24 September 2016

शेजवान फ्राइड राईस (Schezwan Fried Rice)

No comments :

भाताचे विविध प्रकार आहेत.आताच्या नविन पिढीला चायनीज पदार्थ आवडतात. त्यापैकीच "शेजवान  फ्राइड राईस " हा एक भाताचा प्रकार आहे. संध्याकाळ झाली की रस्त्यावर विविध चायनीज पदार्थाचे गाडे लागतात. खूप गर्दी असते. वन डिश मिल म्हणून उत्तम प्रकार आहे. मग असा मुलांच्या आवडीचा पदार्थ आपण घरातच बनवला तर? अतिशय सोप्पा आहे. कसा करायचा साहीत्य व कृती,

साहित्य :-

* बासमती तांदुळ २ वाट्या
* गाजर १
* शिमला मिरची १-२
* बीन्स ८-१०
* कांदापात कांद्यासह ४
* शेजवान साँस २-३ टेस्पून
* सोया साँस १ टेस्पून
* व्हिनेगार १ टेस्पून
* मीठ चविनुसार
* मिरपूड १/४ टीस्पून
* साखर चिमूटभर
* तेल २ टीस्पून

कृती :-

प्रथम  मोकळा भात शिजवून घ्यावा व  ताटात पसरून गार होण्यासाठी ठेवावा.

नंतर गाजर, शिमला, बीन्स बारीक चिरून घ्यावे.  कांदापातीचा खालचा पांढरा कांदा व हिरवी पात वेगवेगळे बारीक चिरून घ्यावे.

आता पॅनमधे तेल गरम करावे व  आधि पांढरा कांदा घालावा नंतर गाजर, बिन्स व शिमला मिरची टाकून २-३ मिनिट परतावे. गँस मोठाच ठेवावा.

नंतर त्यामधे शेजवान साँस, सोया साँस, मीठ,साखर, मिरपूड घालून परतावे व शिजवलेला भात, व्हिनेगार व शेवटी हिरवी कांदापात घालून  परत व्यवस्थित परतावे.

गरमा-गरम "शेजवान फ्राइड राईस" वरून हिरव्या कांदापातीची सजावट करून सर्व्ह करा.

टिप्स :-

* भाज्या जास्त परतू नयेत. थोड्या क्रंचीच (कचवट)  ठेवाव्यात.
* शेजवान साँस झणझणीत असते, आवडीनुसार कमी-जास्त करावे.
* भाज्या आवडीनुसार घ्याव्यात.कोबी,फ्लाॅवर पण घेऊ शकता. मात्र शिमला मिरची व कांदापात आवश्यक आहे. विशिष्ट चव येते.
* शेजवान साँस मधे आलं-लसूण असतेच परंतु अधिक स्ट्राँग स्वाद पाहिजे असेल तर बारीक चिरून तेलात सर्वात आधि टाकून नंतर कांदा,भाज्या घालावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment