवण येतेच.मला तर माझ्या लहानपणी घरात केल्या जाणार्या आईसक्रीमची आठवण येते. ती चव अजून आठवते.पुर्वी आजसारखी अधुनिक साधने नव्हती.आईसक्रीम घरी बनवणे म्हणजे मोठ्ठा कार्यक्रम असायचा. आईसक्रीम साठी खास मिळणारे तो लाकडी पाॅट भाड्याने आणायचा. बर्फ,खडेमीठ त्या भांड्यात बाहेरून घालायचे. मग आतल्या भांड्यात दूध , साखर वगेरा आपले आईसक्रीमचे मिश्रण घालायचे व दंड भरून येईपर्यत फिरवावे लागायचे.मग घरातल्या प्रत्येक सदस्याचा त्याला फिरवण्यासाठी हात लागायचा. मधून मधून घट्ट झाले का सारखे पहायचे. आम्ही लहान मुले वाटी,चमचा घेऊन सतत तिथे घुटमळायचो.मग मोठ्ठ्यांचा ओरडा. जेवण झाले की मिळेल असा. मग केव्हा एकदा जेवण होते व आईसक्रीम मिळते असे व्हायचे. मग एकदाचे जेवण उरकले की सर्वानी मिळून आईसक्रीम खायचे ! अहाह: काय चव लागायची ! कारण हॅडल फिरवून घाम निघालेला असायचा ना. त्यामुळे ते आजपर्यंत लक्षात पण राहीले.पण आजकाल आईसक्रीमचे तितके अप्रूप राहीले नाही. अनेक कंपन्यांचे विविध स्वादाचे आईसक्रीम सहज उपलब्ध आहे. त्यात आणि हेल्थ काॅन्शिअस लोक खाणेच टाळतात. कारण कॅलरीज् ची भिती !पुन्हा त्यात रंग,जिलेटीन,प्रिझर्वेटीवस् असे बरेच रासायनिक पदार्थ असतात. तर हे सर्व टाळण्यासाठी मी घरच्याघरी, झटपट पण तितकेच सोपे व पूर्ण नैसर्गिक आईसक्रीम कसे करायचे ते सांगते.

साहित्य :-
१. ताजा आंबाचा रस/गर १कप
२. पीठीसाखर १ कप
३. थंड व्हिपिंग क्रीम १ १/२ कप
४. मॅगो इसेंन्स १ टीस्पून ऐच्छीक

कृती :-
प्रथम आंब्याचा रस काढून ,रस व पिठीसाखर व्यवस्थित घुसळून घ्यावे.

नंतर थंड व्हिपिंग क्रीम एका खोलगट काचेच्या बाऊलमधे घेऊन हॅन्ड मिक्सर( किवा इलेक्टीक बिटर) ने आधि मध्यम स्पीडला व दोन मिनिटानी फास्ट घुसळावे अंदाजे पाच मिनिटसाठी. क्रीम एकदम हलके व फ्लपी झाले पाहीजे.पण इतके ही घुसळू नये की त्याला तूप सुटेल.नंतर यामधे वर तयार केलेला मॅगोपल्प व इसेन्स घालून परत एकदा मिक्स होण्याइतके घुसळावे व एका एअरटाईट प्लॅस्टीक डब्यात हे मिश्रण ओतावे. ओतताना त्यात थोडे आंब्याचे लहान चौकोनी तुकडे टाकावेत.छान लागते.

नंतर फ्रिजर मधे एक ते दीड तासा साठी थोडे कुलिंग वाढवून ठेवावे.समजा फ्रिजचे कुलिंग चांगले नसेल तर थोडावेळ जास्त ठेवावे.मस्त नैचरल आईसक्रीम तयार ! वरून परत एखाद दोन आंब्याचे तुकडे सजावटीला घालून थंडगार आईसक्रिम सर्व्ह करावे.

अशा पध्दतीने आपण कोणत्याही फळाचा गर घेऊन साॅफ्ट आईसक्रीम घरच्याघरी बनवू शकतो.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 May 2015

कलिंगड ज्यूस (Watermelon Juice )

No comments :

कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातिल पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळाचे अजून बरेच काही फायदे व उपयोग आहेत. कोणतेही फळ शक्यतो चिरूनच खावे. परंतू काहीवेळा वृध्द,लहान आजारी माणसांना रस काढून देणे आवश्यक असते .तर कसा काढावा ते पहा -

* प्रथम कलिंगड चिरून त्यातील बिया काढून  लहान फोडी करून घ्या. फोडी करताना त्यातील फक्त  लाल भागच घ्यावा.रस पण छान लाल व गोड होतो.

* नंतर मिक्सर किंवा ब्लेडरमधे पाणी न घालता फोडी घुसळाव्यात. घुसळताना त्यामधे एक-दोन टेस्पून गुलकंद घालावा .म्हणजे गोडीपण वाढते व उन्हाळ्यात गुलकंद थंड असतो शरीराला.

* नंतर तयार रस मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावा व त्यामधे आवडीप्रमाणे सैधव मीठ व चाट मसाला घालावा.

* आता छानश्या ग्लासमधे घालून सजावटीला वरून पुदीन्याची पाने ,एखाद दुसरा कलिंगडाचा लहान तुकडा व आईसक्यूब घालून सर्व्ह करा.

टीप :- या ज्यूसमधे आपण बरीच विविधता आणू  शकतो. गुलकंदा ऐवजी पुदीन्याची पाने , तर कधी तुळशी , रूहअब्जा कधी लिंबू पिळावे.

जर बर्फ चालत नसेल तर आधीच कलिंगड चिरून गार होण्यासाठी फ्रिजमधे ठेवावे.नंतर रस काढा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 May 2015

व्हेजिटेबल स्टाॅक (Vegetable Stock)

No comments :

बरेच वेळा असे होते आपल्याला भाजीचे सूप करायचे असते. पण सर्वच भाज्या घरात ऐनवेळी उपलब्ध असतील असे नाही. मग भाज्या आणून सूप करणे म्हणजे कटकटीचे व किचकट काम वाटते.म्हणून हा स्टाॅक तयार असेल तर आपण कोणतीही उपलब्ध भाजी घालून सूप पट्कन तयार करू शकतो.. तर स्टाॅक म्हणजे सर्व भाज्या शिजवून त्यांचा काढलेला अर्क ! तर कसा करायचा पहा.

साहीत्य :-

1) कोबी,सिमला मिरची,गाजर,फ्लाॅवर,मटार ,लाल भोपळा या सर्व किवा आपल्या आवडीच्या अजून काही भाज्या मिळून 500 ग्रॅम
2) कांदा एक
3) लसूण 3-4 पाकळ्या
4) आले एक इंच
5) मिरे 8-10
6) तमालपत्र दोन लहान पाने
7) लवंगा 3-4
8) पाणी दोन लिटर

कृती :-

      सर्वात आधि  पाणी गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामधे वरील सर्व मसाला टाका. पाणी गरम होईपर्यंत वरील सर्व भाज्या मोठ्या-मोठ्या कापून एक एक करून गरम पाण्यात टाका.

सर्व भाज्या पाण्यात 25-30 मिनिटे चांगल्या उकळू द्याव्यात.

नंतर सर्व भाज्या तशाच थंड होऊ द्याव्यात. गार झाल्यावर मोठ्या गाळणीतून सर्व भाज्या गाळाव्यात. आता जो अर्क निघाला आहे तो एका बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावा. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरा.कोणत्याही भाजीचे झटपट सूप तयार करता येते.आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून व स्टाॅक वापरून विविध प्रकारची सूप्स तयार करता येतात.

हा स्टाॅक 8-10 दिवस आरामात टिकू शकतो. जास्तच रहातो पण शक्यतो आठ आठ दिवसांचा करून ठेवावा.

टीप :- भाज्या गाळून घेतल्यावर वर ज्या भाज्या रहातात त्या सत्वविरहीत असतात पण टाकायचे नसेल तर त्यात आणखी थोड्या भाज्या वापरून पावभाजी ,कटलेट किवा मॅश करून थोडे गहूपीठ वापरून पराठे बनवू शकतो.

  आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

13 May 2015

मिश्र भाज्यांचे सूप (Mix Veg soup)

No comments :
सूप म्हणजे एक प्रकारचे पातळ स्वरूपातील अन्नच असते. लहान मुले , आजारी माणसे,  वृध्द ज्यांना अन्न चावून खाणे जमत नाही त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पोटभरीचा व पौष्टीक प्रकार आहे. तसेच सर्वसामान्य माणसे मुख्य जेवणाच्या आधिचा पाचक पदार्थ म्हणून घेतात. सूप करणे म्हणजे अनेक गृहीणीना क्लिष्ट काम वाटते. पणे ते तसे नाही. अत्यंत सोपे व कमी साहीत्यात व पट्कन होणारा पदार्थ आहे. आपण जर भाज्याचा स्टाॅक (पातळ स्वरूपात भाज्यांचा अर्क) फ्रिज मधे तयार करून ठेवला तर कोणत्याही भाजीचे सूप पट्कन बनविता येते. सूपचे खूप विविध प्रकार आहेत. आपण आपल्या बुध्दीमत्तेचा वापर करून अनेक नवनवीन प्रकारचे सूप बनवू शकतो. मी आज चार-पाच भाज्या पण थोड्या-थोड्याच शिल्लक होत्या म्हणून मिक्स व्हेज सूप बनविले. कसे ते पहा.
साहीत्य :-
1) सिमला मिरची 1
2) कोबी अर्धी वाटी
3) फ्लाॅवर अर्धीवाटी
4) गाजर 1
5) मटार दाणे पाव वाटी
6) बटर 1 टीस्पून
7) 7-8 काळ्या मिर्याची भरड पूड
8) मीठ चवीला
9) भाजीचा स्टाॅक 4 कप
10) गव्हाचे पिठ 1-1/2 टेस्पून
टीप :- आपल्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेनुसार भाज्या व भाज्यांचे प्रमाण घ्यावे.
कृती ;-
   सर्व भाज्या आधि धुवून मग बारीक चिरून घ्याव्यात .
नंतर पॅनमधे बटर घाला व भाज्या त्यावर थोड्या परता.सिमला व कोबी थोडे नंतरच घालावे म्हणजे क्रंची रहाते व दाताखाली आलेले चांगले लागते.
नंतर त्यामधे गव्हाचे पिठ घालून थोडे परता.(गव्हाच्या पिठाने दाटपणा येतो) आता भाजीचा स्टाॅक चार कप घाला. मीठ व मिरपूड घाला.चांगले उकळवा.
गरमा-गरम पौष्टीक सूप तयार ! जेवणाचा फारच कंटाळा आला एखादे दिवशी तर रात्रिच्या जेवणाला पोटभरीचा व पौष्टीक असा पर्याय ठरू शकतो.कारण सर्व भाज्या व कणिक म्हणजे पोळी,भाकरीची जागा भरून काढते.
समजा आपल्याजवळ भाजीचा स्टाॅक तयार नसेल तर बटरवर आधि एखादे तमालपत्र,मिरे चार ,दोन लवंगा, लसूण दोन पाकळ्या,आलं लहान तुकडा टाका नंतर बारीक कांदा टाका व परतत परतत एक-एक भाज्या,पिठ व पाणी घाला व उकळवा. वरून मिरपूड घालून सर्व्ह करा. असेही सूप आपण करू शकतो पण स्टाॅक वापरल्यास त्याचा पौष्टीकपणा जास्त वाढतो. तसेच गव्हाच्या पिठाऐवजी पाण्यात मिसळून काॅर्नफ्लोअर पण वापरू शकतो.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

चिरमुर्याचे भडंग/चिवडा ( Chiwada )

No comments :

चिरमुर्याचे भडंग हा अगदी सोपा व काॅमन प्रकार आहे .घरोघरी आपापल्या चवीने व पध्दतीने बनविला जातो.फक्त चिरमुरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. संध्याकाळच्यावेळी चहासोबत तोंडात टाकणेसाठी किवा मुलांना येता-जाता खाण्यासाठी आपण करतो.पट्कन होणारा प्रकार आहे तसेच तेलकट नसतो,पचायला पण हलका असा हा चिवड्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मी जास्त विस्तारपुर्वक रेसिपी देत नाही . मात्र बरेच वेळा त्यात घातलेले शेगदाणे ,खोबरे जळते, कडीपत्ता , लसूण  करपतो.चिरमुरे किवा पोहे एकीकडे पिवळे तर दुसरीकडे पांढरे रहाते ,मीठ साखर,मसाला सगळीकडे नीट लागत नाही .असे काही होऊ नये म्हणून कांही टीप्स देते.

* तेल, मोहरी तडतडण्याइतकेच गरम करा. तेलातून धूर निघेपर्यत गरम नको.म्हणजे मोहरी,जिरे,तिळ न जळता फोडणी छान खमंग होते.

* फोडणी तडतडल्यावर त्यामधे सर्वात आधि शेंगदाणे घाला मंद गॅसवर तळत रहा.थोडेसे अर्धे-कच्चे तळले की मग खोबरं काप घाला .कारण खोबरे कमी वेळात तळते व शेगदाणे जास्त वेळ लागतो.मग लसूण अर्धवट ठेचून टाका.सतत हलवत रहा. सर्व गुलाबी रंगावर झाले की आता गॅस चक्क बंद करा. पुढच्या वस्तू तळायला आहे तेवढा तेलाचा व कढईचा गरमपणा पूरे होतो.

* आता अनुक्रमे फुटाणा डाळं ,कडीपत्ता ,हिरवी मिरची तुकडे टाका.हलवत रहा.हे सर्व न जळता छान कुरकूरीत होते व कडीपत्त्याचा रंग हिरवाच रहातो व छान वास येतो.

*आता सर्व तळून झाले की गॅस बंदच ठेवून आरामात लाल तिखट पूड ,हळद ,हींग,साखर , मीठ ,मेतकूट किवा धनाजिरा पावडर तयार फोडणीत टाका .जळत नाही रंग चांगला येतो व मीठ साखर विरघळते व सगळीकडे लागते . आता चिरमूरे किवा पोहे घाला. आणि व्यवस्थित हलवा की, जेणेकरून सर्व मीठ मसाला तिखट चिरमुर्याना लागेल.

*आणि आता सर्वात शेवटी कढई परत गैसवर ठेवा व एकदम मंद गैस ठेवा व पंधरा मिनिटे मधून मधून हलवत रहा की खाली लागणार नाही .किवा दुधाखाली ठेवतात ती जाळीची प्लेट असेल तर ठेवा व परतत रहा.छान कुरकूरीत व खमंग होते

* आता ते गार होईपर्यंत कढईतच राहू दे.नंतर गार झाल्यावर डब्यात भरताना आधि त्यातील कडीपत्ता मिरची हाताने चूरडून टाकावे म्हणजे खाताना मधे येत नाही ,चव पण लागते व काढून टाकले जात नाही सर्वेच खाल्ले जाते.

अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून भडंग किवा कोणताही चिवडा केला तर छान खमंग चव व रसरशीत रंग येतो. नाहीतर जळके दाणे,खोबरे तोंडात कडू लागतेय ,काळा करपलेला कडीपत्ता काढून टाकतात ,लसूण दाताखाली आला तर जळका नाहीतर कच्चाच लागतोय , रंगपण हळद ,तिखट करपून काळापट व एकीकडे पांढरे,पिवळे चिरमुरे असा रंगबिरंगी दिसते.म्हणून थोडेसे लक्षपूर्वक करावे व आरामात अशा खमंग कुकूरीत भडंगाचा आस्वाद घ्यावा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.