22 December 2017

मिक्स डाळ पकोडे (Mix Dal Pakoda)

No comments :

पाऊस असो किंवा थंडी, गार वातावरण असेल तर चहासोबत कांही चटपटीत खायला हवेच. तसेही चटपटीत खायला कोणाला नाही आवडत?  तर आवडीनुसार सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेऊन मस्त डाळ पकोडे केले. पौष्टीक व चटपटीतही होते. एकदम सोपे आहेत. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* चणाडाळ १ वाटी
* छिलका मुगडाळ १/२ वाटी
* मसूरडाळ १/४ वाटी
* तूरडाळ १/४ वाटी
* उडीदडाळ मूठभर
* कांदा १ चिरून
* हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
* कोथिंबीर
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* हळद, तिखट, मीठ
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम सर्व डाळी धुवून २-३ तास पाण्यात भिजत घालाव्यात. नंतर पाणी निथळून काढून टाकावे व भरड वाटून घ्याव्यात.

आता वाटलेल्या डाळीमधे दिलेला सर्व मसाला व  कांदा, कोथिंबीर घालून एकत्र मिश्रण करावे. पाणी अजिबात घालू नये. धट्टच ठेवावे.

आता तेल गरम करून हातानेच लहान-लहान गोळे तेलात सोङावेत व मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळावे.

तयार मस्त गरमा-गरम कुरकुरीत "डाळ पकोडे " चहासोबत किंवा साँस बरोबर खायला द्या.

टिप :
यामधे आवडीनुसार पालक, मेथी चिरून घातले तर अधिक रूचकर लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

15 December 2017

चिंच गुळाची आमटी ( Chinch Gulachi Aamti)

1 comment :

तूर डाळीची चिंच गुळाची आमटी खास करून महाराष्ट्रीयन ब्राम्हण समाजात केली जाते . रोजच्या जेवणात भातासोबत वरण,आमटी, कढी,सार, किंवा पालक, मेथीची पातळ भाजी असे कांही ना कांही पातळ पदार्थ असतोच. यापैकीच हा एक प्रकार. पावसाळ्यात किंवा थंडीमधे गरमा-गरम मोकळा भात, आमटी, वर तुपाची धार  व सोबत पापड आणि लोणच्याची फोड अहाहा.. अप्रतिम लागते. या आमटीचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तूर डाळ १ वाटी
* मेथी दाणे ७-८
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची पावडर एक टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* गूळ सुपारी एवढा खडा
* मीठ चवीनुसार
* कढीपत्ता, कोथंबिर, ओले खोबरे
* फोडणीसाठी मोहरी, हींग, हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.नंतर डाळीत चिमूटभर हळद, हिंग, मेथी दाणे व शिजण्यापुरते पाणी घालावे आणि कुकरला मऊ शिजवावी.

आता एका पातेल्यात तेल घालून हींग, मोहरी, हळद व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यात एक वाटीभर पाणी घालावे. म्हणजे फोडणी जळत नाही. आता त्यात एक एक साहित्य म्हणजे मसाला, तिखट, मीठ, गूळ, चिंचेचाकोळ घालावे. शेवटी शिजलेली डाळ थोडे पाणी घालून, पळीने घोटून एकजीव करावी व फोडणी मधे घालावी. आपल्या आवडीनुसार घट्ट, पातळ करण्यास पाणी घालावे. चांगली उकळावी. म्हणजे सर्व मसाल्यांचे स्वाद उमटतात.

उकळताना थोडे खोबरं, कोथंबिर घालावे व राहीलेले शेवटी वरून सजावटीसाठी घालावे. जेवणात गरमा-गरम भातासोबत वाढावी.

टीप्स :
* आमटीची डाळ चांगली मऊ मेणासारखी शिजवावी. आमटी एकसंध होते.
* डाळीमधे मेथी दाणे शिजवतानाच घालावे. आमटीला जास्त खमंग चव लागते.
* चिंचेऐवजी ४ आमसुले घातली तरी चालते.
* महत्वाचे म्हणजे आमटी नेहमी गरमच वाढावी.
* या आमटीत शेवग्याच्या शेंगाही छान लागतात.

06 December 2017

स्वयंपाकघरातील युक्ति

No comments :

भाजलेले शेंगदाणे पट्कन सोलायचे असतील तर, एका कापडी पिशवीत घालून घट्ट बांधून जमीनीवर हळू-हळू आपटावेत. एकदम सोलले जातात. नंतर पाखडावेत. 

04 December 2017

लाल मिरचीचा ठेचा (Red Chilli Chuttney)

No comments :

लाल मिरचीचा ठेचा हा झणझणीत व खमंग चटणीचा प्रकार आहे. हा फक्त ठराविक सिझनमधे म्हणजे साधारण नोवेंबर -डिसेंबर मधेच करता येतो. कारण याला झाडावरच पिकलेली मऊ म्हणजे गाभुळलेली अशी मिरची लागते. तरच हा ठेचा हवा तसा ओलसर, रसरशीत होतो. नाहीतर वाळका, चामट होतो. हा गावरान मेवा माझ्याकडे नुकताच गावाकडून आला. अन्यथा मुंबईच्या मंडईत अशा मिरच्या मिळत नाहीत. भाजीवाल्यांकडे शिळ्या होऊन पिकलेल्या वाळक्या लाल मिरच्या असतात. याचा ठेचा होतो पण हवा तसा नाही होत. हा ठेचा वर्षभर टिकतो. नंतर पाहिजे तेव्हा गरजे नुसार थोडा थोडा बाऊलमधे काढायचा व मस्त हिंग-मोहरीची ताजी फोडणी देऊन जेवणात घ्यायचा. खूपच चवदार लागतो. बरेचवेळा यात लसूणही घातला जातो. परंतु आमच्याकडे हिंग, मेथी मोहरीची फोडणी घातलेलाच आवडतो. व टिकण्याच्या दृष्टीतून पण विना लसणाचाच ठिक.  त्यातून कधी लसूण वाला खायची इच्छा झालीच तर बाऊलमधे काढून फोडणी देताना लसूण घालावा. पण जास्तीच्या सर्व ठेच्यात नकोच. तर अशा हा चटकदार ठेचा कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ओली लाल मिरची १/२ किलो
*  मीठ ६ टीस्पून
* लिंबू रस मोठ्या ४ लिंबाचा
* मेथी दाणे १ टीस्पून
* तेल फोडणीसाठी २ टेस्पून
* मोहरी, हिंग, हळद

कृती :-
प्रथम मिरच्या स्वच्छ थुवून पुसून कोरड्या कराव्यात.

नंतर त्यांची देठ काढावीत.

आता देख काढलेेली मिरची, मीठ मिक्सरमधे भरडच वाटावे.

नंतर त्यामधे मेथी तेलात लालसर तळून केलेली पूड व लिंबूरस घालून एकत्र करावे..

स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवावा. त्यातील थोडासा बाऊलमधे काढून घ्यावा . हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी.. गार झाल्यावर ठेच्याावर घालून जेवणात भाकरी, पोळीसोबत खावा. अतिशय रूचकर लागतो. भरल्या वांग्याची भाजी, ठेचा, कांदा, घट्ट दही व सोबत भाकरी.. अहाहा अप्रतिम चव लागते. तसेच एरव्ही थालीपीठ, पराठ्यासोबतही खाल्ला तरी चालते.

टिप: ठेचा गुळगूळीत मऊ अजिबात वाटू नये. भरडच ठेवावा. मधे मधे मिरचीचे बी दिसावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

09 November 2017

मेथी मसाला (Methi Masala)

No comments :

मेथीची भाजी फोडणीला टाकली की, घरभर खमंग स्वाद दरवळतो व भूक एकदम प्रज्वलित होते. मेथी आरोग्याला ही चांगली असते. माझ्या घरी तर मेथी सर्वानाच खूप आवडते. पीठवाली, डाळवाली, गरगट भाजी तसेच मेथी पुरी, मुठीया असे सर्व पदार्थ आलटून पालटून होतात. अगदी मेथीची पचडीसुध्दा आवडीने खातात. आज मी, एका हाँटेलमधे खाल्लेली व मला आवडली म्हणून "मेथी मसाला"  सब्जी ट्राय केली व मस्त झाली. कशी केली साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मेथी भाजी १ जुडी
* मोठा कांदा १
* टोमँटो १
* आलं-लसूण,हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* चणाडाळ पीठ १ टेस्पून
* मीठ चविनूसार
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* तेल न फोडणी साहित्य हिंग,मोहरी

कृती :-
प्रथम मेथी निवडून धुवून बारीक चिरावी. कांदा,टोमँटो बारीक चिरावे.

आता तेल गरम करून फोडणी करून त्यामधे कांदा, टोमँटो व आलं लसूण पेस्ट परतावी. शेवटी चिरलेली मेथी टाकावी व एक वाफ काढावी भाजी खाली बसते.

नंतर मीठ व डाळीचे पीठ अर्धी वाटी पाण्यात कालवून भाजीमधे घालावे. गरजेनुसार अजून थोडे पाणी घालावे व थोडे शिजू द्यावे. जास्त पाणी घालू नये. ही भाजी घटसरच असते.

आता ही तयार गरमा-गरम भजी भाकरी अथवा चपाती सोबत वाढा. अतिशय रूचकर लागते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

29 October 2017

स्वयंपाक घर, घराचा आत्मा

No comments :

'स्वयंपाक घर' हा घराचा आत्मा असतो. स्वयंपाक घर म्हणजे पवित्र महायज्ञाची तयारी जिथे केली जाते ती जागा. कारण उदरभरण म्हणजे ते नुसते पोट भरणे नसते तर ते एक यज्ञकर्म करणे समजले जाते व अशा उदरभरणाची सोय जिथे केली जाते ती जागा म्हणजे यजाची पवित्र जागा, स्वयंपाक घर होय! व या ठिकाणी सर्व काम पवित्र रीतीनेच केले पाहीजे. तसेच चौसष्ट कला पैकी पाककला एक उच्च दर्जाची कला समजली जाते. चविष्ट व पौष्टीक पदार्थ करणे ही एक पाक कला आहे व स्वयंपाक घर एक कला दालन आहे . तर अशा कला दालनामधे वावरताना प्रत्येकाने पाळावित अशी कांही पत्थे व करण्यायोग्य सोप्या गोष्टी.

• स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे. नियमित साफ-सफाई झाली पाहीजे.

• ‎स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी शुचिर्भुत होऊन, सुती व काम करण्यास सोईचे स्वच्छ कपडे परिधान करावेत.

• ‎केस व्यवस्थित एकत्र वर बांधलेले असावेत.

• ‎नेहमी आधी साबणाने हात स्वच्छ धुवूनच मग कामाला सुरवात करावी.

• ‎स्वयंपाकात लागणारे डाळी, तांदुळ, कडधान्ये नेहमी साफ करून ठेवावीत. पीठं चाळून ठेवावीत. शेंगदाणे भाजून कुटून ठेवावेत. रवा भाजून ठेवावा. पोहे चाळून ठेवावेत.

• ‎स्वयंपाकात लागणारे मसाले तीन किंवा सहा महिन्याचेच करावेत. अशाने त्यांचे स्वाद कमी होत नाहीत. पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.

• ‎आधीचे पदार्थ आधी वापरावेत. ते जास्त जूने  होऊ देऊ नयेत.

• ‎गवार, घेवडा, मटार सारख्या भाज्या आधीच निवडून, मोडून फ्रीजमधे ठेवाव्यात. पालेभाज्या, कोथिंबीर निवडून ठेवावे. आलं-लसूण पेस्ट तयार करून ठेवावी. ऐनवेळी घाई  गडबड होत नाही.

• ‎भाज्या चिरण्याआधी धुवून घ्याव्यात. चिरल्यावर नाही.

• ‎जो पदार्थ करणार आहोत त्याची आधी पुर्वतयारी करून घ्यावी. नंतरच गँस पेटवून सुरवात करावी. म्हणजे त्या पदार्थाला आवश्यक एखादा पदार्थ नसेल तर पर्यायी सोय करता येते व पदार्थ नीट बनतो. तसेच गँसचीपण बचत होते.

• ‎तयार अन्नपदार्थ नेहमी व्यवस्थित झाकून ठेवावेत.

• आपल्या ‎गरजे इतकेच अन्न पदार्थ तयार करावेत. आजच्या काळात ऐनवेळी कोणीही कोणाकडे जात-येत नाही.

• ‎शक्यतो शिळे अन्न शिल्लक राहूच नये परंतु कांही कारणाने कधी शिल्लक राहीलेच तर लवकरात लवकर त्याचा कांही नविन पदार्थ करून घरातल्या सर्वानी वाटून खाऊन संपवावा. वाया घालवू नये.

• ‎कुठे वाचलेला, खाल्लेला अथवा आवडलेला एखादा नवीन पदार्थ करून पहायचा असेल तर, आधी त्याचा पुर्ण अभ्यास करावा. लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे याची एकदा खात्री करावी. एखादी वस्तू नसेल तर आधीच आणवून घ्यावी व नंतरच शांतचित्ताने प्रयोगाला सुरवात करावी. म्हणजे पदार्थ सहसा फसत नाही.

• ‎नवीन पदार्थ करताना सुरवातीला अगदी कमीत-कमी प्रमाणात साहित्य घेऊन लहान प्रमाणात पदार्थ बनवावा. चुकून बिघडलाच तर फार वाया जात नाही. आवडला तर आणखी बनवता येते.

• ‎स्वयंपाक घरात नेहमी एखादे पेन व कागद छोट्या पँडला लावून लटकवून ठेवावे. एखादा पदार्थ संपला तर लगेच लिहून ठेवावे. म्हणजे बाजारातून सामान आणताना सर्व वस्तू न विसरता घरी येतात व ऐनवेळची धावपळ वाचते.

• स्वयंपाक घर ‎आपल्या कुवतीनुसार सर्व आवश्यक त्या जुन्या व अत्याधुनिक साधनानी म्हणजे भांडी, चमचे, पँन, कढई, तवे, मिक्सर, ब्लेडर इत्यादि.. नी सुसज्ज ठेवावे व पदार्थ तयार करताना योग्यवेळी योग्य ती साधने आळस न करता वापरावित. पदार्थ अधिक रूचकर व लवकर होतो.  उदा. शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी जुन्या पध्दतिने बिडाच्या खलबत्त्यात कुटली तर अधिक रूचकर लागते.. तेच धण्या -जिर्याची पावडर मिक्सरमधे चांगली बारीक होते.

• ‎सर्वात शेवटी महत्वाचे, स्वयंपाक करताना आनंदी वृत्तीने, मनापासून करावा. पदार्थ अधिक चवदार व चांगला होतो. आदळाआपट करत चिडचिड्या वृत्तीने कधीच करू नये. हा अन्न देवतेचा अपमान असतो. व असे अन्न घरातल्या खाणार्याच्या कधीच अंगी लागत नाही व समाधानही मिळत नाही. बरकत रहात नाही.

एकूणच फक्त पदार्थ करता येणे म्हणजे 'सुगरण' नव्हे तर त्या जोडीला स्वच्छता, नियोजन, बचत, शास्त्र अशा सर्व कला तिला अवगत असाव्यात तरच अशा सुगरणीला अन्नपुर्णा देविचा वरदहस्त लाभतो.

आपण जे काम करतो ते मनापासून व आनंदाने करावे. पुर्ण क्षमतेने करावे. स्वतालाही आनंद मिळतो व समोरच्यालाही मिळतो.

धन्यवाद 🙏
स्वादान्न




07 October 2017

बालूशाही (Balushahi)

No comments :

बालूशाही हा पक्वान्नाचा  किंवा हवे तर मिठाई चा पदार्थ म्हणावे. कारण ८ -१० दिवस टिकतोही. करायला एकदम सोपा. खायलाही मस्तच. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
(अंदाजे १५-१६ नग)
* मैदा ३ कप
* तूप अर्धा कप
* दही पाव कप
* मीठ चिमूटभर
* सोडा अर्धा टीस्पून
* साखर २ कप
* पाणी १ कप
* वेलचीपूङ
* रोज इसेन्स
* बदाम पिस्ता काप सजावटीला
* तूप किंवा रिफाइंड तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम मैदा चाळून एका बाऊलमधे घ्यावा.त्यामधे  तूप, सोडा व मीठ घालून आधी कोरडेच हाताने चोळून घ्यावे. मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.

आता दही व गरजेनुसार पाणी घालून पीठ फक्त एकत्र करावे. खूप मळून तुकतूकीत गोळा करण्याची आवश्यकता नाही.ओबड-धोबडच राहू द्या. अशाने बालूशाही वर छान लेयर येतात व खुसखूषीत होते. १५ मिनिट झाकून ठेवावे.

आता पीठाचे लहान -लहान पेढ्यासारखे चपटे गोळे बनवून अंगठ्याने मधे दाब देऊन खळगा करावा. व गरम तूपामधे अगदी मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावेत. तळून थंड होऊ द्यावे.

आता साखर पाणी एकत्र करून पाक करावा. साखर विरघळून उकळू लागले की साधारण दाट होईपर्यंत, एकतारीच्या किंचित अलिकडे म्हणजे एकतारीला सुरवात झाली की पाक झाला. आता वेलचीपूड व इसेंन्स घालावे.

आता पाकामधे, तळलेली बालूशाही सोडावी किंवा बालूशाही पसरट भांङ्यामधे घेऊन वरून पाक ओतावा. ५-१० मिनिट ठेऊन अलगदपणे चिमट्याने एकेक बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवावे व वर बदाम, पिस्ता काप लावावेत.

गार झाल्यावर एकदम खुसखूषीत लागते. अतिशय छान आतून पदर सुटलेले असतात वरून पांढरट साखरेचा थर दिसतो. एकूणच मस्त! 

टिप्स:
* मंद आचेवरच तळावे. वेळ लागतो पण आतून छान तळली जाते.
* दही ताजे वापरावे. खूप आंबट व वास येणारे नसावे.
* पाकात थोडा केशर टाकला तर मार्केटप्रमाणे केशरी रंग येतो.
* पाक कच्या ठेवला तर बालूशाही नरम पडते व पक्का केला तर आत पर्यंत मुरत नाही.
* पीठ फार मळू नये.
* तळताना काळजी घ्यावी. खूप खुसखूषीत असल्याने फूटू शकतात. अलगदपणे उलट-सुलट करावे.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 October 2017

सात कप वडी (Seven Cup Burfi)

No comments :

'सात कप वडी ' हा एक पारंपरिक मिठाईचा पदार्थ आहे. पौष्टीक व झटपट होणारा आहे. पारंपारिक प्रकारामध्ये फक्त एकूण साहित्य सात कप असते. म्हणून सात कप वडी नांव पडले. परंतु मी थोडा बदल करून मिल्क पावडर व सुकामेव्याची पावडर घेऊन टोटल सात पदार्थ घेऊन सात कप मिश्रण केले व थोडी अधिक पौष्टीक करण्याचा प्रयत्न केला व छान यशस्वी झाला. कशी केली साहित्य व कृती -

साहित्य :-
* बेसन पीठ १ कप
* ओलं खोबरं १ कप
* तूप १ कप
* दूध १ कप
* मिल्क पावडर १/२ कप
* ड्रायफ्रूट भरड १/२ कप
* साखर २ कप

कृती :-
प्रथम सर्व साहित्य मापाने मोजून काढून घ्यावे. नंतर नाँनस्टीक पँनमधे डाळीचे पीठ साधारण म्हणजे कच्चेपणा जाण्याइतपत भाजून घ्यावे.

नंतर तूप, दूध, ओलं खोबरं, साखर घालून ढवळत रहावे. साखर विरघळली की ड्रायफ्रूट पावडर व मिल्क पावडर घालावी.

सर्व साहित्य गोळा होईपर्यंत ढवळत रहावे. कडेने तूप सुटून एकत्र गोळा तयार झाला की तूप लावलेल्या ताटात काढावे  व हाताने किंवा वाटीने थापावे. आवडत असल्यास वरून बदाम पिस्ता काप लावावेत. मिश्रण थंड झाले की वड्या कापाव्यात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 October 2017

तूपाची बेरी

2 comments :

आजकाल लोकांना 'तूप' म्हटले की च वजन वाढल्याचा भास होतो. तूप खाणे शक्यतो टाळले जाते त्यामुळे घरात तयार करून खाणे तर दूरच. तसेही तूप बनविण्याची प्रक्रिया खूप मोठी व वेळखाऊही आहे. परंतु घरी करायचे तितकेही अवघड नाही.. फक्त रोज नियमितपणेे दूधाची साय काढणे, विरजणे, घुसळणे, लोणी ठराविक दिवसानी कढविणे असे सर्व चिकाटीने करावे लागते. तूप अतिशय गुणकारी आहे. रोज सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा शुध्द तूप आहारात असावेच. आरोग्याला चांगले असते. घरी केलेल्या लोणकढ्या तूपाची चव व खमंग वास खूपच छान लागते. तसेच घरी केलेले असल्याने भेसळ नाही व असे घरचे शुध्द तूप अजिबात बाधत नाही. तसेच तूप कढविल्यावर खाली लागते त्या खरवडीला तूपाची बेरी म्हणतात. ही सुध्दा खूप पौष्टीक असते बरं..

लहानपणी आम्ही भावंडे ही खरवड व तूपात घातलेले विड्याचे पान खाण्यासाठी भांडत असू. यावरून लहानपणीचे एक गाणे आठवले. आई विचारायची तूप कसे तयार होते माहीत आहे का? मग आम्ही सुरू,
दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी , लोण्याचं तूप, तुपाची बेरी... 

बर्याच घरातील ही आजची पिढी या तूपाची बेरी खाण्याच्या आनंदाला... घरात तूप कढत असताना येणार्या दरवळाला मुकली आहे. आता या बेरीच्या वड्या, लाडू, केक सुध्दा बनविले जातात. आम्ही लहानपणी पातेले चमच्याने खरवडून खरवडून बेरी काढून त्यात साखर मिसळून खात असू. आजच तूप कढवले त्यावरून हे सर्व आठवले. आता मी तूप कढवले की बेरी काढून साखर मिसळून टेबलवर ठेवते व येता -जाता चमच्याने तोंडात टाकते. भांडायला भावंड नाहीत आता... प्रत्येकजण आपापल्या घरी! व आजच्या मुलांना है असले पदार्थ खायला आवडत नाहीत.

घरगुती शुध्द तूप कसे तयार केले जाते? खाली दिलेल्या लिंकवर वाचा.

http://swadanna.blogspot.in/2016/12/clarified-butter-ghee.html?m=1

27 September 2017

वाटली डाळ ( Vatali Daal)

No comments :

'वाटली डाळ ' यालाच कोणी 'मोकळी डाळ', 'खमंग डाळ' असेही म्हणतात. हा पारंपारिक पदार्थ आहे. मी फक्त कृतीमधे थोडा बदल केला आहे. जेणेकरून पट्कन व अधिक चविष्ट होईल यावर भर दिला. यामधे चण्याची डाळ असल्याने मुलांना खाण्यास पौष्टीक आहे. हा पदार्थ आपण जेवणात भाजीसारखा, दही घालून नाष्ट्याला, संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर,चहासोबत किंवा अगदी सहज स्नँक्स म्हणून येता -जाता वाटी चमच्यातून तोंडात टाकू शकतो. तसेच गणपती विसर्जनादिवशी प्रसादाला, नवरात्रि मधे देवीच्या प्रसादाला ही केला जातो. पारंपारिक पध्दतिने डाळ केल्यास थोडी जास्त वेळखाऊ प्रक्रिया होते म्हणून मी थोडी वेगळ्या पध्दतिने केली कशी ते पहा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* चणाडाळ २ वाट्या
* तेल १/४ (अर्धा) वाटी
* फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, हळद व कढीपत्ता
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हिरव्या मिरच्या ३ -४
* लसूण, आलं (ऐच्छीक)
* ओलं खोबरं, कोथिंबीर
* लिंबू

कृती :-
प्रथम डाळ स्वच्छ धुवून ३ -४ तास पाण्यात भिजत घालावी.

नंतर पाण्यातून उपसून काढावी व परत एक-दोनदा स्वच्छ धुवावी. १० मिनीटे एका चाळणीवर निथळत ठेवावी.

आता निथळलेली डाळ, जीरे, मीठ, साखर, आले-लसूण, मिरची सर्व एकत्र भरडसर वाटून घ्यावे.

नंतर हे सर्व तयार वाटण कुकरच्या डब्यामधे घालून वरून पाण्याचा शिपका मारून शिजायला लावावे. साधारण दोन शिट्ट्या काढाव्यात. (भाताप्रमाणे बाहेरच्या डब्यात पाणी घालून शिजवावे)

आता कुकरची वाफ जिरल्यावर शिजलेली डाळ ताटात काढावी व थोडी गार झाल्यावर हाताने मोकळी करावी किंवा गहू चाळण्याच्या चाळणी वर घासून घ्यावी.

आता मोकळी केलेली डाळ कढईत तेल गरम करून फोडणी करावी व त्यामधे घालावी. दोन-चार वेळा परतून एक वाफ काढा. झाली डाळ तयार.

आता तयार डाळीवर ओलं खोबरं कोथिंबीर व लिंबू घालून खायला द्यावी.

टिप्स :
* अशा पध्दतीने डाळ केल्याने डाळ फोडणी टाकल्यावर शिजेपर्यंत तळाला करपणयाची शक्यता रहात नाही. व्यवस्थित मऊ शिजून मोकळी रहाते. पारंपारिक पध्दतिने केली जाते त्यात मधे -मधे डाळीचे डिकळे रहातात व कच्ची रहाण्याची शक्यता असते व खाली लागू नये म्हणून तेलही जास्त लागते.

* वाटली डाळ प्रसादाला, नैवेद्याला करायची असल्यास लसूण आलं घालू नये. मात्र एरव्ही खायला करायची असल्यास जरूर घालावे, जास्त खमंग व चविष्ट लागते.

10 September 2017

साबुदाणा वडा (Sabudana vada)

No comments :

खास उपवासा दिवशी करण्यात येणारा "साबुदाणा वडा" सर्वपरिचित आहे. फक्त प्रत्येकाची करण्याची पध्दत किंवा साहित्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. मी ज्या पघ्दतीने करते त्याप्रमाणे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* साबुदाणा २ वाट्या
* उकङलेले बटाटे मोठे २
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/२ वाटी
* वरी तांदुळाचै पीठ १/२ वाटी
* मीठ चवीनुसार
* जीरे १ टीस्पून
* हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम आदले रात्री साबुदाणा स्वच्छ धुवून, साबुदाणा पाण्यात बुडेल इतके पाणी ठेवून भिजत घालावा.

दुसरे दिवशी सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने व्यवस्थित मोकळा करावा. त्यामधे उकडलेला बटाटा मोठ्या किसणीने किसून घालावा. गुठळ्या रहात नाहीत.

आता सांगितलेले सर्व साहित्य साबुदाणा, बटाट्यामधे घालून हाताने एकत्र मळून गोळा तयार करावा. आवश्यकता वाटल्यास दाण्याचे कूट थोडेसे वाढवू शकतो.

आता तेल गरम करायला ठेवावे व गरम होईपर्यंत तयार पीठाचे आपल्या आवडीच्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत व गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळावेत.

तयार खुसखूषीत वडे शेगदाण्याची उपवासाची चटणी किंवा खोबर्याच्या चटणीबरोबर खायला द्या.

टिप्स :
* आवडीनुसार लाल मिरचीपूड वापरू शकता परंतु वड्या रंग तांबूस काळपट येतो.
* ज्यांना उपवासाला कोथिंबीर चालत असेल, त्यांनी घातली तरी चालते.
* मेदू वड्याप्रमाणे मधे होल करून वड्यास आकार दिला तर पोटातून नीट तळले जातात.
*  वरी तांदुळ पीठामुळे वडे खूप क्रिस्पी होतात. साबुदाणा वड्याना विशिष्ट चिवटपणा येत नाही व तेलकट होत नाहीत.
* वडे तेलात सोडताना तेल चांगले गरम असावे. नंतर आंच मध्यम करावी.

तुम्हीही अशा पध्दतीने वडे करून बघा. नक्की आवडतील.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या