'सांजोरी' यालाच सारनोरी, साठोरी असेही म्हणतात.हा पारंपारिक व पौष्टीक पदार्थ आहे. गणेश चतुर्थी मधे गणपतीच्या,महालक्ष्मीच्या नैवेद्याला, दिवाळीच्या लक्ष्मीपुजना दिवशी नैवेद्याला केला जातो.तसेच मुलांना मधल्या वेळचे खाणे, शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात न्यायला सोयीचा प्रकार आहे.तीन-चार दिवस सहज टिकतो.घरात नेहमी उपलब्ध असणार्या साहित्यात होतो.साहित्य व कृती 👇
साहित्य :-
वरील पारीसाठी
* बारीक रवा १ कप
* मैदा २ टेस्पून
* तेल २ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* चिमुटभर साखर
* पाणी गरजेनुसार
आतील सारणासाठी
* बारीक रवा १/२ कप
* पीठीसाखर १/२ कप
* तूप २ टेस्पून
* मिल्क पावडर १/४ कप ( ऐच्छीक)
* खसखस १ टीस्पून
* वेलची पूड
* पाणी गरजेनुसार
* तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम रवा,मैदा मीठ,साखर घालून एकत्र करून घ्यावे. नंतर तेल गरम करून त्यामधे घालून हाताने चोळून घ्यावे.आता गरजे इतकेच थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळावे.जास्त सैल नको व अती घट्टही नको.मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे.
आता सारण तयार करावे. पँनमधे घेतलेल्या एकूण तूपामधले १ टेस्पून तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.भाजून ताटलीत काढून त्यावर थोडे पाणी शिंपडावे व पांच मिनिट झाकावे. पांच मिनिटानंतर कोमट असतानाच पीठीसाखर,वेलची पूड घालून सारण हाताने एकजीव करावे. आत्ताच सारणात शिल्लक १ चमचा तूप व मिल्क पावडरही घालून मळावे.सारण फार कोरडे वाटले तर किंचित पाण्याचा हात घेऊन मळावे.मिश्रणाचे मुठीत दाबले तर लाडू व्हावेत इतपत ओलसर असावे. आता सारणाचेे हलक्या हाताने साधारण लाडू करून घ्यावे. दाबून फार घट्ट लाडू करू नये.
नंतर आधीच मुरून तयार असलेले पीठ परत एकदा मळून घ्यावे अथवा कुटून घ्यावे. मिक्सर मध्ये थोडे-थोडे घेऊन फिरवून काढावे. या पीठाच्या थोड्या लहान आकाराच्या म्हणजे सारणाचेे लाडू केलेत त्या आकाराचे समान गोळे करून घ्यावेत व एकेक गोळी घेऊन त्यामधे सारणाचा लाडू भरून व्यवस्थित बंद करावे. हलक्या हाताने फार पातळ नाही अशी किंचित जाडसर मोठी पुरी लाटावी व अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावी.तळताना सारखी उलटवू नये.अलगद तळावी,जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्यावी.
थंड झाल्यावर अतिशय खुसखूषीत खमंग अशी सांजोरी खायला उत्तम लागते. बाजारी पदार्थ आणण्यापेक्षा घरीच असा एखादा सहज सोपा पौष्टीक पदार्थ मुलांना खायला करून ठेवावा.
वर दिलेल्या साहित्या मधे फोटोतल्या आकाराच्या ८ साठोऱ्या होतात.
टिप्स :-
* सारण तयार करताना किंवा पारीसाठी कणिक मळताना पाण्याचाच वापर करावा,दूध नको. दूधामुळे नंतर वास येण्याची शक्यता असते.
* सारणामधे भाजलेला खवा अथवा शिल्लक पेढा घातला तरी चालते.
* सांजोरी तूपावर शॅलोफ्राय केली तरी चालते. तसेच आधी तव्यावर थोडी भाजून नंतर तेलात तळल्यास तेल कमी लागते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.