उन्हाळा म्हटले की वाळवणाचे अनेक पदार्थ तांदुळ, गहू, ज्वारी, नाचणी अशा घान्यापासून केले जातात. पापड, कुरडया,सांडगे इत्यादी. अशापैकीच एक "फुलाचे सांडगे " हा एक पारंपरिक व तांदुळापासून बनणारा उन्हाळी वाळवणाचा एक सोपा प्रकार आहे. कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तांदुळाची पीठी (3 दिवस तांदुळ भिजत घालून केलेली) २ वाट्या
* पाणी 2+ 2 वाट्या
* मीठ चवीनुसार ( अंदाजे १ टीस्पून)
* जीरे १ टीस्पून
कृती :-
प्रथम तांदुळाची पीठी २ वाट्या पाणी घालून भजीच्या पीठाप्रमाणे कालवून घ्यावी.
नंतर २ वाट्या पाणी गँसवर गरम करण्यास ठेवावे. पाण्यात मीठ व जीरे घालावेत.
आता पाणी उकळायला लागले की, एका हाताने पीठाची धार गरम पाण्यात धरावी व दुसर्या हाताने रवीचा दांडा पाण्यात फिरवत रहावे की जेणेकरून गुठळी होऊ नये.
पीठ लगेच दोन मिनीटांत घट्ट होईल. गँस बंद करावा. झाकणी ठेऊ नये. ही उक्कड कच्चीच राहीली पाहीजे.
आता पीठ गरम-गरम असतानाच लहान थाळीत पीठ घ्यावे व मोदकाच्या आकाराचे लिंबाएवढे गोळे वर टोक काढून, हातानेच तेल लावलेल्या ताटात घालावेत. उन्हात २ -३ दिवस वाळवावेत.
वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.केव्हाही वाटेल तेव्हा तळून खावेत. सांडगे उन्हात ठेवले की, उकड कच्ची असल्याने तडकतात व तळले की फुलासारखा आकार येतो म्हणून "फुलाचे सांडगे "!
अतिशय कुरकुरीत व खमंग असे "फुलाचे सांडगे" चविला छान लागतात. चहासोबत किवा जेवणात घेतले तरी चालतात.
टिप्स -
* पीठ शिजताना आवडीनुसार हिरवी मिरची पेस्ट किंवा लालमिर्ची पावडर, ओवा अथवा कांदा बारीक चिरून घातला तरी चालते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.