09 January 2015

उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म

No comments :

उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म"
----------------------------
    असे म्हणतात कि ''माणूस जसा खातो, तसा बनतो". काही अंशी हे खरेही आहे कारण आपला मूड, स्वभाव हे आपल्या खाण्यावरही अवलंबून असतात. लहान मुलांवर आपण संस्कार करतो त्यामध्ये खाण्याचा किंवा जेवणाचा संस्कार महत्त्वाचा.

भारतात बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर काहीजण उष्टावणाचा संस्कार करतात. लहानपणी लागलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी माणसाला आयुष्यभर साथ देतात आणि त्याला घडवतात. लहानपणापासून कौतूकाने पोळीशी फक्त जॅम किंवा साखरआंबा भरवणारी आई अचानक दहाव्या वर्षी मुलाला गवारीच्या शेंगांची भाजी खाल्लीच पाहिजे अशी सक्ती करते, तेंव्हा मुलगा तिचे ऐकण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. काही घरांमधून वडीलधा-यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपण्याच्या नादापायी अवास्तव सवयींना पाळल्या जातात. मुले मोठी होऊन ह्याच संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.

त्यामुळे लहानपणी मुलांना खाण्यापिण्याच्या सवयी लावण्यासाठी आईवडीलांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एखाद्या पदार्थाची गोडी लागण्यासाठी त्यांना कदाचित अनेकवेळा प्रयत्न करावे लागतील.
भाज्या व फळांची आवड निर्माण होण्यासाठी आवडत्या पदार्थात त्या एकत्र करणे, आकर्षकरित्या मांडणे, गोड बोलून भरवणे, खेळाडू किंवा आवडत्या व्यक्तीचा आदर्श समोर ठेवणे वगैरे विविध युकत्यांनी मुलांना सवयी लावता येतील. लहानपणापासून आपले मुल जंक फूड, तळकट, अतिगोड, डबाबंद पदार्थ किंवा शीतपेयांपासून दूर राहील ह्याची दक्षता आईवडीलांनी घ्यायला हवी.

आजचे भोवतालचे वातावरण असे आहे की त्यावर पूर्ण निर्बंध असणे अवघड आहे, परंतु त्यातल्या त्यात त्यांचे सेवन व आकर्षण कमी करण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहीजे. ह्या विषयीचा मार्गदर्शक लेख आपल्याला www.ayushveda.com/magazine/children-eating-habits/ येथे वाचायला मिळतो.

बीबीसीच्या सर्व्हेनुसार आताच्या पिढीच्या मुलांचा आहार १९५० सालच्या मुलांच्या तुलनेत अतिशय निकृष्ट आहे. गेल्या शतकातली मुले संध्याकाळभर खेळायची, शारिरीक व्यायाम करायची आणि आल्यावर घरचे ताजे चौरस जेवण करुन शांत झोपायची. अभ्यास आणि स्पर्धेचे ताणही कमी होते, त्यामुळे त्यांचे जीवन अधिक आरोग्यपूर्ण आहे ह्यात शंका नाही.

हिंदीत म्हण आहे ''देर आये दुरुस्त आये". आहारच्या चांगल्या सवयीचे कुठल्याही वयोगटात स्वागतच आहे. पुढील सवयी सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. सकाळी प्रत्येकाने न्याहारी घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. उशीर झाला म्हणून, सवय नाही म्हणून किंवा कितीवेळा ( विशेषता स्त्रियांना ) खायचे ह्या संकोचापायी सकाळी काहीही खाल्ले जात नाही. न्याहारीला इंग्रजीत Breakfast हा योग्य शब्द आहे. रात्रभर घडलेला उपास (fast) सोडणे (Break) अतिशय आवश्यक आहे. रात्रभर शरीराने वापरलेले ग्लुकोज आणि उर्जा भरुन काढणे गरजेचे आहे. न्याहारी केल्याने जेवणापर्यंत काम करण्याची आपली कार्यक्षमता टिकून राहते. तसेच थकवा, डोके दुखणे, झोप येणे टाळता येते. न्याहारी करुन आलेल्या मुलांना गणित आणि वाचनात अधिक गती येते असे सिध्द झाले आहे. वर्गात त्यांची चलबिचल कमी होते, लक्ष लागते, स्मरणशक्तीही चांगली राहते.

आपले रोजचे खाणे हे अधिक पौष्टीक आणि आरोग्यवर्धक असावे ही काळजी प्रत्येकाने घ्यायचीच आहे. त्याच बरोबर पुढील बाबींची काळजी घेणेही अत्यावश्यक आहे. शालेय जीवनात शिकलेल्या 'फूड पिरॅमीड' चा वापर व्हावा. त्यानुसार चरबीयुक्त पदार्थांचे सेवन ३०% पेक्षा जास्त नसावे. आहारात तंतूमय पदार्थांचा वापर वाढवावा. त्यासाठी तृणधान्ये, भाज्या व फळांचा आहारात समावेश असावा. आहारात मीठ, मैदा आणि साखर ह्या तीन पांढ-या घातक पदार्थांचा उपयोग कमीत कमी असावा.शुध्द आणि स्वच्छ पाणी दिवसातून ५-६ ग्लास गरजेनुसार पिण्यात यावे. 'ऍरीयेटेड ड्रींक्स', हवाबंद जंक फूड, केक, कॅन्डीज, पांढरा ब्रेड ह्या सगळ्यांना सरबत, घरी केलेला खाऊ, ब्राऊन ब्रेड असे पर्याय शोधण्यात यावे. मधल्या वेळेचे खाणेही पौष्टीक असावे.

बहुतेक वेळा आहाराच्या चांगल्या सवयी मोठी माणसे किंवा लहान मुले पटकन लावून घेतात. खरी समस्या असते ती तरुणांची. पौगंडावस्था ही खरतर वाढीची अवस्था परंतु निरिक्षणातून सिध्द झाले आहे ह्या वयात आवश्यक ती उर्जा आणि पोषणमुल्ये चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे ६०% मुलांना मिळत नाही. त्यामध्ये व्हीटॅमीन ए, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसीड तसेच तंतूमय पदार्थांची कमतरता जास्त असते. मुलींमध्ये लोह आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पुढील आयुष्यात त्यांना ऑस्टिओपोरोसीस सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या तरुण मुलांची आवड, त्यांच्या खाण्याच्या वेळा ह्या बाबी जमेस धरुन मुले पोषक आहार कसा घेतील ह्याकडे पालकांचे विशेष लक्ष असावे. न्याहारी आणि जेवणाच्या वेळा चुकवणे, बाहेरचे जंकफूड खाणे, सतत तोंडात काही ना काहीतरी टाकत रहाणे ह्यामुळे तरुणांच्या खाण्यावर परिणाम होतो. शैक्षणिक जबाबदा-या, सोय, वेळ किंवा कामाच्या वेळा ह्या अनेक कारणांसाठी तरुण मुले सकाळची न्याहारी घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चयापचयाच्या क्रिया मंदावतात व कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच चुकीच्या वेळेला जास्त खाल्ले गेल्यामुळे वजनही वाढते. ह्यासाठी त्यांना सकाळी पटकन खाता येण्यासारखे पदार्थ तयार ठेवावेत. तरुण मुलांना सतत तोंडात काहीतरी टाकण्याची सवय असते. त्याचा परिणाम त्यांच्या मुख्य जेवणावर होत असतो. ह्यासाठी तरुणांनी मधल्या वेळचे किंवा तोंडात टाकायचे पदार्थही पौष्टीक असावे, ह्यासाठी पालकांनी दक्ष राहीले पाहिजे.

फास्ट फूडचा सर्वात मोठा ग्राहक आजचा तरुण वर्ग आहे. सोय, चटकदार, फॅशन आणि 'पीअर ग्रुप प्रेशर' मुळे फास्ट फूड खाल्ले जाते. त्यामधून फक्त फॅटस आणि रिकाम्या कॅलरीज मिळतात. ह्याबद्दल पालकांनी आपल्या मुलांना जास्तीजास्त जागरुक केले पाहिजे. त्यांना आरोग्यपूर्ण पदार्थ आणि मिळणा-या ठिकाणांचीही माहिती दिली पाहिजे. जेणेकरुन निवडीचे अधिक पर्याय त्यांना उपलब्ध होतील. हल्ली तरुणांमध्ये 'झिरो साईजचे' फॅड आहे. मॉडेल्स प्रमाणे बारीक होण्यासाठी न जेवणे, डायटींग पिल्स घेणे, उपास करणे, रेचक घेणे, उलटया काढणे ह्या सारखे प्रकार केले जातात. घरच्यांनी वजनाबाबत चर्चा न करता मुलांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वावर भर दिला पाहिजे. डायटींग पेक्षा नियमित व्यायाम आणि योग्य आहारावर अधिक भर दिला पाहिजे.
www.womenshealthcaretopics.com/teen_eating_habits.htm ह्या लिंकवर ही माहिती उपलब्ध आहे.

भारतात प्रत्येक जाती आणि धर्माच्या जेवणाखाण्याच्या विशिष्ट सवयी आणि पध्दती आहेत. प्रत्येकाची जेवायला बसायची पध्दत तसेच पदार्थ वाढण्याच्या पध्दतीत फरक असतो. ग्लोबलायझेशनच्या ह्या जमान्यात शहरांमधून हा फरक फारसा राहिलेला नाही. परंतु आजही खेडयांमधून किंवा सणांच्या दिवशी प्रत्येक जातीची खाद्य परंपरा जपली जाते. कोकणात केळयाचे पान जेवतांना उभे ठेवून प्रथम मीठ वाढून डावी-उजवी बाजू वाढली जाते त्याउलट केरळमधे केळ्याचे पान आडवे करुन मध्यभागी भात वाढून बाजूनी भाज्या व लोणची वाढली जातात. प्रत्येकाची पध्दत वेगळी असली तरी पोषक आहारा बरोबर प्रत्येकाने 'टेबल मॅनर्स' पाळणे अतिशय महत्त्वाचे. जेवतांना हळू बोलणे, आवाज न करता चावून खाणे, भांडयांचा आवाज न करणे इत्यादी गोष्टी भारतीय जेवणांत पाळल्या जातात.

भारताप्रमाणेच चीनमध्येही टेबल मॅनर्सला अतिशय महत्त्व आहे. चीनी माणूस आपले प्रेम आणि आतिथ्य आपल्या जेवणातून व्यक्त करत असतो. तेथे कमीतकमी दोन जेवणे कुटूंबाने एकत्र घेण्याची पध्दत आहे. जेवणामध्ये भाज्या आणि बाजूचे पदार्थ टेबलाच्या मध्यभागी ठेवल्या जातात. प्रत्येकासमोर भाताचे वाडगे, चॉपस्टीक्स, रिकामा बाऊल आणि चमचे ठेवलेले असतात. यजमानाने 'सिग फान' (करा सुरुवात) असे म्हटले की प्रत्येकाने आपल्याला हव्या त्या भाज्या आणि पदार्थ चॉपस्टीक्सच्या सहाय्याने भातावर वाढून घ्यायचे. पाणी किंवा मिठाई रोजच्या जेवणात दिल्या जात नाही. जेवणात गरम चहा किंवा पेय दिले जाते. जेवण संपल्यावर प्रत्येकाने आपल्या चॉपस्टीक्स आडव्या ठेवायच्या. चीनमध्ये, माणूस दिवंगत झाल्यावर त्याला स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून भातामध्ये चॉपस्टीक्स उभ्या ठेवल्या जातात. त्यामुळे रोजचे जेवण झाल्यावर चॉपस्टीक्स उभ्या ठेवणे शिष्टाचाराचे नाही. चहा घेतांना चहाच्या किटलीचे तोंड कुणाकडेही तोंड करुन ठेवणे शिष्टाचार समजला जात नाही. कुणाच्या घरी जेवायला गेल्यावर चॉपस्टीक्स आपल्या बाऊलवर आपटायच्या नाहीत. भिकारी किंवा हॉटेलमध्ये जेवण उशीरा येत असल्यास असे करतात.

आहाराकडे फक्त सवयीने करण्याची गोष्ट न बघता यज्ञ कर्म म्हणून बघावे. त्यामुळे आपल्याला बल, ओज आणि स्वस्थतेची प्राप्ती होईल.
महाराष्ट्रीयन ब्राम्हणी भोजनाचे पूर्ण पान !

No comments :

Post a Comment