09 November 2014

डोसा (Dosa)

No comments :
डोसा हा पदार्थ दक्षिणेकडचा आहे. तिथल्या लोकांच्या रोजच जेवणात असतो. पण तो मऊ असतो. सहाजिकच आहे आपल्या चपातीऐवजी असतो. मग फार कडक व कुरकुरीत जास्त खाता येणार नाही. पण आपण इतर प्रांतातील मंडळी कधीतरी नाष्ट्यामधे खातो .त्यामुळे मी कुरकूरीत केलाय. कसा ते साहित्य व कृती पुढे वाचा. 
साहित्य :-
* मोठा तांदुळ २ वाट्या
* उडीद डाळ १ वाटी
* तुरटी(Alum)खडा चिंचोक्याएवढा
* मेथी दाणे एक टीस्पून

कृती:-
प्रथम तांदुळ व डाळ स्वच्छ निवडुन,धुवून घ्यावेत व पाच ते सहा तास पुरेशा पाण्यात भिजत घालावेत.

भिजल्यानंतर पाणी काढून टाकावे व सर्व जिन्नस मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावेत.
नंतर सर्व नीट एकत्र मिसळून हलवावे व आंबण्यासाठी पाच ते सहा तास झाकून ठेवावे.

पीठ आंबल्यावर चांगले फुलून वर येते.अशा पीठाचे डोसे अत्यंत हलके व कुरकूरीत होतात. आता या फुललेल्या पीठाला डावाने नीट हलवावे व निम्मे पीठ फ्रीजमधे ठेवावे म्हणजे लागेल तसे घेता येते.आता राहीलेल्या पीठामधे चवीनुसार मीठ व चमचाभर तेल  घालावे व गरजेनुसार थोडे पाणी घालून सारखे करावे व तव्यावर डोसे काढावेत. पाणी फक्त पीठ तव्यावर ओतता यावे इतपतच घालावे. दाट असावे.  

आवडीनुसार वर बटर लावावे अथवा नाही लावले तरी चालते.चटणी व बटाटा भाजी बरोबर सर्व्ह करावे.

टीप्स :- 
*पीठ फार पातळ अथवा घट्ट ठेऊ नये.म्हणजे वाटीने व्यवस्थित तव्यावर पसरता येते.

*तुरटीमूळे डोसे जास्त क्रिस्पी होतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment