नवरतन कोरमा एक मस्त, हलकेसे मसाल्याचे वास व गोडसर चवीची भाजी आहे. यामधे नऊ भाज्या घातल्या जातात. म्हणून नवरतन कोरमा नांव पडले. असे असले तरी आपल्या आवडी नुसार व उपलब्धते नुसार भाज्या घेतल्या तरी चालते. साहित्य व कृती,
साहित्य :-
* पनीर १०० ग्रँम
* फ्लाॅवर तुरे १/२ वाटी
* बीन्स ७-८
* गाजर १
* मटार १/२ वाटी
* शिमला मिरची लहान १
* बटाटा लहान १
* कांदा १ मोठा
* टोमँटो १ मोठा
* आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
* काजू १०-१५
* दूध १/२ कप
* फ्रेश क्रिम २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* हळद
* लाल मिरचीपूड १/२ टीस्पून (ऐच्छिक)
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* लवंगा ४
* दालचिनी २ तुकडे
* तमालपत्रं लहान १
* तेल २ टेस्पून
* पाणी गरजेनुसार
कृती :-
प्रथम सर्व भाज्या मोठ्या चौकोनी तुकड्यामधे कापून घ्याव्यात व गरम पाण्यात टाकून थोड्या मऊ करून घ्याव्यात. पनीर पण लहान क्यूब करून तेलावर किंचित तांबूस परतावे.
नंतर कांदा चिरून पेस्ट करावी. टोमँटो व काजूची पण पेस्ट करावी. २-३ काजू तुकडे करून घालण्यासाठी बाजूला ठेवा.
आता पँनमधे तेल घालावे. गरम झाले की, त्यामधे लवंग,दालचिनी व तमालपत्र घालून त्यावर कांदा पेस्ट घालावी. ती गुलाबी रंगावर परतली की,आलं-लसूण पेस्ट घालून परतावे. आताच हळदही घालावी. लगेच त्यावर टोमँटो व काजूपेस्ट घालावी. नंतर धना-जिरा पावडर, मीठ, मिरची पूड घालावे.
आता सर्व भाज्या व पनीर घालून परतावे.काजू तुकडे घालावेत. नंतर त्यामधे दूध व थोडे पाणी घालून एक उकळी काढावी. भाज्या आधि हाफ बाँइल केलेल्या असल्याने एका उकळीत शिजतात.फार जास्त गिरगिरीत नको.
आता तयार कुर्मा बाउलमधे काढून, वरून फ्रेश क्रिम घालावे व गरम फुलके, पोळीसोबत खावे.
टिप :-
* आवडीनुसार अननसाचे चार-पाच तुकडे किंवा डाळींबाचे दाणेही वरून घालावे. गोडसर छान चव येते.
* थोडा खवा किवा एखादा पेढाही घातला तरी चालते.
* थोडी आंबट -गोड चव हवी असेल तर, एक चमचा दही घातले तरी चालते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment