31 March 2017

साबुदाणा-बटाटा चकली ( Sabudana-batata Chakali)

No comments :

उन्हाळा म्हटले की महिला वर्गाची उन्हाळी कामे  वाळवणं म्हणजे सांङगे, पापड, कुरडई इ., मसाला, चटणी करण्याची लगबग चालू होते. आजकाल धावपळीचे आयुष्य झाल्याने व सर्व पदार्थ बाजारात रेडीमेड मिळत असल्याने असे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ घरी करण्याचे प्रमाण कमी झालेय. आरोग्याच्या तक्रारी मुळे लोक तेलकटही कमी खातात. तसेच वाळवणासाठी जागेचीही उपलब्धतता नसते. असे सर्व असले तरीही सणासुदीला नैवेद्याला ताटात, उपवासा दिवशी या पदार्थांची आठवण येतेच. तरीही या सर्व अडचणीवर मात करून आपण थोडे का होईना पण घरीच स्वता काही पदार्थ बनविले तर? अन् घरी बनविले की भरपूरही वाटते. तर उपवासाची साबुदाणा-बटाटा चकली कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* १ वाटी साबुदाणा
* बटाटे मध्यम आकाराचे -५ (शक्यतो चिकट नसणारे जुने बटाटे)
* ४-५ हिरव्या मिरच्या भरड वाटून 
* प्रत्येकी १ टीस्पून - जिरे, जिरे पूड
* चवीप्रमाणे मीठ
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम साबुदाणा रात्रीच धुवून, वर अर्धा इंच पाणी ठेवून भिजवावा. बटाटे उकडून ठेवावेत.

दुसरे दिवशी सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करावा व अर्धी वाटी पाणी घालून जाड बुडाच्या कढईत घालून पारदर्शक होईपर्यंत वाफवावे. अथवा(टीप-१)

नंतर त्यामधे बटाटे सोलून, मोठ्या किसणीने किसून घालावेत.तसेच मीठ,मिरची, जीरे सर्व घालून पीठ एकत्र मळावे.

आता तयार पीठाच्या उन्हात प्लास्टिक कागदावर  किवा ताटात, पीठ एका जाड पिशवीला लहान भोक पाडून त्यात भरावे व लहान आकाराच्या चकल्या घालाव्यात.

उन्हात ३-४ दिवस कडकडीत वाळू द्याव्यात. वाळल्या की हवाबंद डब्यात भरून ठेवा. गरजेनुसार काढून गरम तेलात तळाव्यात. छान कुरकूरीत लागतात.

टीप :
१) मळून तयार झालेला पीठाचा गोळा ओवनमधे २ मिनिट वाफवून घेतला तरी चालतो. ओवन नसेल तर जाड बुडाच्या कढईत तयार पीठ, तळाला चमचाभर पाणी घालून वाफवावे.

२) या चकल्या चकली पात्रातूनही पाडता येतात. परंतु थोड्या बारीक होतात व पिशवीने घालणेच्या तुलनेत कष्टप्रद होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

21 March 2017

मेयाेनिज (Meyonies)

No comments :

एखादा पदार्थ अचानक करायचा मनात येते. मात्र त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरातच उपलब्ध असेल असे नाही. बाजारात सर्व रेडीमेड मिळते पण आणायला वेळ नाही. मार्केट जवळ नाही. अशावेळी काय पर्याय?  तर घरीच बनवावे. अशा साहित्यापैकीाच "मेयाेनिज " नेहमी घरात असेलच असे नाही. कारण बर्गर, पिझ्झा असे पदार्थ आपण काही रोज करत नाही. तर आज बर्गर करण्याचा मुड होता. बर्गर पाव दोन दिवसापासून आणून ठेवला होता. मेयाेनिज सोडून बाकी सर्व साहित्य होते. मग काय गुगलवर मेयाेनिज च्या बर्याच वेगवेगळ्या रेसिपीचा शोध, अभ्यास झाला व घरीच "मेयाेनिज" तयार केले. मस्त बाहेरच्यासारखे हुबेहूब जमले. कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* फुलक्रीम दूध १/४ कप
* तेल 3/४ कप
* चिमुटभर मीठ
* मिरपूड १/४  टीस्पून
* मोहरी पूड १/२ टीस्पून
* व्हिनेगार १ते २ टीस्पून

कृती :-

प्रथम थंड दूध व तेल मिक्सर जारमधे घालावे. नंतर व्हिनेगार सोडून सर्व साहित्य घालावे. थोडे घुसळावे.

आता व्हिनेगार घालून परत एकदा फिरवावे. हलके -हलके फ्लपी दिसू लागले की 'मेयाेनिज' तयार झाले.

बर्गर, पिझ्झा, सैंडविच कशालाही लावून खावे. फ्रिजमधे आठ दिवस टीकते.

टीप:
* आपण व्हिनेगारला पर्याय म्हणून लिंबू वापरू शकतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

दुधीचे लाडू (Bottle Gourd Laddu)

No comments :

सहसा दुधीची भाजी  म्हटले की नाक मुरडले जाते. आवडीने खाल्ली जात नाही. परंतु दुधी प्रकृतीला थंड भाजी आहे. ह्रदयरोगासारख्या आहारात रूग्णाला दुधीचे सेवन करण्यास सांगितले जाते. अतिशय गुणी भाजी आहे. तर याच दुधीचे मस्त हिरवट पोपटी रंगाचे पौष्टीक लाडू केले तर खूप आवडीने खाल्ले जातात. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ताजा व  कोवळा दुधी मध्यम आकाराचा १
* साखर किसाच्या निम्मी
* वेलचीपूड
* डेडिकेटेड कोकोनट २-३ टेस्पून
* खरबूज बिया किंवा काजूचे तुकडे

कृती :-
प्रथम दुधी धुवून साल काढून घ्यावा. नंतर मधला पांढरा भाग काढून किसणीने किसून घ्यावा.

आता किस चाळणीवर पांच मिनिट ठेवावा व न दाबता सहज जेवढे पाणी निघून जाईल तेवढे जाऊ द्यावे.

आता नाँनस्टीक पँनमधे किस व साखर मिसळून मंद आचेवरच शिजायला ठेवावे. मधून मधून हलवत रहावे. साखर विरघळली की पाच मिनिट झाकून ठेवावे.

आता पांच मिनिटानंतर झाकण काढावे. किस मऊ झाला असेल. आता त्यात वेलचीपूड घालावी व शिल्लक असलेला पाक आटेपर्यत हलवत रहावे.

मिश्रणाचा ओलावा जाऊन गोळा व्हायला लागले की गँस बंद करावा. पँन खाली घेऊन त्यामधे डेडिकेटेड कोकोनट घालून एकजीव करावे. मिश्रण जर सैल वाटले तर अजून थोडे डेडिकेटेड कोकोनट घालावे.

आता मिश्रण हातात घेण्यासारखे  थंड झाले की,  वरून काजू तुकडा लावून लहान-लहान लाडू वळावेत.

मस्त हिरवट पोपटी अशा आकर्षक रंगाचे पौष्टीक लाडू तयार. वरून आवडत असेल तर चांदीचा वर्ख लावून सजवावे.

दिसायला आकर्षक असे हे लाडू दिसताच क्षणी तोंडात टाकले जातात. तसेच घरी कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा कोणाकडे जाताना न्यायला हे लाडू सोईचे होतात व चांगलेही दिसतात. तुम्हीही करून बघा, नक्की आवडतील.

टिप्स :
* डेडिकेटेड कोकोनट ऐवजी मिल्क पावङर घेतली तरी चालते. थोड़ी वेगळी चव येते.
* आवडत असेल तर हिरवा रंग गडद येण्यापुरते आकर्षक पणा साठी, दोन थेंब हिरवा लिक्विड फूड कलर मिसळावा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

20 March 2017

दाल पकवान (Dal Pakwan)

No comments :

'दाल पकवान' हा सिंधी बांधवांचा नाष्ट्याचा चविष्ट व पोटभरीचा पदार्थ आहे. सुट्टीच्या दिवशी वेगळे काय करायचे?  हा प्रश्न असतो. कारण रोजची पोळी-भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. सुट्टी म्हटले की काहीतरी वेगळे हवे असते. अशा वेळी मला नाष्टा व जेवण एकच म्हणजे "ब्रंच" हेवी नाष्टा करणे सोईचे वाटते. तर मी ही पाककृती केली. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
दाल
* चणाडाळ १ वाटी
* कांदा १+१
* कोथंबिर
* आलं-लसूण
* हिरवी मिरची २
* गरम मसाला १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद
* जीरे
* तेल २ टेस्पून
पकवान
* मैदा १ वाटी
* गव्हाचे पीठ १ वाटी
* रवा २ टेस्पून
* मीठ चिमूटभर
* ओवा पाव टीस्पून
* जीरे अर्धा टीस्पून
* तेल मोहन १ टेस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम चणाडाळ अर्धा ते एक तास भिजत घालावी.

आता मैदा, गव्हाचे पीठ व रवा एकत्र करून त्यामधे मीठ जीरे, ओवा व तेल घालून सारखे करावे. गरजेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळावा.

एक तासानंतर  डाळ थोडेच पाणी घालून कुकरला शिजायला लावावी. फक्त एक शिट्टी काढावी. दुसर्या शिट्टीला वाफ आत ठेवून गँस बंद करावा. डाळ जास्त गुळगूळीत मऊ शिजवू नये. डाळींब्या दिसाव्यात इतपतच शिजवावे.

आता डाळ शिजेपर्यंत कांदा, कोथंबिर, आलं-लसूण सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे.

आता कढईमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत. त्यामधे चिरलेला कांदा, आलं-लसूण, मिरची घालून परतावे. नंतर राहीलेले सर्व साहित्य घालावे. तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतावा. शेवटी शिजलेली डाळ घालावी व थोडेसे पाणी घालून पांच मिनिट झाकून शिजवावे. दाल तयार!

आता मळून तयार केलेल्या पीठाच्या मध्यम जाडीच्या मोठ्या पुर्या लाटाव्यात, त्यावर काटा चमच्याने टोचावे. म्हणजे फुगत नाहीत.

मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळून काढाव्यात.  गार झाल्यावर छान कडक होतात.

आता तयार डाळ बाऊलमधे घेऊन त्यावर कांदा व कोथंबिर घालावी. सोबत कडक पुर्या डिशमधे द्याव्यात. मस्त भरपेट नाष्टा होतो. नंतर एका मोठा ग्लास थंड मसाला ताक प्यावे. दुपारी जेवणाची भुकच रहात नाही. तुम्हीही करून पहा. नक्कीच आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 March 2017

बटाट्याचा उन्हाळी किस

No comments :

उन्हाळा चालू झाला की, उन सुध्दा कडकडीत तापत असते. घरातल्या महिला वर्गाची उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग चालू होते. कोणाच्या मदतीशिवाय एकट्यानेच होऊ शकणारे पदार्थ म्हणजे बटाट्याचा किस, चकल्या, सांडगी मिरच्या असे प्रकार आधी करून घ्यायचे. बाकीचे म्हणजे कुरडई, पापड, शेवया, सालपापड्याअसे मुलांच्या उन्हाळी सुट्टया चालू झाल्या की करायचे. म्हणजे मुलं ताटे आत-बाहेर कर, राखण कर अशी बरीच छोटी कामे करण्यास येऊ शकतात. या पदार्थामधेसुध्दा शेजारणी सोबत स्पर्धा असते बरं, तिच्यापेक्षा आपले पदार्थ कसे जास्तीत-जास्त सुबक व स्वच्छ रंगाचे होतील? यासाठी एकमेकींकडून किंवा एखाद्या अनुभवी महिलेकडून टीप्स देणे-घेणे चालू असते. त्यातील वस्तुच्या प्रमाणाची उजळणी केली जाते. एकंदरीतच हा सर्व हौसेचा व आवडीचा भाग आहे. तसे तर आजकाल सर्वच पदार्थ रेडीमेड मिळतात. पण असे वाळवणाचे पदार्थ करणे,म्हणजे सकाळपासूनच धांदल असते. रोजची कामे फटाफट उरकून मग या कामांच्या मागे लागयचे. करणे, वाळविणे मग संध्याकाळी घरात आणून थोडेफार कडेचे अर्धे ओले वाळलेले रात्रिच्या भाजीच्या फोडणी आधी कढईत तळून बघायचे, त्यावर घरातल्यासोबत चर्चा करायची की,यावर्षीचे कसे जास्त हलके व पांढरे स्वच्छ झालेत वगेरे वगेरे..! एकूणच घरच्या पदार्थाना तोड नाही. आजकाल जागेचा, वेळेचा सर्वच गोष्टीचा अभाव असतो. तरीही लहानपणी आईने केलेल्या पदार्थाची चव आठवली किंवा त्या वाळवणाच्याआठवणी शांत बसू देत नाहीत. मग काय थोडे -थोडेसेच व सोपे प्रकार मी बिल्डिंगच्या टेरेसवर वाळवून करतेच. तर असाच सोपा प्रकार म्हणजे उपवासाच्या चिवड्याचा "बटाट्याचा किस " पण यातसुध्दा बारकावे, ट्रिक्स आहेत बरं... कसा करायचा साहीत्य व कृती 👇

साहित्य :-
* नवे व कडक मोठे बटाटे ५ किलो
* सर्व बटाटे पाण्यात बुडतील इतके पाणी

कृती :-
प्रथम सर्व बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे व सर्व बटाटे त्यामधे घालावेत. वर ताट झाकून १० ते १५ मिनिट शिजू द्यावेत.

मधेच एकदा मोठ्या चमच्याने वर-खाली करावेत. बटाट्याची साल निघते का बघावे . साल निघत असेल तर गँस लगेच बंद करावा.

थोड्या वेळाने थंड झाल्यावर साल काढून घ्यावी व मोठ्या छिद्राच्या किसणीने आधीच उन्हात पसरलेल्या प्लास्टिक कागद अथवा साडीवर डायरेक्ट विरळ किसावे. कडकडीत उन्हात दोन दिवस वाळू द्यावा.

वाळलेला किस हवाबंद डब्यात भरून ठेवावा. वर्षभर रहातो. लागेल तसा काढून तेलात तळून मस्त खमंग चिवडा करावा.

टिप्स :
* बटाटे नवेच असावेत. जूने व मऊ पडलेले असल्यास किस काळा होतो.

* जास्त मऊ उकडू नयेत. साल निघण्याइतपतच उकडावेत. किस नीट पडतो.

* शक्य असल्यास बटाटे रात्रीच उकडून फ्रिजमधे ठेवावेत व सकाळी किस पाडावा.. किस मोकळा पडतो.

10 March 2017

बिस्कीट केक (Biscuit Cake)

No comments :
"बिस्कीट केक" झटपट होणारा व सहसा न बिघडणारा केकचा सोपा प्रकार आहे. यासाठी लागणारे साहित्य व कृती-
साहित्य :-
* पारले जी बिस्कीटे २० नग
* हाईड अँन्ड सिक बिस्कीटे १० नग
* पीठीसाखर २ टेस्पून
* दूध आवश्यकतेनुसार
* तूप ग्रीसिंगसाठी
कृती :-
प्रथम दोन्ही बिस्कीटे मिक्सरवर पावडर करून घ्यावी.
पावडर एका बाऊलमधे काढून घेऊन त्यामधे साखर मिसळावी.
नंतर त्यामधे कोमट दूध घालून ढवळावे. गुठळ्या राहू देउ नयेत.मिश्रण थोडे घटसरच ठेवावे. नाहीतर केक बसका होतो.
आता तयार मिश्रण ग्रीस केलेल्या केकच्या भांड्यात ओतावे व टँप करावे.
प्रीहीट ओवनला 180 ° सेल्सियसला २० मिनिटे ठेवावा. टूथपिक टोचून पहावे स्वच्छ बाहेर आली की केक झाला.
मस्त तयार स्पाँजी बिस्कीट केक  चहासोबत खा व खाऊ घाला.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

रवा केक (Sooji Cake)

No comments :

06 March 2017

बदाम-केशर थंडाई (Thandai)

No comments :

"थंडाई " हे उत्तर प्रदेश प्रांतातील पारंपारिक पेय आहे. होळी सणाचे दिवशी केले जाते. तसेच महाशिवरात्रिला शंकराला थंडाई मधे भांग मिसळून नैवेद्यही दाखवला जातो. शरीर, डोके थंड ठेवणारे व ताकद देणारे असे हे अमृततुल्य पेय आहे. उन्हाळ्यात अतिशय थंड असते. याने पित्ताचा विकार असेल तर नाहीस होतो. कोठ्यातील उष्णता कमी होते. डोळ्यांवर जळजळ कमी होते.उन्हाळी लागत नाही. उन्हात बाहेर पडायचे आधी एक ग्लास थंडाई पिऊन निघावे. गुणकारी पेय आहे. कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-

* फुलक्रीम दूध १ लिटर

* थंडाई मसाला (१ ग्लास - ३ टेस्पून) 

* रोज इसेन्स

* खस सिरप 

* खाण्याच्या गुलाब पाकळ्या 

* केशर, बदाम-पिस्ता काप 

* साखर ऐच्छीक (मसाल्यामधे असतेच)

*थंडाई मसाला कृती http://swadanna.blogspot.in/2017/03/thandai-masala.html?m=1


कृती :-

प्रथम तयार थंडाई मसाला एक ग्लास दूधाला
तीन चमचे या प्रकरणामधे घेऊन कपभर दूधात एक तास भिजत ठेवावा.

एक तासाने दूधासह मसाला मिक्सरमधे वाटून पेस्ट करून घ्यावी. जास्त गोडसर आवडत असेल तर आवडीनुसार आताच साखर घालावी.

आता तयार पेस्ट व रोज इसेन्सचे कांही थेंब फ्रिजकोल्ड दूधामधे मिसळावी. दूधामधे एकदा ब्लेडर फिरवावा व दूध गाळावे.

आता सर्व्हींगसाठी एक मोठा उभा ग्लास घ्यावा.   त्यात आधि चमचाभर खस सिरप घालावे. नंतर गाळून तयार असणारे दूध घालावे. वरून बदाम -पिस्ता काप, केशरकाड्या व सुक्या गुलाब पाकळ्या (बाजारात मिळतात)घालून सजवावे व थंडगार प्यायला द्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

थंडाई मसाला ( Thandai Masala)

No comments :

"थंडाई " हे उत्तर प्रदेश प्रांतातील पारंपारिक पेय आहे. होळी सणाचे दिवशी केले जाते. तसेच महाशिवरात्रिला शंकराला थंडाई मधे भांग मिसळून नैवेद्यही दाखवला जातो. शरीर, डोके थंड ठेवणारे व ताकद देणारे असे हे अमृततुल्य पेय आहे. उन्हाळ्यात अतिशय थंड असते. याने पित्ताचा विकार असेल तर नाहीस होतो. कोठ्यातील उष्णता कमी होते. डोळ्यांवर जळजळ कमी होते. गुणकारी पेय आहे. थंडाई योग्य पारंपारिक पध्दतिने बनविली तर अधिक गुणकारी ठरते. थंडाईसाठी लागणारे मसाला साहित्य ५-६ तास भिजत घालायचे म्हणजे रात्रीच पाण्यात भिजवायचे व सकाळी बदाम वगेरे सोलून घ्यायचे नंतर सर्व मसाला साहित्य पाट्या-वरवंट्यावर वाटायचे. जितके जास्त बारीक वाटले जाईल तेवढी थंडाई अधिक गुणकारी बनते. परंतु आजच्या धावपळीच्या व इन्स्टंट झटपटच्या जमान्यात हे सर्व शक्यही नाही. तर यावर उपाय म्हणून "थंडाई मसाला पावडर" तयार करून ली जाते व थंडाई करण्याच्या आधी अर्धा तास दूधामधे ही पावडर भिजत ठेवायची. अर्ध्या तासाने मिक्सरमधे वाटून पेस्ट तयार करून वापरली जाते. अनेक निरनिराळ्या कंपनीच्या "थंडाई मसाला पावडर" मार्केट मधे उपलब्ध आहेत. पण आपण घरीच खात्रीशीर सर्व सिलेक्टेड साहित्य वापरून तयार केलेल्या मसाल्याची चव काही न्यारीच असते. तर हा मसाला कसा तयार केला साहित्य व कृती-👇

* बदाम ५० ग्रँम (अर्धा कप)
* खसखस ३० ग्रँम (६ चमचे)
* खरबूज, काकडी उपलब्ध असणार्या बीया २० ग्रँ
* बडीशेप ५० ग्रँम (अर्धा कप)
* काळी मिरी ५ ग्रँम( ८-१०)
* देशी गुलाब सुक्या पाकळ्या २० ग्रँम(अर्धा कप)
* हिरवी वेलची ५-६ नग
* दालचिनी १ इंच
* खडीसाखर/ साखर १०० ग्रँम 
* चारोळी १० ग्रँम

कृती :-
प्रथम सर्व साहित्य दिलेल्या प्रमाणात एका डिशमधे काढून घ्यावे.

नंतर पँनमधे किंचित कोमट करून घ्यावे. यामुळे पावडर छान बारीक होते.

आता थंड झाल्यावर मिक्सरमधे सर्व साहित्याची एकत्र एकदम बारीक पावडर करावी व चाळून घ्यावी.

तयार "थंडाई मसाला पावडर " हवाबंद बाटलीमधे भरून ठेवावी. २ -३ महीने सहज टिकते.

टीप्स :-
*खडीसाखर उपलब्ध नसेल तर नेहमीचीच साखर वापरली तरी चालते.
* खरबूज, काकडी बिया उपलब्ध नसेल तर थोड काजू वापरावेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 March 2017

पनीर-मटर समोसा( Paneer-Matar Samosa)

No comments :
समोसा बर्याच वेगवेगळ्या चवीचा असतो. नुसत्या बटाट्याचे सारण असलेला, मिक्स भाज्यांचे सारण भरून तसेच वाटाण्याचे, कोबीचे, पनीरचे इत्यादि. आपल्या आवडीने सारण तयार करावे. परंतु कोणत्याही चवीचा समोसा असूदे वरचे कव्हर एकदम कडक, खुसखूषीत असेल तरच समोसा खायला मजा येते. समोसाच्या कृतीमधे महत्वाचा भाग कोणता असेल तर, तो म्हणजे वरचे कव्हर व तळाण्याची खुबी. या दोन गोष्टी परफेक्ट जमल्या  तर समोसा एकदम हाँटेल स्टाईलचा होतो. आज मी पनीर- मटारचा डिजाइनर समोसा केला. कसा केला साहित्य व कृती-
साहित्य:-
क्रिस्पी समोसा कव्हरसाठी
* मैदा २ कप
* मीठ  चवीनुसार
* ओवा पाव चमचा
* मोहन(पातळ केलेला डालडा किवा तूप ) पाव कप, 80ml
* थंड पाणी अर्धा कप
सारण साहित्य
* हिरवे मटार २ कप
* पनीर पाव कप
* खवलेले आेले खोबरे अर्धा कप
* मीठ
* लालमिरची पावडर
* हिरवी मिरची पेस्ट
* आलं-लसूण पेस्ट
* गरम मसाला
*  चाटमसाला
* आमचूर पावडर व वरील सर्व आपल्या चवीनूसार
* हिंग मोहरी फोडणीसाठी
* कोथिंबिर
* तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम मैद्यामधे ओवा, मीठ व गारच तूप घालून कोरडेच हाताने एकत्र करावे . ब्रेड चुर्र्या सारखे दिसते.  नंतर हळू हळू गार पाणी घालून एकदम घट्ट मळावे व २० मिनिटे झाकून ठेवावे.
आता कढईमधे १ टेस्पून तेल घालून हिंग-मोहरीची फोडणी करावी. त्यामधे आलं-लसूण  पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालावी. नंतर मटार व पनीर चुरून टाकून थोडे परतावे. मऊ झाले की, ओले खोबरे व साहित्यात दिलेला सर्व मसाला घालून एक वाफ आणावी. हे तयार सारण थंड होऊ द्यावे.
आता आधी मळून तयार केलेल्या मैद्याच्या लिंबाइतक्या आकाराच्या गोळ्या करा व लहान पातळ फुलका लाटावा. त्याचे चाकूने कापून मधून दोन भाग करावेत. एका अर्थ गोलावर चाकूने उभ्या रेषा मारा. त्या रेषा अर्धगोलाच्या शेवटपर्यंत नको. त्यावर दुसरा अर्धगोलाचा भाग ठेवावा व नेहमी प्रमाणे कडाना पाणी लावून कोन तयार करून सारण भरावे. असे सर्व समोसे लाटून तयार करून घ्यावेत.
नंतर पसरट कढईत तेल मध्यम आचेवर गरम करावे. एकावेळी ३-४ समोसे तेलात सोडून मंद, खरपूस तळावे.
खमंग खुसखूषीत तयार समोसा कोणत्याही चटणीसोबत किंवा साँस सोबत खायला द्यावा. चटणीशिवाय खाल्ला तरी छानच लागतो.
टिप:-
* समेासे कधीही एकदम गरम तापलेल्या तेलात तळू नयेत. वरून तळले जातात व आत कच्चे,  मऊ रहातात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.