30 April 2015

सांडगी मिरची (Stuffed Dried Chilly)

No comments :
सांडगी मिरची हा उन्हाळी वाळवणातला एक प्रकार आहे. एप्रिल-मे म्हणजे चांगली कडक उन्हे तापत असतात.गृहीणीची सांडगे, पापड, कुरडया असे विविध उन्हाळी पदार्थ करण्याची लगबग चालू असते. म्हणजे पूढे येणार्या  पावसाळ्याची बेगमी होते.पावसाळ्यात बरेच वेळा भाज्या चांगल्या मिळत नाहीत किवा पावसामुळे बाहेर जाणे त्रासाचे होते.तेव्हा हे उन्हाळी पदार्थ हाताशी असले तर जेवण चवदार होते.सांडगी मिरची ही तशी एकदम सोपी. हाताशी असली की फोडणीच्या कढईत तळून तेवढीच जेवणाची लज्जत वाढवता येते .तसेच दहीबुत्ती,दहीपोहे ,वेगवेगळी भरीत,कोशिंबीर याना फोडणी द्यायला पण कामी येते.खूप खमंग लागते.तसेच मी तर पालक ,चाकवत अशा गरगटी भाज्यांच्या फोडणीत ,दडप्या पोह्यामधे सुध्दा वापरते. घरात सर्वानाच खूप आवडते.मी इथे जागे अभावी फारसे उन्हाळी पदार्थ करू शकत नाही.मात्र हौस आहे.मग  उन्हाळा आला की ,थोड्याशाच मिरच्या आणायच्या इथे-तिथे खिडकीत गॅलरीत ठेवून वाळवायचे असे करते. या मिरच्या करण्यासाठी मंडईत खास मोठ्या व  कमी तिखट मिरच्या येतात. पण मी नेहमीच्या वापरातल्याच पण कमी तिखट असणार्या मिरच्या आणते.ज्वाला मिरची आणू नये. म्हाणजे लहान-लहान खाण्यास सोईच्या होतात.मी कशा केल्या ते साहीत्य व प्रमाण पूढीलप्रमाणे,
साहीत्य :-
1) हिरव्या मिरच्या 1/2 कि.
2) धणे 2 वाटी (200 gm)
3) मोहरी 1/2 वाटी, जीरे 1/4 वाटी 
4) तिळ 1/4 वाटी
5) मेथी दाणे 2 टेस्पून
6) हींग 2 टीस्पून
7) मीठ 3 टेस्पून 
8) हळद पावडर 2 टीस्पून
कृती :-
मसाला कृती
 प्रथम धणे, मोहरी, तिळ, हींग,मेथी हे सर्व कढईत नुसते गरम करून घ्यावेत. भाजायचे नाही. गार झाले की मिक्सरवर तिळ सोडून बाकी सगळ्याची छान बारीक पावडर करावी.दळतानाच त्यामधे मिठ घालावे म्हणजे जिन्नस चांगले बारीक व्हायलाही मदत होते.नंतर काढून त्यात हळदपूड व तिळ मिसळावे मसाला तयार. हा मसाला सवडीने आधिही करून ठेवला तरी चालतो. मिरच्या आणल्या की लगेच भिरच्या करू शकतो.
मिरची कृती
            मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात. नंतर त्याचे पूर्ण देठ न कापता अर्धेच
कापावे व पोटात उभ्या चिराव्यात. आरपार चिरू नये आत मसाला भरता आला पाहीजे.
नंतर एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात चमचाभर मीठ टाकावे व त्यात या चिरलेल्या मिरच्या टाकाव्यात. पाण्यात टाकल्याने त्यांचे बी काही प्रमाणात निघून जाते व तिखटपणा ही कमी होतो.तसेच पाण्यात टाकल्याने एकदम उकलल्या जातात व मसाला भरणे सोईचे होते. हे काम सकाळच्या कामातच करून ठेवा.
रात्रीची जेवणे उरकली की मिरच्या पाण्यातून काढून चाळणीवर निथळण्यास ठेवा.पूर्ण पाणी निथळून कोरड्या झाल्या मिरच्या की, वर तयार असलेला कोरडाच मसाला एक-एक मिरची मधे दाबून नीट भरावा.एका पसरट भांड्यात भरलेल्या मिरच्या एकावर एक भरून भरून रचाव्यात. रात्रभर तसेच झाकून राहू दे.
सकाळी उठल्यावर या मिरच्या परत एकदा  हाताने मसाला दाबून दाबून एक एक सुट्ट्या परातीत किवा सुपात पसरून ठेवा.व परात कडकडीत उन्हात नेऊन ठेवा. असे चार ते पाच दिवस कडक उन्हात वाळवाव्यात.
आता उन्हात कडक वाळून तयार झालेल्या मिरच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. गरज पडेल त्यानूसार डब्यातून काढा व तेलात तळा.अतिशय खमंग व खुसखूषीत लागतात.
गरमा-गरम डाळीची मऊ खिचडी त्यावर साजूक तुपाची धार , सोबत चवीला अशी खमंग तळलेली एखादी मिरची  बाहेर पाऊस पडतोय अहा..हा स्वर्गसुखच जणू !! बघा तुम्ही पण करून.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

27 April 2015

दम आलू ( Dum Aloo)

No comments :
आलू, बटाटा म्हणले की लहान थोर सर्वांनाच आवडतो . दम आलू ही पंजाबी डिश आहे . पण आजकाल सगळीकडेच लोकप्रिय असल्याने केली जाते . नेहमीच्या बटाटा भाजीपेक्षा थोडी वेगळी चव असल्याने आवडीने खाल्ली जाते . कशी करायची कृती व
साहित्य काय ते पुढे पहा .

साहित्य:-:-
 १) बेबी आलू १०-१२
२) मोठे लाल टोमॅटो २
३) मोठे कांदे २
४)हिरवी मिरची २-३
५) लसूण १०-१२ पाकळ्या
६) लाल मिरची ५-६
७) कोथिंबीर
८) काजू १/४ कप
९) बडीशेप १टीस्पून
१०) मीठ ,साखर चविसाठी
११) फोडणीसाठी तेल २ टेस्पून,लवंगा ४ ,वेलदोडे २ ,दालचीनी १ इंच व हळद
१२ ) फ्रेश क्रीम १/२ वाटी

कृती :- 
       प्रथम बटाटे साल निघण्या इतपत उकडून घ्यावेत . फार  मऊ नको .

बटाटे उकडेपर्यंत फोडणीचे साहित्य व फ्रेश क्रीम सोडून बाकीचे वरील सर्व साहित्य मिक्सर वर वाटू घ्या .

आता उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून काटे चमच्याने टोचून थोडी भोके पाडा. व नंतर  तांबूस तळून घ्या .

नंतर पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग , दालचीनी, वेलदोडे  टाका व त्यावर तयार पेस्ट घाला . तेल सुटेपर्यंत छान परता .

आता परतलेल्या  पेस्ट मध्ये गरजे पुरते पाणी घालावे. फार पातळ  नको . ग्रेवी दाट असावी . मीठ ,साखर घालून एक उकळी येऊ द्यावी .

शेवटी तळलेले बटाटे ग्रेवी मध्ये सोडावेत . परत एक उकळी येऊ द्यावी . दम आलू तयार .

 डिश मध्ये काढून वरून फ्रेश क्रीम व कोथिंबीर घालून ,गरमा-गरम फुलके किवा पराठया  सोबत खायला द्या .





25 April 2015

चाॅकलेट बाॅल (Chocolate Ball )

No comments :

 सुट्टी लागली म्हणले की मुले दिवसभर घरात असतात. त्यामुळे त्यांना ठराविक वेळी नुसते जेवण देऊन भागत नाही व ती नीटसे जेवत पण नाहीत.कारण सारे लक्ष खेळणे व मस्ती यातच असते. त्यामुळे सतत काही ना काही वरचे खायला लागते.मग सारखे वेगवेगळे काय द्यावे ?हा प्रश्नच असतो. मग अशावेळी झटपट होणारे व पौष्टीक असे 'चाॅकलेट बाॅल' ट्राय करा.
ही रेसिपी करण्यासाठी गॅस ची अजिबात गरज पडत नाही. कसे करायचे पहा-

साहीत्य :-

1) कोको पावडर 1/2 वाटी
2) मिल्क पावडर 1वाटी
3) पाच-सहा मारी बिस्कीट्स चा चूरा 4 टेस्पून
4) काजू,बदाम,अक्रोड ची भरड 2 टेस्पून
5) बटर 1 टीस्पून
6) गरम दूध गरजेनुसार (साधारण पाव कप लागेल)
7) डेसिकेटेड कोकोनट 2 टेस्पून

कृती :-

     प्रथम मारी बिस्कीट्स मिक्सर मधून चुरा करून घ्यावित.

आता एका बाऊल मधे तयार चुरा व कोको पावडर,मिल्क पाडर, ड्रायफ्रूट पावडर आणि बटर सर्व एकत्र करून हातानेच एकसारखे करावे.

नंतर एका वाटीत गरम दूध घेऊन अंदाज घेत घेत वरील मिश्रणात घालावे . कणिकेसारखा गोळा झाला की थांबावे.

तयार मिश्रणाचे टेनिस बाॅल च्या आकाराचे लहान-लहान गोळे करून डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत.

चाॅकलेट बाॅल तयार ! मुलांना पाच वाजताच्या दूधासोबत द्या. किवा नुसतेच द्या तरी चालते दूध ,बिस्कीटे ,ड्रायफ्रूट्स सर्वच पोटात जाते. आणि थोडा वेगळा प्रकार असल्याने व पट्कन हातात घेऊन पळण्यासारखा असल्याने लगेच पसंतीस उतरतो.व आपल्याला करणेसही सोपा !!


15 April 2015

केळाच्या पुर्‍या (Banana Puri)

No comments :
काही  वेळा गणपती ,नवरात्र असे काही सण उत्सवअसेल तर प्रसाद म्हणून आलेली ,किवा उपवास म्हणून आणलेली बरीच केळी जमा होतात.आणि ती काही लगेच संपत पण नाहीत. मऊ व काळी होतात.तर कोणीच  खायलापण तयार नसते.ती तशीच पङून वाया जाते. मग त्यांचे काय करावे ? असा प्रश्न पडतो. फेकून देणेही होत नाही व खाल्लेहीजात नाही . अशावेळी मग त्याच्या खाली सांगितल्याप्रमाणे पुर्या कराव्यात.खूप सुंदर लागतात. विश्वास बसत नसेल तर खाली संगीत्यल्याप्रमाणे करून बघा . एकदम सोप्या व झटपट होतात . 

साहित्य:-
1) पिकलेली दोन केळी
2) कणिक आवशक्यतेप्रमाणे अंदाजे २-३ वाट्या लागते
3) वेलचीपूङ
4) तेल तळणीसाठी
5) पिठीसाखर दोन टे.स्पून
कृति:-
     केळ एका बाऊलमधे घेऊन कुस्करावे .त्यामधे मावेल एवढीच कणिक घाला. साखर व वेलचीपूङ घाला .सर्व साहीत्य नीट एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा.पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवा.

नंतर तयार पिठाच्या लहान लहान पुर्या लाटून तेलात मंद आचेवर गुलाबी  तळाव्यात.  

 तयार  पुर्‍या साजूक तुपासोबत खाल्यास खूपच छान लागतात . तसेच या पुर्याना केळाचा छान स्वादपण येतो , त्यामूळे लहान मुलांना आवङतात. ङब्यामधे पण देण्यास सोयीच्या पङतात. आठ दिवसा पर्यंत टिकतात.त्यामुळे प्रवासात पण नेण्यास सोयीच्या !!

14 April 2015

मेतकूट ( Metakut )

No comments :
मेतकूट हा पदार्थ पारंपारिक मराठी पदार्थ आहे.  पानातील डाव्या बाजूचा तोंडीलावणेचा पदार्थ म्हणता येईल. मराठी ब्राम्हण समाजात जास्त केला जातो. साधारणपणे पावसाळ्याच्या आधि पावसाळी तयारी म्हणून लोणची , पापड, मसाले व मेतकूट हे पदार्थ करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात मस्त गरमा गरम मऊ गुरगूटा भात त्यावर साजूक तूप मेतकूट सोबत एखादी लिंबू लोणच्याची फोड अ.हा..ह..! अतिशय चविष्ट लागते.किवा नुकतेच अन्न खायला शिकणार्या लहान मुलाना द्यायला उत्कृष्ट प्रकार आहे.कसा करावा पहा.
साहीत्य :-
* हरभरा डाळ १ वाटी
* उडद डाळ अर्धी वाटी
* तांदुळ पाव वाटी
* मेथी १/४ टीस्पून (ऐच्छिक) 
* मोहरी १ टीस्पून
* धणे २ टीस्पून
* जीरे २ टीस्पून
* लवंगा ४ नग
* दालचिनी एक इंच
* काळी मिरी २-३
* लहान वेलची ३-४
* मोठी वेलची १-२
* सुंठ एक इंच
* हळद व लाल मिरची पावडर एक टीस्पून ऐच्छिक
* हींग १० ग्रॅम

कृती :-
प्रथम मंद आचेवर डाळी,तांदुळ तांबूस गुलाबी कोरडेच भाजून घ्यावे.

नंतर मेथी,धणे व जीरे खमंग भाजून घ्यावे. मोहरी साधारण गरम करावी. बाकीच्या वस्तू लवंग मीरे,वेलदोडे इ.सर्व कच्चेच ठेवले तरी चालते .फक्त दळण्यासाठी कडक असावेत म्हणून गरम करावे. 

आता आधी डाळी,तांदुळ मिक्सरवर बारिक करा.चाळून घ्या.

नंतर मसाल्याचे सर्व पदार्थ एकत्र करून  बारिक करावेत व नीट चाळून घ्यावेत.

आता सर्व  कुटलेले मसाले,हळद ,हींग व मिरची पूड व वरील कुटलेल्या डाळी सर्व एकत्र मिसळावे. नीट हलवून २-३ वेळा चाळावे.

मेतकूट तयार ! तयार म कोरड्या व हवाबंद बरणीत भरून ठेवा.भरतान त्यात हींगाचा एक खडा मधे पुरून ठेवा.हींगाचा छान वास लागतो.

असे तयार मेतकूट गरमा-गरम गुरगूट्या भाता सोबत तर खाता येतेच पण दह्यात कालवून पण चटणी सारखे वाढता येते. तसेच भडंगात ,पोह्यात , डोश्यावर पसरून,भाजक्या ब्रेडला तूप लावून त्यावर पण पसरवता येते.नुसत्या चिरमूरे व लाह्याना पण तूप मेतकूट लावून खाल्ले तर छान लागते.

मराठवाड्याकडे एक ' येसर मेतकूट' पदार्थ केला जातो.त्यात पण या मेतकूटासारखेच सर्व पदार्थ असतात. पण त्यात अजून ज्वारी बाजरी ,तमालपत्र सुके खोबरे असे अजून काही मसाले पदार्थ असतात व तयार असलेले हे येसर ऐनवेळी चमचाभर  घेऊन ,पाण्यात कालवून फोडणीला टाकून त्याची आमटी केली जाते.

टीप- असे अगदी कमी प्रमाणात करायचे असेल तर एखादेवेळी डाळी, तांदूळ नाही धुतले तरी चालते. परंतु जास्त प्रमाणात करायचे असेल तर डाळ,तांदुळ जरूर धुवून, पंख्याखाली सुकवून नंतर भाजाव्यात. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

09 April 2015

कैरीची लाल चटणी ( Red Chutney)

No comments :
आता बाजारात भरपूर प्रमाणात कच्या कैर्या येतात.ज्या मोसमात जी फळे व भाज्या येतात ती भरपूर प्रमाणात त्याचे विविध प्रकार बनवून खावित.कधीही बाधत नाहीत.आरोग्याला चांगलेच असते.कैरीचे खूप पदार्थ बनतात.जसे की पन्हं,लोणच,सरबत,मुरांबा,हिरवी चटणी इ.अशी खूप यादी वाढत जाईल. तर मी आज कैरीची लाल चटणी सांगते.
साहीत्य :-
* कैरी एक मध्यम आकाराची
* तेवढाच एक कांदा
* दाण्याचे कुट दोन टेस्पून
* गुळ लिंबा एवढा -कैरीच्या आंबटपणा नुसार कमी-अधिक करावा
* लाल मिरची पूड आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* तेल,हींग,मोहरी,हळद फोडणीसाठी

कृती :-
सर्वात आधि कैरी साल काढून किसून घ्या.कांदा सोलून मोठा-मोठा चिरून घ्या.

आता कांदा,कैरी,गुळ,तिखट,मीठ व दाण्याचे कुट एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या.

वाटलेला गोळा एका बाउलमध्ये काढा.फोडणी करून घ्या.थोडी थंड होऊ द्या.

आता थंड फोडणी चटणीवर घाला व नीट एकत्र करावी.चटणी तयार!

ही चटणी निरनिराळे पराठे,थालीपिठ,ब्रेडला लावून अथवा जेवणात भाकरी,पोळी बरोबर सुध्दा छान लागते. डब्यात द्यायला किवा प्रवासात सुध्दा सोईची आहे.चार-पाच दिवस फ्रिज शिवाय टिकते.

ही माझी रेसिपी २ मे २०१५ महाराष्ट्र टाइम्स, च्या,"चख दे " या  सदरा खाली प्रसिद्ध झाली होती.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

07 April 2015

क्रिस्पी मसाला भेडी ( Crispy Masala Bhindi)

No comments :
भेंडी ही सर्वपरिचित भाजी आहे. बहुतांशी लोकांना आवडते.भेंडी मधे अनेक औषधी मूल्ये आहेत.आंतड्यातील दोष, मुत्रमार्गाच्या तक्रारी,जळजळ,सर्दी यावर उपयोगी आहे.तसेच भेंडी कामोत्तेजकही आहे. भेंडीची बर्याच वेगवेगळ्या प्रकारानी भाजी केली जाते.भेंडीच्या जून दाण्याची कढी/आमटी केले जाते. आज आपण क्रिस्पी भेंडी बनवणार आहोत.
साहीत्य :-
* भेंडी पाव किलो
* काॅर्नफ्लोर, चनाडाळ पिठ व तांदुळ पिठ प्रत्येकी 2 टेस्पून
* तिखट,मीठ चवीनुसार
* चिमूटभर आमचूर पावडर
* जीरा पावडर अर्धा टीस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी.नंतर शेंडा बुडखा काढून ती उभ्या चार भागात कापून घ्यावी.

आता कापलेल्या भेंडीवर पीठ सोडून वर दिलेला सर्व मसाला घालून चोळून दहा मि.तसेच ठेवून द्यावे.

आता भेंडीला पाणी सुटले असेल. त्यात राहीलेली पिठे घालून हाताने अलगद अलगद हलवा.भेंडी सर्व पिठे चिकटतील.गरज वाटली तर पाण्याचा हात घ्यावा. व भेंडी फारच पाणी सुटले असेल तर आवडीचे कोणतेही पीठ अजून घालावे.
आता सर्व मसाला व पिठ चिकलेली भेंडी गरम तेलात मंद आचेवर तळा. 

तळून टीश्यू पेपरवर काढा.गार झाली की छान कुरकरीत लागते. स्टार्टर म्हणून ,साईड डिश म्हणून अथवा संध्याळचे वेळी खायला चालते.बटाटा फिंगर चिप्स ऐवजी मुलाना असे हेल्दी चिप्स म्हणून पण आपण देऊ शकतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.