26 December 2018

मोरावळा (Amla Murabba)

No comments :

मोठा आवळा! यालाच डोंगरी आवळा असेही म्हणतात.औषधी व अतिशय गुणकारी असा हा आवळा,दिवाळी नंतर साधारण तुळशीच्या लग्नापासून बाजारात यायला लागतो. ते डिसेंबर पर्यंत असतो.डिसेंबर मधे एकदम परिपक्व म्हणजे वर्षाचे लोणचे,सुपारी,मोरावळा करण्यास योग्य असे आवळे असतात. आयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.आवळ्यामधे लोह व विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.कोणत्याही रुपात आवळा खाल्ला तर तो आरोग्यदायी आहे.परंतु वर्षभर मिळत नसल्याने वेगवेगळ्या स्वरूपात साठविला जातो.आवळा खाल्याने दृष्टि तेज होते. पित्त, कफ कमी होते. त्वचेला चमक येते व त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच ह्रदयासाठी पण आवळा उत्तम आहे. रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो. आवळ्यापासून बरेच पदार्थ करून वर्षभरासाठी साठविले जातात. जसे की, सुपारी,आवळा कँडी, लोणचे, सरबत, मुरांबा. केस काळेभोर रहाण्यासाठी केसांनाही लावण्यासाठी आवळा सुकवून पावडर करून ठेवली जाते. अशा बहूगुणी आवळ्याचा 'मुरंबा' म्हणजेच 'मोरावळा' कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* आवळे १/२ किलो
* साखर १/२ किलो
* वेलचीपूड ऐच्छीक
* सुंठ पावडर ऐच्छीक
* सैंधव मीठ चिमूटभर

कृती :-
मोरावळ्यासाठी आवळे घेताना साधारण तांबूस छटा असलेले, न डागाळलेले चांगले कडक व ताजे आवळे निवडून, वेचून घ्यावेत. असे आवळे चांगले रसाळ व आंबट -तुरट चवीचे असतात.

प्रथम बाजारातून आणलेले निवडक आवळे स्वच्छ धुवून, बुडतील इतके पाणी घालून एक रात्र पाण्यात भिजत ठेवावेत.

नंतर दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करावेत व काटे चमच्याने सर्व बाजूला *आतपर्यंत टोचून भोके पाडावीत.

आता टोचलेले आवळे गरम पाण्यात घालून पाच मिनीट उकळून द्यावे. आवळे पांढरट दिसू लागतात.*आता पाण्यातून निथळून काढावेत व गरम असतानाच साखर मिसळून घ्यावी.*एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी साखर विरघळून पाणी सुटलेले असेल तर आता मंद गँसवर पातेले ठेवावे.(वेगळे पाणी घालू नये) सतत ढवळत रहावे. साखरेचा पाक होईल व आवळे पारदर्शक दिसू लागतील तर आताच वेलची पूड, मीठ घालावे व गँस बंद करावा. साधारणपणे अर्धा तास तरी लागतो. पाक मधासारखा असावा. अति घट्ट किंवा पातळ नको.

गार झाल्यावर मोरावळा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. तीन- चार दिवसांनंतर मोरावळा खाण्यायोग्य आंबट -गोड - तुरट चवीचा होतो. पाक आतपर्यंत मुरला जातो. हा मोरावळा फ्रिजशिवाय बर्षभर टिकतो.

असा मुरलेला एक आवळा रोज सकाळी अनशापोटी खाल्ला व वरून कोमट पाणी प्याले तर अतिशय आरोग्यदायी असते. ज्यांना पित्त किंवा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो त्यानी आवर्जून हा उपाय करावा.

टिप्स :
* जर वेळ नसेल तर साखर मिसळून एक रात्र न ठेवता, साखरेचा दोनतारी पाक करून त्यामधे उकडलेले आवळे घालावे. परंतु या पध्दतीत पाण्याचा वापर असल्याने मोरावळा जास्त कालावधीपर्यत टिकण्यात साशंकता निर्माण होते.
* आवळे आतपर्यंत नीट टोचून घ्यावेत.पाक चांगला मुरतो.
* आवळे उकडलेले पाणी टाकून न देता, त्यात मीठ, साखर घालून सरबत करून प्यावे. अथवा आमटी, भाजी, पराठे करताना वापरावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

18 November 2018

मसाला सुपारी (मुखवास)( Masala Supari)

No comments :

सहसा चहा किंवा जेवण झाले की मुखशुध्दी म्हणून बडीशेप किंवा सुपारी खाल्ली जाते. परंतु बर्याचवेळा बडीशेप खाल्ली की दातामधे धागे अडकण्याची समस्या येते. तर बडीशेपेची अशी सुपारी करून ठेवली तर तोंडात टाकायला बरी पडते.कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बडीशेप २०० ग्रँम
* हिरवी वेलची १० नग
* लवंगा ८ -१० नग
* दालचिनी ४ काड्या
* खडीसाखर ५ ग्रँम ( ऐच्छिक)
* मीठ चिमूटभर
* काश्मिरी सुगंध पानमसाला पावडर अर्धा टीस्पून

कृती :-
प्रथम बडीशेप स्वच्छ करून कढईत गरम करून घ्यावी. 

बडीशेप थंड झाल्यावर त्यामधे लवंगा, वेलची दालचिनी, मीठ, साखर सर्व मिसळून एकत्र मिक्सरमधे पावडर करावी.

तयार पावडर हवाबंद बाटलीमधे भरून ठेवावी.

मुखशुध्दीसाठी, सहज सोपी अशी ही मसाला सुपारी तुम्हीही करून बघा.घरातील सर्व वयोगटातील सदस्याना खाता येते व आवडेलही.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

02 November 2018

शेव (Shev)

No comments :

दिवाळीचा फराळ म्हटले की, चिवड्याच्या जोडीला शेव पाहीजेच.शेवेचे बरेच प्रकार बनविले जातात. बारीक, मोठी, पालक शेव, लसूण शेव..  पण मला सहसा मसाला शेवेचा प्रकार आवडतो. कशी करायची साहित्य व कृती-

साहित्य :-
* डाळीचे पीठ १/२ किलो
* तेल ५० मिली.
* पाणी ५० मिली.
* मीठ २ टीस्पून
* लाल मिरचीपूड ४-५ टीस्पून
* हिंग २ टीस्पून
* ओवा १ टीस्पून
* जीरे १ टीस्पून
* हळद १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम बेसनपीठ चाळून घ्यावे. म्हणजे त्यामधे गुठळ्या रहात नाहीत. नंतर ओवा व जिर्याची बारीक पावडर करून घ्यावी.

आता एका बाऊलमधे तेल व पाणी एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये वरील साहित्यात दिलेला मसाला घालावा व हेड ब्लेंङरने सर्व चांगले फेटावे.असे फेटल्यामुळे मसाला नीट विरघळतो व फेटल्यामुळे शेव हलकी खुसखूषीत होते.सोडा वापरण्याची गरज रहात नाही.

आता फेटलेल्या मिश्रणात डाळीचे पीठ घालावे व गरजेनुसार पाणी घालून मळावे. साधारण 200 मिली. पाणी लागते. पीठ फार सैल किंवा घट्ट नको. पीठ अति घट्ट ठेवल्यास घालायला त्रास होतो व शेव कडक होते.तसेच पीठ सैल ठेवल्यास शेवेची प्लेन काडी न येता एकमेकाला चिकटल्याने नागमोडी आकार येतो. पीठ मळून दहा मिनिटे सेट होण्यासाठी झाकून ठेवावे.

दहा मिनिटा नंतर गरम तेलामधे शेव तळून काढावी.तेल अती गरम नको.शेव लाल होते. फार गारही नको मध्यम असावे. शेव लवकर तळली जाते.तेलात घातल्यावर बुडबुडे थांबले की पलटावी व दुसरीकडून तळून घ्यावे.

शेव गार झाली की हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

30 October 2018

रवा बेसन लाडू (Rawa Besan Ladu)

No comments :

लाडवाचे बरेच प्रकार आहेत. बेसन लाडू, ओले खोबरे घालून रवा लाडू,मावा घालून रवा लाडू, तर आज मी रवा बेसन लाडू केलेत. खायला खमंग व रवाळ लागतात. ओले खोबरे किंवा मावा घातलैल्या लाडू पेक्षा हे जास्त दिवस टिकतात. घरात उपलब्ध साहीत्यात होतात व करायला सोपे आहेत. साहित्य व कृती-

साहित्य :-
* बेसन पीठ १ कप (१०० ग्रँम)
* रवा ३/४ कप (१०० ग्रँम)
* साखर ३/४ कप (१२५ ग्रँम)
* तूप १/२ कप (५० ग्रँम)
* पाणी १/४ कप + २ टेस्पून
* वेलची पूड
* बेदाणे सजावटीसाठी

कृती :-
प्रथम कढईत तूप घालून रवा व बेसन वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. नंतर दोन्ही एकत्र करून त्याच कढईत गँस बंद करून ठेवावे.

आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून पुर्ण एकतारी म्हणजे दोनतारी च्या अलिकडचा सुरवातीचा पाक तयार करून भाजलेल्या मिश्रणामधे घालावा. 

सर्व मिश्रण पाकात व्यवस्थित एकत्र करावे व गँस चालू करून परत थोडे परतावे व एकत्र गोळा व्हायला सुरवात झाली की गँस बंद करावा.  मिश्रण थंड होऊ द्यावे.  मधून मधून हलवत रहावे. पंधरा मिनिटानंतर मिश्रण कोमट झाले की गोळा होऊ लागतो. 

आता वेलचीपूड घालून मिश्रण कोमट असतानाच हव्या त्या आकारमानाचे लाडू बेदाणे लावून वळावेत.

वरील साहित्यात फोटोतील आकाराचे १२ लाडू होतात. हे लाडू फ्रिज शिवाय १५ दिवस चांगले रहातात.

टिप: आपल्या आवडीनुसार तूप दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घेतले तरी चालते. परंतु लाडू किंचित कोरडा होतो.

तुम्हीही करून बघा सहज व सोपे आहेत.नक्की आवडतील. मात्र अभिप्राय द्यायला विसरू नका.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

21 September 2018

बेसन बर्फी ( Besan Burfi)

No comments :

घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल अथवा स्वताला कांही गोड खाण्याची इच्छा झाली तर घरातील उपलब्ध साहीत्यात ही बेसन बर्फी पटकन् करता येते. तसेच चविलाही उत्तम लागते. कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बेसन १ कप (१०० ग्रँम)
* साखर १/२ कप ( ७५ ग्रँम)
* तूप १/४ कप ( ५० ग्रँम)
* बदाम, पिस्ता काप
* वेलची पूड

कृती :-
प्रथम पॅनमधे तूप घालून त्यावर बेसनपीठ घालावे व छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.भाजल्यावर थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून ठेवावे.

आता त्याच पँनमधे साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.पाक एकतारी किंवा दोनतारी असा कोणताही नको, तर फक्त साखर विरघळून बोटाला चिकट लागण्याइतपतच म्हणजे एकतारीच्याही अलिकडचा झाला की गँस बंद करावा.त्यामधे वेलचीपूड घालावी व दोन मिनिट थंड करावा.

आता तयार पाकामधे भाजून ठेवलेले बेसनपीठ घालून सर्व मिश्रण एकत्र हलवावे. गँस बंदच असावा.  मिश्रण घट्ट व्हायला लागते. नंतर आधीच तूप लावून ठेवलेल्या थाळीत मिश्रण ओतावे. वरून बदाम, पिस्ता लावावे व मिश्रण पंधरा मिनिट थंड होऊ द्यावे.

आता सुरीने आडव्या उभ्या, लाईन्स मारून ठेवावे.नंतर अजून पंधरा मिनिटानंतर पुर्ण थंड झाल्यावर वड्या काढाव्यात.

टिप्स :-
* भाजलेले बेसन व पाक दोन्हीही गरम असेल तर बर्फी कडक होते. म्हणून दोन्हीही साधारण गार करून मगच एकत्र करावे.
* प्रमाणापेक्षा जास्त तूप घातल्यास बर्फी खूपच मऊ लिबलिबीत होते.
* बेसन छान गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावे.   अन्यथा चवीला पीठ पीठ लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या.आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

10 September 2018

उकडीचे मोदक करताना घ्यावयाची काळजी

3 comments :

बाप्पासाठी उकडीचे मोदक करताय?  तर पुढील टीप्स
जरूर वाचा -
*******************************************
मोदक, म्हटले की गणपती बाप्पा ! असे समिकरणच आहे.त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. 'उकडीचे मोदक' करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते.  बर्याच गृहीणी 'उकडीचे मोदक' म्हटले की,करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे अजिबात अवघड नाही.

* मोदकासाठी पीठी तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती , आंबेमोहोर  व तोही नवा घ्यावा . फार जुना नसावा. त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखर्या(चुण्या) पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पीठी मिळते , खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावी.

* तांदुळ दळून पीठी करणार असाल तर तांदुळ आधी निवडून स्वच्छ धुवावा व पाणी निथळून नंतर सुती कपड्यावर पसरून आठ - दहा तास सावलीतच सुकवावा व नंतर दळून आणावा.  दळून आणल्यावर पीठी बारीक चाळणीने चाळून नंतर पीठी उकडीसाठी वापरावी.

* सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.मोदक खाताना पीठ तोंडात टाळ्याला चिकटते.

* आतल्या सारणासाठी नारळ  फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.

* नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा. म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.

* सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा .खारट नको.

*सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या. तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.

* सारण आदले दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. घाई-गडबड वाचेल.

* मोदक तयार करताना उकड गरम असावी . तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत. यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.

* उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही मोठे चविष्ट लागतात.घरगुती पांढरे लोणी वापरा.

* शक्य असेल तर उकड दूधामधे किंवा अर्धे दूध व अर्धे पाणी  वापरा उकड पांढरी, मऊ होते व मोदक अधिक स्वादिष्ट होतात.

* मोदक  तयार करताना त्याच्या कळ्या पाडणेचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.मुखर्या छान धारदार पाडता येतात . हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.

* उकड मळताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करावा.  तेलामुळे मोदक फुटतात.

* पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. खालून फाटत नाहीत.

* मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे/करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुध्दा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल/ तूप चोळा .

* मोदक उकडायला ठेवताना आधि पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.

* तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिकटून फाटणार नाहीत.

आता इतके त्याचे नखरे संभाळून केलेले 'उकडीचे मोदक' बाप्पाला का नाही आवडणार ? नक्कीच आवडतील. व तुम्हाला पण आवडतील ! ते कसे करायचे , साहीत्य व कृतीसाठी पुढे दिलेल्या लिकवर क्लिक करा.

http://swadanna.blogspot.in/2014/08/blog-post.html?m=0

24 July 2018

सांजोरी (Sanjori)

1 comment :

'सांजोरी' यालाच सारनोरी, साठोरी असेही म्हणतात.हा पारंपारिक व पौष्टीक पदार्थ आहे. गणेश चतुर्थी मधे गणपतीच्या,महालक्ष्मीच्या नैवेद्याला, दिवाळीच्या लक्ष्मीपुजना दिवशी नैवेद्याला केला जातो.तसेच मुलांना मधल्या वेळचे खाणे, शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात न्यायला सोयीचा प्रकार आहे.तीन-चार दिवस सहज टिकतो.घरात नेहमी उपलब्ध असणार्या साहित्यात होतो.साहित्य व कृती 👇

साहित्य :-
वरील पारीसाठी
* बारीक रवा १ कप
* मैदा २ टेस्पून
* तेल २ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* चिमुटभर साखर
* पाणी गरजेनुसार
आतील सारणासाठी
* बारीक रवा १/२ कप
* पीठीसाखर १/२ कप
* तूप २ टेस्पून
* मिल्क पावडर १/४ कप ( ऐच्छीक)
* खसखस १ टीस्पून
* वेलची पूड
*  पाणी गरजेनुसार
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम रवा,मैदा मीठ,साखर घालून एकत्र करून घ्यावे. नंतर तेल गरम करून त्यामधे घालून हाताने चोळून घ्यावे.आता गरजे इतकेच थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळावे.जास्त सैल नको व अती घट्टही नको.मळलेले पीठ एक तास झाकून ठेवावे.

आता सारण तयार करावे. पँनमधे घेतलेल्या एकूण तूपामधले १ टेस्पून तूप घालून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.भाजून ताटलीत काढून त्यावर थोडे पाणी शिंपडावे व पांच मिनिट झाकावे. पांच मिनिटानंतर कोमट असतानाच पीठीसाखर,वेलची पूड घालून सारण हाताने एकजीव करावे. आत्ताच सारणात शिल्लक १ चमचा तूप व मिल्क पावडरही घालून मळावे.सारण फार कोरडे वाटले तर किंचित पाण्याचा हात घेऊन मळावे.मिश्रणाचे मुठीत दाबले तर लाडू व्हावेत इतपत ओलसर असावे. आता सारणाचेे हलक्या हाताने साधारण लाडू करून घ्यावे. दाबून फार घट्ट लाडू करू नये.

नंतर आधीच मुरून तयार असलेले पीठ परत एकदा मळून घ्यावे अथवा कुटून घ्यावे. मिक्सर मध्ये थोडे-थोडे घेऊन फिरवून काढावे. या पीठाच्या थोड्या लहान आकाराच्या म्हणजे सारणाचेे लाडू केलेत त्या आकाराचे समान गोळे करून घ्यावेत व एकेक गोळी घेऊन त्यामधे सारणाचा लाडू भरून व्यवस्थित बंद करावे. हलक्या हाताने फार पातळ नाही अशी किंचित जाडसर मोठी पुरी लाटावी व अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावी.तळताना सारखी उलटवू नये.अलगद तळावी,जेणेकरून फुटणार नाही याची काळजी घ्यावी.

थंड झाल्यावर अतिशय खुसखूषीत खमंग अशी सांजोरी खायला उत्तम लागते. बाजारी पदार्थ आणण्यापेक्षा घरीच असा एखादा सहज सोपा पौष्टीक पदार्थ मुलांना खायला करून ठेवावा.

वर दिलेल्या साहित्या मधे फोटोतल्या आकाराच्या ८ साठोऱ्या होतात.

टिप्स :-
* सारण तयार करताना किंवा पारीसाठी कणिक मळताना पाण्याचाच वापर करावा,दूध नको. दूधामुळे नंतर वास येण्याची शक्यता असते.

* सारणामधे भाजलेला खवा अथवा शिल्लक पेढा घातला तरी चालते.

* सांजोरी तूपावर शॅलोफ्राय केली तरी चालते.  तसेच आधी तव्यावर थोडी भाजून नंतर तेलात तळल्यास तेल कमी लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

20 July 2018

चटपटीत काँर्न क्रिस्पी ( Corn Crispy)

No comments :
थंड पावसाळी हवेत कांहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. तेव्हा पट्कन करण्यास हा प्रकार मला आवडतो. स्वीट काँर्नचे चाटआपण नेहमी करतो. तर हा थोडा चटपटीत वेगळा, कमी साहीत्यात होणारा पदार्थ आहे.कसा करायचा साहित्य व कृती-
साहित्य :- 

* स्वीट काँर्न दाणे १ कप
* काँर्नफ्लोअर २ टेस्पून
* मैदा २ टेस्पून   
* मीठ चवीनुसार
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* मिरपूड पाव टीस्पून
* चाट मसाला पाव टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* कोथंबिर, लिंबू

कृती :-
प्रथम मक्याचे दाणे, स्वीट काँर्न गरम पाण्यात मीठ घालून पांच मिनिट वाफवून घ्यावेत. वाफल्यानंतर चाळणीवर काढून गार होऊ द्यावे.

आता वाफवलेल्या गार दाण्यावर काँर्नफ्लोअर, मैदा, मिरची पूड घालावी व सर्व दाणे एकत्र हलवून काँर्नफ्लोअर मधे लपेटून घ्यावे.पाणी घालू नये. काँर्नफ्लोअर कोरडे तळाला राहीलेय असे दिसले तर किंचित पाणी शिंपडावे.अन्यथा नको.


आता मसाला लपेटलेले दाणे, मोठया चाळणीने चाळून,(जास्तीचा मसाला निघतो)तेल गरम करून त्यामधे मंद आचेवर खरपूस तळून टिश्यू पेपरवर काढावेत.
सर्व तळून झाल्यावर एका बाऊलमधे घेऊन त्यावर चाटमसाला,मिरपूड घालून एकत्र करावे. 

खायला देताना वरून लिंबू पिळावे व कोथंबिर घालावी.
चटपटीत, कुरकूरीत असे हे काँर्न संध्याकाळच्या वेळी तोंडात टाकायला खूप छान लागते.

टिप :
* तळताना सुरवातीला मंद आचेवरच तळावे व नंतर आंच थोडी मोठी करावी. सुरवातालाच खूप गरम तेलात,मोठ्याआचेवर दाणे तेलात फुटतात व तेल उडते.  यातून खबरदारी म्हणून वर अर्धवट ताट झाकून तळावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

18 July 2018

केक करताना लक्षात घेण्याच्या गोष्टी (Cake Tips)

No comments :

आजकाल घरात छोट्या -मोठ्या प्रसंगासाठी म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, किंवा न्यू इयर अगदी कांही नसले तरी मुलांना आवडतो म्हणून केक विकत आणला जातो. सहसा केक रोजच्या खाण्यातल्या इतर पदार्थाप्रमाणे घरी करण्याचा कोणी विचार करत नाही. एकतर सामान्य व्यक्ति च्या डोक्यात केक म्हणजे कांहीतरी अवघड पदार्थ आहे,त्यामधे अंडी घालतात त्याशिवाय केक होतच नाही असे व इतर अनेक गैरसमज बसलेले असतात. तसेच आमच्याकडे मायक्रोवेव ओवन नाही ही पण एक समस्या असते. अाणखी मी केलेला केक फुगत नाही, कडक होतो, जाळी पडत नाही असे बरेच मुद्दे येतात. मग त्या वाटेला जायलाच नको. केक म्हणजे केव्हातरी खायचा पदार्थ, अन् कशाला पाहीजे झंझट असे विचार होतात. कारण आपण केक बनविताना त्यातील बारकावे लक्षात न घेता ढोबळमानाने कुठूनतरी वाचून,बघून करतो.मग हवा तसा मनासारखा होत नाही. शेवटी आपण नाद सोडून देतो.

परंतु खरं सांगू? घरात केक बनवायचा तर यातील एकही समस्या येत नाही. फक्त त्याची आपल्याला व्यवस्थित माहीती व कृतीचे बेसिक पक्के नीट माहीत असले पाहीजे. बस्स! कोणतीही अडचण येत नाही.आपण सर्व प्रकारचे केक अगदी वरील आईसिंग सह घरी बनवू शकतो.

आपल्याला जर विकतच्या सारखा मऊ लुसलू़शित स्पाँजी अन् कमी खर्चात ताजा, हायजेनिक केक घरातच करता आला तर मस्तच ना? तर पुढे सांगितलेले कांही बारकावे लक्षपूर्वक वाचा. नक्की तुम्हीसुध्दा घरच्या-घरी मनात येईल तेव्हा केक करू शकाल.अन् खाताना किंवा खिलवताना स्वत: केलेल्या केकचे कौतुक व टेस्ट कांही औरच.

* सर्वात आधी हे लक्षात घ्यावे की, केक बिना अंड्याचाही होऊ शकतो.

* केक करण्यासाठी घरात मायक्रोवेव ओवनच असला पाहीजे असे नाही.कुकरमधे अथवा कढई मधे केक करता येतो.कुकर/ कढईच्या तळाला वाळू किंवा बारीक मीठ पसरावे व त्यावर गोल स्टील रींग किंवा टेबलवर गरम भांडी ठेवण्यासाठीचे स्टँड ठेवावे व त्यावर केक टीन ठेवावा.कढईवर मापाचे जड झाकण ठेवावे.जर कुकर असेल तर शिट्टी काढावी व ओवनप्रमाणे १० मिनिट प्रीहीट करावे.देशी ओवन तयार!

आता केकची सुरवात -

* आता सर्वात प्रथम केक रेसिपी काळजीपूर्वक वाचून/ऐकून घ्यावी. त्यामधे दिलेले सर्व साहित्य दिलेल्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे का? याची खातरजमा करावी. कांही पदार्थ पुरेसे नसतील किंवा उपलब्ध नसतील तर आधीच  त्या साहित्याची जुळवाजुळव करावी.तडजोड अजिबात नको. नाहीतर अपेक्षेप्रमाणे केक होत नाही.

* केकसाठी लागणारे सर्व पदार्थ ताजेच असावेत. खासकरून मैदा,बेकींग पावडर, सोडा.

* केकसाठी लागणारे बटर,दूध,मिल्कमेड रूम टेंपरेचरचे असावे. फ्रिजमधले गार नको.

* आपण ज्या प्रकारचा केक करणार आहे, त्याला लागणारे सर्व साहित्य आधी एका ठिकाणी एकत्र काढून घ्यावे. म्हणजे एखादा पदार्थ विसरत नाही. नेमका सोडाच विसरला बघा... बाकी सर्व सांगितल्याप्रमाणे केले हो! ☺ असे होत नाही.

* रेसिपीत सांगितल्याप्रमाणेच अचूक मोजून मापून सर्व पदार्थ घ्यावेत. केेकमधे प्रमाणाला खूप महत्व आहे. अंदाजे कांही नको.

* आता साहित्याची इतकी सर्व जमवाजमव केल्यावर बँटर तयार करण्याआधी केकचा डबा बटर पेपर लावून किंवा मैद्याचे डस्टींग करून तयार करून ठेवावा.म्हणजे तयार बँटर पट्कन ओतता येते.

* मायक्रोवेव ओवन असेल तर त्यामधे लोअर रँक ठेवून 180 ° तापमानाला प्रीहीटला लावावा.  कढई /कुकर असेल तर ते ही मध्यम आचेवर १० मिनिटे गरम करण्यास लावावे. केक  बेक करण्यासाठी ओवन आधी गरम करणे गरजेचे असते. जसे पोळी भाजताना तवा आधी गरम असावा लागतो तसे.

* आता एका योग्य आकाराच्या बाऊलमधे केक साहित्यातील कोरड्या वस्तु चाळून घ्या. यामुळे कांही कचरा, गुठळ्या,साखरेतील मोठे कण असतीेल तर निघते व मैद्यामधे हवा गेल्याने केक हलका होतो. 

* ओले साहित्य म्हणजे बटर,दूध इत्यादी वेगळ्या बाऊलमधे एकत्र करावे.मात्र जेव्हा कोरडे व ओले साहित्य एकत्र करतो तेव्हा मिश्रण गरजेपेक्षा जास्त वेळ न ढवळता पटकन् आधीच तयार केलेल्या केक डब्यात घालून ओवनला लावावे. नाहीतर फुलण्याची क्रिया बाहेरच होते व प्रत्यक्षात बेक केल्यावर फुलत नाही.

* रेसिपीत सांगितलेल्या वेळेनंतरच ओवन किंवा कुकर उघडावा मधे- मधे उघडून बघू नये.केक बसतो.

* केक तयार झाल्यानंतर एकदा टूथपिकने चेक केल्यावर पांच मिनिट केक आतच राहू द्यावा. वाफ मुरू द्यावी.याला स्टँडींग टाईम म्हणतात. याने केक चिकट रहात नाही.

* बाहेर काढल्यावर केकचे भांडे गार झाल्यावर, कडा सुरीने सोडवून नंतर वायर रँकवर, व  नसेल तर घरातील पीठाच्या चाळणीवर काढून ठेवावा व पुर्णपणे गार होऊ द्यावा. म्हणजे खालून चिकट न रहाता सर्व बाजूने हवेने गार होतो.नंतर कापावा.

* या केकवर आईसिंग करायचे असेल तर केक फ्रिजमधे ठेवून चांगला गार करावा अथवा शक्य असल्यास आदल्यादिवशी करून फ्रिजमधे ठेवावा. तरच केकचे डेकोरेशन आकर्षक होते. नाहीतर क्रिम पघळते डिजाइन नीट होत नाही.

आपण वरील सर्व मुद्दे विचारात घेऊन जर काळजीपूर्वक केक केला तर अतिशय उत्कृष्ट केक घरी होतो व एकदा जमला की आत्मविश्वास वाढतो. मग आपण हौसेने वरचेवर केक करतो व सराईतपणा येतो.

स्वादान्न 🙏

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

12 July 2018

व्हेज कुर्मा (Veg korma)

No comments :
रोजच्या साध्या भाजीपेक्षा त्याच भाजीला थोडा वेगळा मसाला, ग्रेवी करून वेगळी चव आणली की जेवण थोडे जास्त लज्जतदार होते.  तर तसाच हा व्हेज कुर्मा प्रकार आहे. सुट्टी दिवशी नाष्टा कम जेवण म्हणून करायला मला आवडतो.  कसा केला साहित्य व कृती- 

साहित्य :-
* फ्लाॅवर १ बाऊल
* बटाटे २ मध्यम
* मटार अर्धा बाऊल
* कांदा १ मोठा
* टोमँटो २
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* खसखस १ टीस्पून
* तिळ २ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* सुकं खोबरं पाव वाटी
* मीठ चविनुसार
* तेल
* फोडणीसाठी मोहरी,जीरे, हींग हळद

कृती :-
प्रथम भाज्या मोठ्या आकारात कापून अर्धवट शिजवून घ्याव्यात.

आता आधी तिळ,खसखस व सुके खोबरे वेगवेगळे भाजावे.नंतर त्याच पँनमधे थोडे तेल घालून कांदा परतावा. सर्व साहित्य थंड झाले की,  मिक्सर मधून वाटून घ्यावे.

नंतर पँनमधे तेल गरम करून त्यामधे मोहरी,जीरे तडतडवून फोडणी करावी. त्यामधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट व वाटलेला मिश्रणाचा गोळा घालावा व थोडे परतावे. आता त्यात तिखट,मीठ, गरम मसाला व आधीच अर्धवट शिजवलेल्या भाज्या घालून थोडे पाणी घालावे  व एक उकळी आणावी ग्रेवी दाटसरच ठेवावी.

आपला गरमा-गरम व्हेज कुर्मा तयार आहे.  पुरीसोबत खायला द्या. आवडत असेल तर सोबत लिंबू व कांदा द्यावा.

टीप :
* आपल्या आवडीनुसार किंवा उपलब्ध असतील त्या भाज्या घ्याव्यात.
* भाज्या तेलात तळून काढण्याची पण पध्दत आहे. परंतु मला वाफलेल्या आवडतात म्हणून वाफवून घेतल्या.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.




05 July 2018

इन्स्टंट ढोकळा (Instant Dhokala)

No comments :

'इन्स्टंट ढोकळा' हा नाष्ट्याला, डब्यात देण्यासाठी किंवा अचानक कोणी पाहुणे घरी आले असता चहासोबत देण्यासाठी खमंग असा सोपा व झटपट होणारा हा पदार्थ आहे.

साहित्य :-
* बेसन १ कप
* बारीक रवा १ १/२ टेस्पून
* सायट्रीक अँसिड १/२ टीस्पून
* साखर १ टेस्पून
* मीठ १/४ टीस्पून
* इनो फ्रूट साॅल्ट १ टेस्पून
* आलं, मिरची पेस्ट १ टीस्पून
* हळद चिमूटभर
* तेल १ टेस्पून
* पाणी १ कप
* फोडणी साहित्य तेल, हिंग, मोहरी, तिळ, कढीपत्ता

कृती :-
प्रथम गँसवर कुकर पाणी घालून गरम करण्यास ठेवावा. नंतर एका बाऊलमधे बेसन घेऊन त्यामधे इनो सोडून,रवा व इतर सर्व साहित्य मिसळावे.

नंतर गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेत थोडे -थोडे पाणी घालावे व मिश्रण तयार करावे.

सर्वात शेवटी इनो पावडर घालून मिश्रण ढवळावे व झटपट तेलाने ग्रीस केलेल्या थाळीत ओतून ढोकळा स्टँड कुकरमधे ठेवावे. १५-२० मिनिट शिट्टी न लावता वाफवावे.

थंड झाल्यावर बाहेर काढून हींग,मोहरी,तिळ, कढीपत्ता घालून फोडणी करावी व तयार ढोकळ्यावर घालावी.

वरून सजावटीसाठी कोथंबिर घालून खाण्यास द्यावा.

टिप:
* दिलेल्या साहित्यापैकी फक्त कोरडे साहित्य एकत्र करून बरणीत भरून ठेवले तर दोन महीन्यापर्यंत टिकते व ऐनवेळी पटकन् ढोकळा करता येतो.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

व्हेज मेयाेनिज संँडविच ( Veg Mayonnaise Sandwich)

No comments :

रोजच नाष्टा काय करावा?  संध्याकाळी काय खायला द्यावे? मुलांना डब्यात काय देऊ?  तर असे कधीतरी सैंडविच करावे. घरात उपलब्ध असतील त्या भाज्या घालून करायचे.

साहित्य :-
* ब्रेड स्लाइस चार
* मेयाेनिज साँस २ टेस्पून
* गाजर किसून १
* टोमँटो, कांदा बारीक चिरून अर्धी वाटी
* शिमला मिरची लहान एक बारीक चिरून
* कोबी मुठभर चिरून
* मिरपूड
* चिलीफ्लेक्स
* सॅडविच मसाला किंवा मिक्स हर्ब्स
* चीज क्यूब २ ( ऐच्छीक)
* बटर (ऐच्छीक)

कृती :-
प्रथम ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात. ब्रेड ताजा, मऊ असेल तर नाही कापल्या तरी चालतात.

नंतर एका बाऊलमधे चिरलेल्या भाज्या एकत्र कराव्यात.

आता त्यामधे मेयाेनिज, थोडी मिरपूड घालावी. मिश्रण तयार झाले.

आता ब्रेड स्लाईस घेऊन एकावर टोमँटो साँस पसरावे व दुसर्यावर तयार मिश्रण पसरावे. मिश्रणावर चिलीफ्लेक्स, मिक्स हर्ब्स,मिरपूड भुरभुरावी. वरून चिज किसून घालावे. साँस लावलेला स्लाईस त्यावर ठेवावा व तिरके कापून  सर्व्ह करावे. आवडत असल्यास वरून बटर लावून तव्यावर भाजून टोस्ट केला तरी चालतो.  परंतु टोस्ट केला तर लगोलग गरमच खावा. डब्यात द्यायचा असेल तर टोस्ट संँडविच गार झाले की चिवट होते.

साहित्य घरात उपलब्ध असेल तर असे झटपट सॅडविच छान होते. भाज्यांच्या जोडीला वाफवलेले मोडाचे मूग, मक्याचे दाणे घातले तरी चालते.  पांढर्या ब्रेड ऐवजी ब्राउन ब्रेड वापरला तर अजून पौष्टीक होते. तुम्हीही करून बघा सहज सोपा पदार्थ आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

29 June 2018

क्रिस्पी ओनियन रिंग्स (Crispy Onion Rings)

No comments :

खमंग कांही खावे वाटले किंवा बाहेर पाऊस पडायला लागला की आपल्याला हमखास कांदा भजीची आठवण येते. तर याच पारंपारिक कांदभजी प्रकारातील पण थोडासा वेगळा ओनियन रिंग्स हा पदार्थ आहे.  करायला एकदम सोपा व खायला खमंग असा आहे.  तर कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मोठे कांदा १
* मैदा १ वाटी
* काँर्नफ्लोअर १ टेस्पून
* ताक १ वाटी
* मीठ चवीनुसार
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* हींग चिमूटभर
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* काळी मिरी भरड अर्धा टीस्पून
* सोडा चिमूटभर
* तेल तळण्यासाठी गरजेनुसार
* चाट मसाला वरून घालण्यासाठी

कृती :-
प्रथम कांदा साल काढून गोल आकाराच्या व साधारण पाव इंच रूंद चकत्या कापून घ्यायच्या.  नंतर फोटोत दाखविल्या प्रमाणे त्याच्या एक -एक रिंग ⭕ हाताने सुट्या कराव्यात.

आता त्या रिंग्जवर थोडासा मैदा व चिमुटभर काँर्नफ्लोअर घालून हाताने सर्व रिंग्जना चोळून घ्यावे.

नंतर एका भांङ्यामधे मैदा व काँर्नफ्लोअर एकत्र घेऊन त्यामधे वरील सर्व मसाला मिसळावा. तसेच ताकही एकदम न घालता थोडे थोडे घालून कालवावे. गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्यावी व बँटर तयार करावे.

शेवटी कांद्याच्या एकेक रिंग घेऊन तयार बँटरमधे बुडवून गरम तेलामधे तांबूस तळून काढाव्यात.

तयार ओनियन रिंग्ज एका डिशमधे घेऊन वरून चाटमसाला भुरभुरावा.  मस्त कुरकुूरीत ओनियन रिंग्ज तयार.

टिप्स :
* या रिंग्ज पीठात बुडवून नंतर ब्रेडक्रम्स मधे घोळवून तळले तर अधिक कुरकुरीत होतात.
* पीठामधे आवडीनुसार आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी.
* गरम असतानाच खावीत. थंड झाले की त्याचा क्रिस्पीनेस कमी होतो.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.