'साबुदाणा खिचडी ' हा उपवासाचा पदार्थ सर्वपरिचित आहेच. कांही घरात तर खूपच आवडती डिश असते. घरात जर एका कोणाचा उपवास असेल तर खिचडी मात्र सर्वासाठी असते. मात्र खिचडी मोकळी व लुसलू़शित असेल तरच मस्त लागते. अशी खिचडी कशी करायची साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* साबुदाणा २ वाट्या
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/४ वाटी
* हिरवी मिरची भरड वाटून १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* बटाटा साल काढून चौकोनी चिरून १
* आंबट ताक अर्धी वाटी
* जीरे १ टीस्पून
* तूप किंवा शेंगदाणा तेल २ टेस्पून
* ओलं खोबरं
* लिंबू
* कोथिंबीर ( उपवासाला चालत असेल तर)
कृती :-
प्रथम साबुदाणा दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातील पाणी पुर्ण काढून टाकावे. आता त्यात आंबट ताक घालावे व गरज वाटली तर थोडेसे पाणी , साबुदाणा पुर्णपणे बुडेल इतके घालावे व २ -३ तास झाकून ठेवावा.
तीन तासानंतर साबुदाणा बोटाने दाबून बघावा दबला जात असेल तर भिजला समजावे अन्यथा पाणी शिंपङून अजून १५ मिनिट ठेवावा.
आता भिजून तयार झालेला साबुदाणा हाताने मोकळा करावा व त्यामधे शेंगदाण्यांचे कूट, मीठ, साखर व्यवस्थित मिसळून घ्यावे.
नंतर कढई अथवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप/तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत. व फोडणीमधे हिरवी मिरचीची भरड, बटाट्याच्या फोडी टाकून परतावे. फोडी मऊ करून ध्याव्यात.
शेवटी तयार केलेला साबुदाणा घालून व्यवस्थित परतावे. साबुदाणा पारदर्शक झाला की खिचडी तयार झाली समजा व गरमा-गरम खिचडी वरून खोबरे व घालून, लिंबूची फोड ठेऊन खायला द्यावी.
टिप्स :
* या खिचडीला हिरवी मिरचीच वापरावी. खिचडीचा रंग स्वच्छ दिसतो.
* खिचडी झाकून वाफवू नये चिकट होते.
* भिजवताना ताक घातल्याने साबुदाणा फुलतो व खिचडी मोकळी व्हायला मदत होते व चवही चांगली येते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment