"रवा टोस्ट " यालाच "एगलेस फ्रेंच टोस्ट" ही म्हणतात. रवा टोस्ट झटपट होणारा रोडसाईड स्नँक्स चा प्रकार आहे. तसेच सकाळचा नाष्टा किंवा संध्याकाळचे स्नँक्स अथवा मुलांना डब्यात देण्यासाठी पण उपयुक्त पदार्थ आहे. कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ब्रेड स्लाइस ६
* बारीक रवा १ वाटी
* दही १/२ वाटी
* कांदा लहान १ बारीक चिरून
* शिमला मिरची लहान १ बारीक चिरून
* टोमँटो १ बारीक चिरून
* कोथिंबिर चिरून
* आलं, चिरून
* हिरवी मिरची बी काढून बारीक च्रिरलेली १
* मीठ चविनुसार
* चिमुटभर साखर
* शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी
* बटर
कृती :-
प्रथम रवा एका बाऊलमधे घेऊन त्यामधे दही घालावे व एकत्र ढवळावे. आता मिश्रण भिजेपर्यंत कांदा, टोमँटो, मिरची, कोथिंबिर, आलं सर्व बारीक चिरून घ्यावे. आधीच चिरून ठेवलेले असेल तरी चालते.
एव्हाना रवा भिजला असेल. आता त्यामधे चिरलेल्या भाज्या,कांदा, कोथिंबीर, मीठ, साखर सर्व साहित्य मिसळावे व मिश्रण तयार करावे.
आता गँसवर तवा गरम करायला ठेवावा व गरम होंईपर्यंत ब्रेड चा एक स्लाईस घ्यावा. त्यावर शेजवान चटणी लावावी व रव्याचे तयार मिश्रण त्यावर व्यवस्थित पसरावे. असे एकावेळी दोन स्लाईस तयार करायचे.
आता गरम तव्यावर थोडे बटर पसरून ब्रेडची मिश्रण लावलेली बाजू तव्याला चिकटेल अशा पध्दतीने ब्रेड स्लाईस तव्यावर ठेवावे. ब्रेडला वरच्या बाजूने पण बटर लावावे. व मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजावे. मधेच उलटे-पालटे करावे. करपू देऊ नये. भाजेपर्यंत दुसरे स्लाईस मिश्रण लावून तयार करावेत.
आता तयार टोस्ट कटरने मधून तिरके कापावा व साँस किंवा हिरव्या चटणी सोबत खायला द्यावे.
खुसखूषीत गरम टोस्ट नाष्ट्याला एकदम चविष्ट लागतो व झटपट होतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.
टिप्स :-
* आपल्या आवडीनुसार बारीक चिरून पालक,कांदापात गाजर, बीट काकडी रव्याच्या मिश्रणात घातले तरी चालते.
* मिश्रण फार पातळ करू नका. घट्टच असावे.
* दही खूप आंबट असू नये. ताजे असावे.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.