सण म्हटले की गोड पक्वान्न आलेच.त्यातही काही विशिष्ट सणाना विशिष्ठ असेच गोड पदार्थ बनविण्याची प्रथा असते.जसे की होळी म्हणले की पुरणपोळी,गणपती आले की मोदक आलेच.तसेच संक्रांत म्हणले की गुळपोळी करतात.काहीवेळा कुटूंबाच्या आवडीनुसार बदलही होतो.पण त्यातही खास करून दक्षिण महाराष्ट्रा मधे गुळाच्या पोळ्याच आवर्जून केल्या जातात.त्या कशा केल्या जातात ते पहा.
साहीत्य :-
आतल्या सारणासाठी
1) किसलेला गुळ 2 दोन वाट्या
2) भाजलेल्या दाण्याचे कूट अर्धी वाटी
3) भाजलेल्या तिळाचे कूट पाव वाटी
4) भाजलेली खसखस 2 tsp
5) वेलची पावडर 1 tsp
6) तेल दोन tsp
7) बेसन पिठ 2tsp ऐच्छीक
वरील पोळीसाठी
1) गव्हाचे पिठ 3 वाट्या
2) तांदुळाचे पिठ अर्धी वाटी
3) डाळीचे पिठ अर्धी वाटी
4) तेल मोहना साठी 4 tsp
5) मिठ चवीसाठी चिमूटभर
कृती :-
प्रथम गुळ किसून अगदी मऊ करून घ्यावा.तसेच शेंगदाण्याचे व तिळाचे कूट पण अगदी तेल निघेपर्यंत वाटावे.हाताला अजिबात कणी लागता कामा नये.वेलची पूड,खसखस मऊ पूड करून घ्यावी.
आता किसलेल्या गुळामधे सर्व घालून दोन चमचे तेल घालून सर्व चांगले मळून घ्यावे.(बेसन पिठ घालायचे असेल तर आत्ताच लाडू प्रमाणे भाजून मिसळावे)
हा तयार गुळ बरेच दिवस टिकतो.त्यामुळे आदले दिवशी करून ठेवला तरी चालतो .
सकाळी घाई होत नाही.
गव्हाचे,तांदळाचे व डाळीचे पिठ एकत्र करून त्यामधे मिठ व गरम तेल घालून कणिक घट्ट मळून घ्यावी.एक तास आधि भिजवून ठेवावी.
आता पोळ्या लाटताना कणिक व गुळ सारख्या प्रमाणात मऊ आहे का तपासावे.गुळ घट्ट असेल तर पाण्याचा हात लावून कणिके सारखा करावा.
नंतर कणिकेच्या दोन गोळ्या व गुळाची एक गोळी चपटी करून घ्यावी.कणिकेच्या मधे गुळाची ठेवून हाताने अलगद दाबावे व कडेने नीट बंद करावे.
आता हा चपटा गोळा तांदुळाच्या पिठी वर ठेवून दोन-तिन वेळा उलटून लाटावा.पातळ पोळी लाटून घ्यावी.मध्यम आचेवर खरपूस भाजावी.भाजल्यावर लगेच घडी दुमडून ठेवावी.
ह्या पोळ्या गारच खायच्या असतात.थंड झाल्या की खुसखूषीत होतात.गरम खाल्या तर तोंडाला गुळाचा चटका बसण्याचा संभव असतो आणि मऊ पण लागतात.
आता मस्त कणिदार असे घरचे भरपूर तूप घ्यावे व पोळ्या खाव्यात.
टीप :- कणिक व गुळ सारख्या प्रमाणात घट्ट असावे म्हणजे गुळ सगळीकडे व्यवस्थित पसरतो.
No comments :
Post a Comment