29 November 2015

गोळ्याची आमटी (Curry)

No comments :

गोळ्याची आमटी हा एक मराठी पारंपारिक पदार्थ आहे. रोज तिच तिच डाळीची आमटी खाऊन कंटाळा येतो, पण रोजच्या जेवणात एक पातळ पदार्थ लागतोच. तेव्हा ही आमटी करायला हरकत नाही. साहीत्य व कृती पहा -

साहीत्य :-

* चणा ङाळीच पीठ 1 वाटी
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* गोडा मसाला 1/2 टीस्पून
* मीठ चवीनुसार
* मिरची-लसूण पेस्ट 1/2 टीस्पून
* हळद हींग
* सोडा चिमूटभर
* पाणी गरजेनूसार

आमटी साहीत्य
* तेल 2 टेस्पून
* मोहरी,हीग,हळद
* कङीपत्ता
* सुक खोबरे व जीरे कुटून 1 टेस्पून
* चिंचेचा कोळ 1 टेस्पून
* गूळ सुपारी इतका एक खडा
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* गोडा मसाला 1/2 चमचा
* लाल मिरची पावङर 1 टीस्पून
* मीठ चवीनूसार
* पाणी 5-6 वाट्या ( कमी-जास्त घेऊ शकता)
* कोथंबिर

कृती :-

प्रथम डाळीचे पीठ एका बाउलमधे घ्या.त्यामधे  वर गोळ्यासाठी दिलेले सर्व साहीत्य घाला व हाताने एकत्र करा. आता गरजेइतके म्हणजे गोळे करता येतील इतपत पाणी घालून घट्टसर भिजवून पंधरा मिनिट ठेवून द्या .तोपर्यत आमटीची तयारी करावी.

एका पातेल्यात तेल गरम करा. तापल्यावर त्यामधे हिंग मोहरी  हळद घालून फोडणी करा.कडीपत्ता टाका व पाणी घाला. आता त्यामधे वर आमटीसाठी दिलेले सर्व साहीत्य घाला व उकळी येऊ दे.

आता  आधि भिजवून ठेवलेल्या पीठाचे लहान-लहान गोळे तयार करा व उकळत्या  आमटीमधे सोडा व चांगले शिजू द्या . पाच मिनिटात शिजतात. आता जर आमटी फार पातळ वाटली तर, एक लहान चमचा डाळीचे पीठ पाण्यात कालवून आमटीत घाला व एक उकळी काढा.

गरमा-गरम गोळ्याची आमटी वरून कोथंबिर घाला व भात किवा पोळीसोबत वाढा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

आवळा लोणचे (Indian. Gooseberry Pickle)

No comments :

या मोठ्या आवळ्यांना 'डोंगरी आवळा' सुध्दा म्हणतात. आवळा हे तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे फळ आहे. व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहीले जाते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. शिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बियासुद्धा औषधी गुणांच्या असतात. अशा या गुणी आवळ्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, आवळकाठी, सुपारी , सरबत इत्यादी अनेक पदार्थ केले जातात. सिझनमधे जितका जास्त खाता येईल तेवढा निरनिराळ्या प्रकारानी खाऊन घ्यावा. आज मी ताजे-ताजे लगेच खाता येण्यासारखे लोणचे केले.कसे पहा.

साहीत्य :-

* आवळे मध्यम आकाराचे 8-10 नग
   (250 ग्रॅम)
* मोहरी डाळ 2 टेस्पून
* मेथी दाणे पाव टीस्पून
* हळद अर्धा टीस्पून
* लाल मिरची पूड अर्धा टीस्पून
* मीठ 6 टीस्पून किवा चवीनुसार
* हिंग पाव टीस्पून
* मोहरी अर्धा टीस्पून
* तेल 2-3 टेस्पून
* पाणी अर्धी वाटी

कृती --

प्रथम आवळे धुवून-पुसून साधारण चपट्या अर्ध चंद्राकृती फोडी कराव्यात. मीठ, हळद व मिरची पूड घालून एका बाऊलमधे ठेवा.

आता मोहरीडाळ मिक्सरवर बारीक करा व त्यातच  पाणी घाला. नाकाला झिणझिण्या येईपर्यत (अंदाजे पांच मि.) घुसळावे व चिरलेल्या फोडीवर घालावी. मेथीदाणेपण तेलात तळून बारीक पूड करून घाला. सर्व व्यवस्थित कालवावे.

नंतर लहान कढल्यात तेल गरम करून हिंग, मोहरीची खमंग फोडणी करावी व थंड करून तयार केलेल्या लोणच्यावर घालावी व परत एकदा नीट हलवावे. लोणचे तयार !

ताजे-ताजे थोडे आंबट, थोडे तूरट चवीचे करकरीत लोणचे जेवणाची लज्जत वाढवते. तोंडाची रूची वाढवते. व हे लोणचे करकरीत खाण्यातच मजा येते

टीप : हे लोणचे फ्रीजमधे ठेवून खाल्यास आठ ते दहा दिवस टिकते. बाहेर फोडी मऊ पडतात व रंगही काळवंडतो. चवीत फरक पडत नाही.

तसेच जर जास्त प्रमाणात आवळे असतील  व बर्षभरासाठी करायचे असेल तर फक्त पाणी घालू नये.बाकी सर्व कृती सारखीच.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

24 November 2015

पालक कोफ्ता करी ( Palak Koffta Curry)

No comments :

आपण नेहमीच दुधी ,कोबी ,बटाटा अशा भाज्याचे 'कोफ्ता करी' बनवतो. आज थोडी वेगळ्या प्रकारची ''पालक कोफ्ता करी'' आपण बनवू. रीच अॅन्ड हेल्दी !

साहीत्य :-
कोफ्ता साठी
--------- -
* पालक बारीक चिरून 2-3 वाट्या
* डाळीचे पिठ 1 वाटी
* हिरवी मिरची पेस्ट 1 टीस्पून
* आलं एक इंच बारीक चिरून
* मीठ चवीला
* हिंग चिमूटभर
* हळद
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* पाणी गरजेनूसार

करी साठी
---------
* लाल पिकलेले टोमॅटो  2 नग
* काजू  8-10
* शेंगदाणे 1 टेस्पून
* कादा बारीक चिरून मध्यम आकाराचा 1 नग
* आलं-लसंण पेस्ट अर्धा टीस्पून
* लाल मिरचीपूड 1 टीस्पून
* हळद पूड अर्धा टीस्पून
* धना-जिरा पावडर 1टीस्पून
* गरम मसाला 1टीस्पून
* मीठ चवीनूसार
* जीरे 1/2 टीस्पून
* तेल 4 टेस्पून
* पाणी गरजेनुसार

कृती :-

कोफ्ता
------
सर्वात आधी  एका बाऊलमधे डाळीचे पीठ घ्या. आता त्या पिठा मधे चिरलेला पालक व वर सांगितलेले इतर सर्व साहीत्य मिसळा. बघत- बघत पाणी घाला व घट्टसरच असे भजी सारखे पीठ भिजवा.

नंतर ओवन सेफ ट्रेला तेलाचा हात लावून, त्यामधे लहान - लहान चपटे गोळे करून ठेवा.
आता तो ट्रे मायक्रोवेव्ह ओवनला  हाय टेप. ला 4 मि. ठेवून द्या. तोपर्यत करीची तयारी करू. कोफ्ते तयार झाले की हाताला न चिकटता एकदम खुटखूटीत होतात.

करी
-----
पॅनमधे तेल गरम करत ठेवा. तोपर्यंत काजू, शेंगदाणे व टोमॅटोची मिक्सरवर पेस्ट करून घ्या.

आता तापलेल्या तेलात जिरे तडतडवून घ्या. त्यावर कांदा टाका. कांदा परतत आला की आल-लसूण पेस्ट टाका व परता. आता टोमॅटो काजूची तयार केलेली पेस्ट घाला व परतत परतत हळद , मिरची पूड, धना-जीरा पावडर ,गरम मसाला व मीठ घाला. सर्व मिश्रण तेल सुटे पर्यंत परता व शेवटी आपल्या आवडी नुसार कमी- जास्त पाणी घाला. शक्यतो घट्टसरच असावी ग्रेव्ही.  खाण्यास चांगली लागते. एक उकळी येऊ दे.

शेवटी तयार कोफ्ते या गरम ग्रेव्ही मधे सोडा. पाच मिनिटाने गॅस बंद करा व गरमा-गरम 'पालक कोफ्ता करी' चपाती किवा फुलक्यां सोबत सर्व्ह करा.

टीप :- कोफ्ते भजी प्रमाणे तेलात तळून घेतले तरी चालतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 November 2015

मेथी पुरी ( Methi Puri)

No comments :

मेथी भाजी  मस्त खमंग लागते व त्याचे विविध असंख्य प्रकार बनवता येतात. जसे की, जेवणात भाजी तर बनवतोच तीन-चार प्रकारानी पण इतर भजी, कटलेट, पराठे, पचडी विविध प्रकार सुध्दा बनविता येतात. आता बाजारात छान येतेय मेथी , तर विविध प्रकार करून भरपूर खा. आज मेथीची मस्त खुसखूषीत खमग पूर्या केल्या. साहीत्य व कृती पहा.

साहीत्य :-
* गव्हाचे पिठ 4 वाट्या
* मैदा अर्धी वाटी
* बारीक चिरलेली मेथी 2 वाट्या
* कसुरी मेथी 2 टेस्पून
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* हळद पावडर 1/2 टीस्पून
* मिरची पावडर 2 टीस्पून
* मिठ चवीनुसार
* हींग चिमूटभर
* तिळ 2 टीस्पून
* तेल
* पाणी

कृती :-

प्रथम गव्हाचे पिठ एका खोलगट बाऊल मधे घेऊन,त्यामधे तिखट,मीठ,हींग, धना जिरा पावडर घालून कोरडेच एकत्र करावे.

नंतर दोन टेस्पून तेल कढईत तापत ठेवा. तेल तापले की त्यात तिळ, हळद टाका पाठोपाठ कसूरी मेथी घाला थोडी तळली की, आता चिरलेली हिरवी मेथी टाका. पाच मिनट परतावे.थोडी मऊ झाली की गरम असतानाच आधी एकत्र करून ठेवलेल्या कोरड्या पिठात मिसळा व हाताने नीट मिक्स करून घ्यावे.

आता पाणी घेऊन थोडे थोडे घालत घट्ट कणिक भिजवा व दहा मिनिट झाकून ठेवा.

दहा मिनिटानी कणिकेच्या थोड्या जाडसर पुर्या लाटून गरम येलात तळा. मस्त खमंग खुसखूषीत ,' मेथी पुरी' तयार ! नुसत्याच किवा नाष्टयात चटणी , लोणचे साॅस घेऊन खा. चविला खुप छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

31 October 2015

पालकाचे खारे शंकरपाळे ( Spinach Namkin)

No comments :


गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो. आज मी थोडा बदल म्हणून 'पालकाचे खारे शंकरपाळे ' बनवले. तांबूस,पोपटी रंगाचे व खमंग खुसखूषीत असे शंकरपाळे छानच लागतात.

असे कुठे आहे की दरवर्षी दिवाळीला एकच प्रकारचे पारंपारीक पदार्थ बनवावेत यावर्षी पालक शंकरपाळे करून बघा. नक्की आवडतील तूम्हालापण. कसे केले बघा.

साहीत्य :

* मैदा २ वाट्या

* रवा १/४ वाटी

* पालक प्यूरी १/२ वाटी ( कमी-अधिक होऊ शकते)

* मोहन २ टेस्पून

* मीठ चविनूसार

* हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून

* ओवा १/४ टीस्पून

* धना-जीरा पावडर १ टीस्पून

* हींग चिमूटभर

* तिळ ऐच्छिक

* तळणीसाठी तेल

कृती :-

प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यात घ्या. त्यामधे रवा व  वरील इतर सर्व कोरडे साहीत्य घालून नीट मिक्स करा.

आता मोहन घाला. परत मिश्रण हाताने नीट सगळीकडे चोळून घ्या .

आता शेवटी पालक प्यूरी अंदाज घेऊन बघत बघत मिश्रणात घालावी.पुरीच्या किवा नेहमी शंकरपाळ्या करतो,त्या कणकेप्रमाणे घट्ट कणिक मळावी. पंधरा मिनिट झाकून ठेवा.

पंधरा मिनिटानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. फार जाड अथवा पातळ नको.सुरीने अथवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे कापून गरम तेलात खरपूस तळा.

खुसखूषीत कलरफूल खारे शंकरपाळे तयार ! थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.केव्हाही नुसते किवा चहासोबत खा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 October 2015

पोहा-छोले वडा (Vada)

No comments :

रोज-रोज सारखे नविन काय करायचे ? संध्याकाळचे वेळी तर हा प्रश्न फार सतावतो.  सर्वानाच चहा सोबत तसे हलके पण चटपटीत  काहीतरी खायला हवे असते. आपल्याला सुध्दा हवे असते. आज दुपारच्या जेवणात छोले मसाला करण्यासाठी छोले उकडले होते. त्यातलेच वाटीभर काढून ठेवले व संध्याकाळी थोडे पोहे वगेरा इतर साहीत्य घालून वडे केले. छान झाले खुसखूषीत. कसे केले बघा साहीत्य व कृती...

साहीत्य :-

* भिजवून वाफवलेले छोले 1 वाटी
* भिजवलेले जाड पोहे 1 वाटी
* तादुळाची पिठी 2 टेस्पून
* कांदा बारीक चिरून ऐच्छिक
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट एक टीस्पून
* कोथंबिर बारीक चिरून
* मीठ चविनुसार
* गरम मसाला 1 टीस्पून
* आमचूर पाव टीस्पून
* हळद पूड
* तेल

कृती :-

प्रथम वाफलेले छोले व पोहे मिक्सरमधे भरड वाटून घ्या.

आता वाटलेल्या मिश्रणामधे वरील सर्व साहीत्य घाला व पाण्याचा हात घेउन सर्व मिश्रण एकजीव करा.

गरम तेलामधे, तयार मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटे गोळे करून खरपूस तळा.

मस्त खमंग खरपूस वडे हिरवी चटणी , साॅस सोबत खायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 October 2015

बिन तूपाचे रवा लाडू ( Without ghee laddu)

1 comment :

सामान्यपणे गोड पदार्थ म्हणले की भरपूर तूप,साखर ,सुका मेवा असे सर्व वापरून केलेला पदार्थ डोळ्यासमोर येतो. पण आज मी तूपाचा एक थेंबही न वापरता पण पारंपारीक चवीचेच रवा लाडू बनविले .कसे व साहीत्य काय ते पहा .

साहीत्य:-

* रवा 1वाटी
* ओले खोबरं खवलेले 1 वाटी
* पीठीसाखर 1 वाटी
* दूध अर्धी वाटी
* वेलची पावडर
* ड्रायफ्रूट्स  ऐच्छीक

कृती :-

प्रथम रवा एका कढईत कोरडाच गुलाबी रंगावर भाजा.

नंतर झाकणाच्या स्टीलच्या पसरट डब्यात काढा. त्यात ओलं खोबरं मिसळा. हाताने नीट एकजीव करा. शेवटी वरून दूध शिंपडा.जर ओल खोबरं एकदम दुधाळ व मऊ असेल तर दूध कमी करा व खोबरं सुकट जून असेल तर थोडे अधिक वापरा.

आता डब्याला झाकण लावून डबा प्रेशर कुकर मधे ठेवा. तीन-चार शिट्टया काढा. गॅस बंद करा  . थोडा वेळ वाफ जिरू दे .

आता डबा बाहेर काढून मिश्रण गरम असतानाच त्यात पीठीसाखर व वेलचीपूड, सुका मेवा मिसळा. व परत एक तास झाकण लावून कडेला ठेवून द्या

एक तासा नंतर मिश्रण ताटात काढा ओल्या हाताने चांगले मळा म्हणजे गुठळी रहात नाही.व आपल्या आवडीच्या आकाराचे लाडू वळा. वळताना वर एकेक बेदाणा ,काजू लावा. मस्त दुधाळ चवीचे रवा लाडू तयार !

टीप ;- हे लाडू शक्यतो लवकरात लवकर संपवावेत.ओला नारळ आहे व तूप अजिबात नाही .तर खराब होऊ शकतात.

वर दिलेल्या साहीत्यात फोटोतिल आकारमानाचे दहा ते बारा लाडू होतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

13 October 2015

उपवासाची भाजाणी (Fasting Bhajani)

No comments :

उपवासाची भाजाणी

साहीत्य :-

* शाबूदाणा 1 किलो
* वरी तांदुळ 1 किलो
* राजगिरा 500 ग्रॅम
* जीरे ऐक टेस्पून

कृती ;-

वरील तीनही पदार्थ वेगवेगळे गुलाबी रंगावर भाजून घ्या. शाबूदाणे भाजण्याआधी थोडे तूप चोळावे म्हणजे, भाजताना कढईला चिकटत नाही. फार तांबूस भाजू नये. कारण भाजणी काळपट होते.जीरे कच्चे घाला.

थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणा. किवा प्रमाण कमी असेल तर घरी मिक्सरवर होते.

तयार भाजणी चाळून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. दोन-तीन  महिने आरामात टिकते.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

उपवासाचे डोसे ( Fasting Dosa)

No comments :

उपवास म्हणले की नेहमीचीच शाबूदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. पण झटपट व वेगळे काय करावे ? घरात उपवासाची भाजाणी तयार असेल तर, डोसे केव्हाही काढता येतात. कसे करायचे पहा.

साहीत्य :-

* उपवासाची भाजणी पीठ 2 वाट्या
* ताक अर्धी वाटी
* मीठ चविनुसार
* जीरे अर्धा टीस्पून
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* पाणी गरजेनुसार
* तेल/ तूप

उपवास भाजणी http://swadanna.blogspot.in/2015/10/fasting-bhajani.html?m=0 येथे पहा.

कृती :-

प्रथम उपवासाची भाजणी एका बाऊलमधे घ्या.
त्यामधे मीठ, जीरे , मिरची घाला.एकत्र करा.

आता ताक घाला व शेवटी हलवत-हलवत बघून पाणी घाला. गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. भजीच्या पीठापेक्षाही पातळच ठेवावे.

आता  तापलेल्या तव्यावर थोडे तेल /तूप सोडा व तवा फिरवत थोड्या उंचावरूनच डावाने पीठ ओता. एखादा मिनिट झाका. वाफ येईल. नंतर तूप सोडून दुसरी बाजू भाजा.दोन्ही बाजूनी खरपूस भाजा. गरम असतानाच खुसखूषीत डोसा चटणी, दहीसोबत खा.

डोसे, हॉटेलमधल्या रव्या डोश्यासारखे होतात. सोबत उपवासाची एखादी भाजी किंवा नारळ + मिरची + जिरे + दाणे + मीठ + लिंबू अशी चटणी घ्या.. किवा पीनट बटर पण चांगले लागते .

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 September 2015

स्ट्राॅबेरी बर्फी ( Strawberry Burfi)

No comments :

स्ट्राॅबेरी म्हणले की मस्त लाल-गुलाबी रंग व रसाळ ,साधारण आंबटगोड चवीचे फळ डोळ्यासमोर येते. मात्र हे फळ हिवाळ्यातच येते. तसे आजकाल बाराही महीने सर्व मिळते. स्ट्राॅबेरी क्रश, जाम, विविध मिठाया तसेच आईसक्रीम, असे बरेच प्रकार बनवले जातात. आजकाल लहान मुलांची बरीच औषधे, खोकल्यावरच्या गोळ्या ...एकंदरीत त्याचा स्वाद व मोहक रंग सगळ्यांनाच आवडतो. तुम्हालाही आवडेल कशा करायच्या साहीत्य व कृती ...

साहीत्य ;-

* ओल्या नारळाचे खवलेले खोबरे 2 वाट्या
* साखर 1 1/2 (दीड) वाटी
* स्ट्राॅबेरी क्रश पाव ते अर्धी वाटी किवा जाम 2 टेस्पून
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* पिठी साखर 2 टेस्पून
* रोज किवा स्ट्राॅबेरी इसेन्स 5-6 थेंब

कृती :-

प्रथम जाड बुडाची कढई किवा नाॅनस्टीक पॅन घ्या. वर दिलेल्या साहीत्यापैकी पिठीसाखर व इसेंन्स सोडून बाकी सर्व साहीत्य एकत्र करा व मंद आचेवर शिजत ठेवा.

सतत ढवळत रहा.खाली लागण्याची शक्यता असते. करपले तर बर्फीचा रंग व चव बदलते. म्हणून काळजी घ्यावी.

आता पंधरा मिनिटांनी सर्व मिश्रण कढईपासून सुटायला लागेल. मिश्रण आळून येईल. तर आता शेवटी पिठीसाखर व इसेंन्स घालून, गॅस बंद करून चांगले घोटा. कोणत्याही वडीचे मिश्रण जितके जास्त घोटाल, तितके बर्फी चिकट न होता खुटखुटीत होते व लवकर सुकते.

नंतर मिश्रण ताटात घाला व प्लॅस्टीक शिट किवा पिशवी त्यावर घालून हाताने व्यवस्थित थापा. थोडे थंड झाले की सुरीने रेषा पाडून ठेवा.

अर्धा तासाने पुर्ण थंड होईल, मग वड्या काढा व डब्यात ठेवा.

खुप छान गुलाबी लाल रंग येतो व आकर्षक दिसतात. तसेच चवीला पण उत्कृष्टच लागतात.

15 September 2015

कच्चे केळ, बटाटा उपवास थालिपिठ

No comments :

उपवास आहे म्हटले की, नेमके काही खमंग असे खावे खावे वाटते. त्यातूनही तेलकट नको असे वाटत असते . खिचडी नेहमीच होते .फळांचा कंटाळा येतो. दूध आवडत नाही. मग खायचे काय ? हे सात्विक थालीपिठ करून बघा. उपवास रोजच करावा वाटेल ! कसे करायचे पहा.

साहीत्य :-

* कच्चे केळ 2 नग
* बटाटा 1 मध्यम
* भिजलेला शाबूदाणा 1 वाटी (ऐच्छिक)
* राजगिरा पिठ 1 वाटी
* शिंगाडा पिठ अर्धी वाटी
* भाजक्या शेंगदाण्याचे कूट पाव वाटी
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* जीरे एक टीस्पून
* भाजण्यासाठी तेल/तूप

कृती:-

प्रथम कच्चे केळ व बटाटा उकडून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढून खिसून घ्यावे.

खिसलेल्या लगद्यामधे वर दिलेले सर्व साहीत्य घाला.गरज वाटल्यास राजगिरा व शिगाड्याचे पिठ कमी-जास्त करा  व हातानेच नीट एकजीव करून गोळा तयार करा.

तयार पिठाचा साधारण मध्यम आकाराच्या पेरू इतका गोळा घ्या  व नाॅनस्टीक तव्यावर हाताने थापून घ्या. तेल/तूप सोडून उलट-सुलट खरपूस भाजून घ्या.

मस्त घट्ट दही किवा हिरवी मिरची भाजून दह्यात चुरडून टाका व चवीला मीठ घाला. मिरचीचा चटका तयार ! खा आरामात.

टीप :- बटाटा न घेता नुसते केळच वापरून केले तर जास्तच चांगले. केळात बटाट्यासारखे फॅट्स नसतात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 September 2015

उकडीचे मोदक बनवताना कोणती खबरदारी घ्याल ?

No comments :

मोदक, म्हटले की गणपती बाप्पा ! असे समिकरणच आहे.त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. 'उकडीचे मोदक' करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते.  बर्याच गृहीणी 'उकडीचे मोदक' म्हटले की,करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे अजिबात अवघड नाही.

* मोदकासाठी पिठी तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती , आंबेमोहोर  व तोही नवा घ्यावा . त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखर्या(चुण्या) पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पिठी मिळते , खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावी.

* सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.

* आतल्या सारणासाठी नारळ  फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.

* नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा. म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.

* सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा .खारट नको.

*सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या. तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.

* सारण आदले दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. घाई-गडबड वाचेल.

* मोदक तयार करताना उकड गरम असावी . तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत. यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.

* उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही मोठे चविष्ट लागतात.घरगुती पांढरे लोणी वापरा.

* मोदक  तयार करताना त्याच्या कळ्या पाडणेचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.मुखर्या छान धारदार पाडता येतात . हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.

* पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. खालून फाटत नाहीत.

* मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे/करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुध्दा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल/ तूप चोळा .

* मोदक उकडायला ठेवताना आधि पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.

* तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिकटून फाटणार नाहीत.

आता इतके त्याचे नखरे संभाळून केलेले 'उकडीचे मोदक' बाप्पाला का नाही आवडणार ? नक्कीच आवडतील. व तुम्हाला पण आवडतील ! ते कसे करायचे , साहीत्य व कृतीसाठी पुढे दिलेल्या लिकवर क्लिक करा.

04 September 2015

शेवयाची खीर ( Sevai Kheer )

No comments :

शेवयाची खीर सर्वाच्याच परिचयाची आहे. ऐत्यावेळी कोण पाहुणा आला किवा नैवेद्याला पट्कन आपण करतो. पण त्यातसुध्दा प्रत्येकाची करण्याची पध्दत निरनिराळी असते. तसेच बरेचवेळा कोणाची पातळ ,अगदी शेवया तळाला व दुध वर असे होते. तर कधी उकडलेल्या शेवयाच जास्त, दूध कमी.इतके की शेवयाचा शिराच खातोय असे वाटते. पण खीर अशी असावी की, ती जास्त घट्ट नको,जास्त पातळ नको रूबरूबीत असावी. कशी करायची पहा.

साहीत्य :-

* बारीक बिना पाॅलिशच्या शेवया 1/2 वाटी
* दूध 1/2 लिटर
* साखर 1/4 वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* पाणी अर्धी वाटी
* तूप 1टेस्पून
* वेलची पूड
* ड्राय फ्रूट्स ऐच्छीक

कृती :-

प्रथम दूध उकळण्यास एका गॅसवर ठेवून द्या.
तोपर्यंत एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून शेवया चांगल्या तांबूस गुलाबी परतवून घ्या.

नंतर त्यामधे गरम पाणी अर्धी वाटी घाला व शेवया चांगल्या शिजून मऊ होऊ देत.

आता दूध उकळून घट्ट झाले का ते बघा. नसेल तर अजून चांगले उकळून आटू दे.मलईसह राहू दे.मलई काढू नका.

आता हे आटीव दूध आधि शिजवून ठेवलेल्या शेवयांमधे घाला. नंतर शेवयासह पाच मिनिट सर्व उकळू दे.

आता गॅस बंद करून साखर, वेलचीपूड ,ड्रायफ्रूट्स घाला.

खायला देताना वरून लोणकढी तूप टाकून गरम असतानाच द्या. नुसती खा किवा पोळी/पुरी सोबत खा . छानच लागते.

टीप :- घरामधे बरेचवेळा पेढे शिल्लक असतात. असतील तर कोणत्याही खीरीमधे एखादा पेढा चुरडून टाका.अजून छान रुबरुबीतपणा येतो.


पौष्टिक सलाद (Healthy Salad )

No comments :

नेहमीच आहारात कच्या भाज्या, मोड आलेली कडधान्य असावीत असे म्हणतात .पण या धकाधकीत कुठे सगळे रोज करणे व खाणे जमते ? तर हे सर्व  व झटपट कसे करून  पोटात जाईल ते बघा .

साहीत्य :-

* मूग मोड आलेले
* पातीचा कांदा
* कोबी
* टमाटा
* बीट
* एखादी बारीक चिरून हिरवी मिरची
* कोथिबिर
* लिंबू
* मीठ
* चाट मसाला

कृती :-

वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून , बारीक चिरून घ्याव्यात.

एका बाऊलमधे चिरलेले सर्व साहीत्य व मूग घ्या .त्यावर मीठ, लिंबू, चाट मसाला घाला व हलवा.शक्यतो ऐत्यावेळी मीठ लिंबू मसाला घाला.

जेवताना घ्या किवा आधीच जरी भुक लागल्यावर डिश मधे घेऊन खा किवा सकाळच्या नाष्ट्यात घ्या. यावरच संध्याकाळचे वेळी थोडा चिवडा किवा बारीक शेव घालून मुलांना दिले तरी भेळेसारखेपण होते.

भाज्या घरात असतातच .फक्त हिरवे मूग दोन-तीन दिवसातून मोड आणून ठेवा फ्रिजमधे ! केव्हाही खाता येते व पौष्टीक होते.

ज्या काही उपलब्ध असतील त्या भाज्या आपल्या आवडीच्या प्रमाणात घ्या. फक्त घेताना शक्यतो  रोज आलटून पालटून भाज्या घ्या. म्हणजे एक दिवस कोबी तर उद्या त्याजागी काकडी, टोमॅटो आज तर उद्या गाजर, कांदापात/ पालक , लेट्यूस सिमला एकूण काय तर थोडी रंगसंगती व सर्वच आलटून पालटून पोटात जाईल इकडे थोडे लक्ष द्या.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.