31 October 2015
पालकाचे खारे शंकरपाळे ( Spinach Namkin)
गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो. आज मी थोडा बदल म्हणून 'पालकाचे खारे शंकरपाळे ' बनवले. तांबूस,पोपटी रंगाचे व खमंग खुसखूषीत असे शंकरपाळे छानच लागतात.
असे कुठे आहे की दरवर्षी दिवाळीला एकच प्रकारचे पारंपारीक पदार्थ बनवावेत यावर्षी पालक शंकरपाळे करून बघा. नक्की आवडतील तूम्हालापण. कसे केले बघा.
साहीत्य :
* मैदा २ वाट्या
* रवा १/४ वाटी
* पालक प्यूरी १/२ वाटी ( कमी-अधिक होऊ शकते)
* मोहन २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* ओवा १/४ टीस्पून
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* हींग चिमूटभर
* तिळ ऐच्छिक
* तळणीसाठी तेल
कृती :-
प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यात घ्या. त्यामधे रवा व वरील इतर सर्व कोरडे साहीत्य घालून नीट मिक्स करा.
आता मोहन घाला. परत मिश्रण हाताने नीट सगळीकडे चोळून घ्या .
आता शेवटी पालक प्यूरी अंदाज घेऊन बघत बघत मिश्रणात घालावी.पुरीच्या किवा नेहमी शंकरपाळ्या करतो,त्या कणकेप्रमाणे घट्ट कणिक मळावी. पंधरा मिनिट झाकून ठेवा.
पंधरा मिनिटानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. फार जाड अथवा पातळ नको.सुरीने अथवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे कापून गरम तेलात खरपूस तळा.
खुसखूषीत कलरफूल खारे शंकरपाळे तयार ! थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.केव्हाही नुसते किवा चहासोबत खा.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
19 October 2015
पोहा-छोले वडा (Vada)
रोज-रोज सारखे नविन काय करायचे ? संध्याकाळचे वेळी तर हा प्रश्न फार सतावतो. सर्वानाच चहा सोबत तसे हलके पण चटपटीत काहीतरी खायला हवे असते. आपल्याला सुध्दा हवे असते. आज दुपारच्या जेवणात छोले मसाला करण्यासाठी छोले उकडले होते. त्यातलेच वाटीभर काढून ठेवले व संध्याकाळी थोडे पोहे वगेरा इतर साहीत्य घालून वडे केले. छान झाले खुसखूषीत. कसे केले बघा साहीत्य व कृती...
साहीत्य :-
* भिजवून वाफवलेले छोले 1 वाटी
* भिजवलेले जाड पोहे 1 वाटी
* तादुळाची पिठी 2 टेस्पून
* कांदा बारीक चिरून ऐच्छिक
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट एक टीस्पून
* कोथंबिर बारीक चिरून
* मीठ चविनुसार
* गरम मसाला 1 टीस्पून
* आमचूर पाव टीस्पून
* हळद पूड
* तेल
कृती :-
प्रथम वाफलेले छोले व पोहे मिक्सरमधे भरड वाटून घ्या.
आता वाटलेल्या मिश्रणामधे वरील सर्व साहीत्य घाला व पाण्याचा हात घेउन सर्व मिश्रण एकजीव करा.
गरम तेलामधे, तयार मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटे गोळे करून खरपूस तळा.
मस्त खमंग खरपूस वडे हिरवी चटणी , साॅस सोबत खायला द्या.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
14 October 2015
बिन तूपाचे रवा लाडू ( Without ghee laddu)
सामान्यपणे गोड पदार्थ म्हणले की भरपूर तूप,साखर ,सुका मेवा असे सर्व वापरून केलेला पदार्थ डोळ्यासमोर येतो. पण आज मी तूपाचा एक थेंबही न वापरता पण पारंपारीक चवीचेच रवा लाडू बनविले .कसे व साहीत्य काय ते पहा .
साहीत्य:-
* रवा 1वाटी
* ओले खोबरं खवलेले 1 वाटी
* पीठीसाखर 1 वाटी
* दूध अर्धी वाटी
* वेलची पावडर
* ड्रायफ्रूट्स ऐच्छीक
कृती :-
प्रथम रवा एका कढईत कोरडाच गुलाबी रंगावर भाजा.
नंतर झाकणाच्या स्टीलच्या पसरट डब्यात काढा. त्यात ओलं खोबरं मिसळा. हाताने नीट एकजीव करा. शेवटी वरून दूध शिंपडा.जर ओल खोबरं एकदम दुधाळ व मऊ असेल तर दूध कमी करा व खोबरं सुकट जून असेल तर थोडे अधिक वापरा.
आता डब्याला झाकण लावून डबा प्रेशर कुकर मधे ठेवा. तीन-चार शिट्टया काढा. गॅस बंद करा . थोडा वेळ वाफ जिरू दे .
आता डबा बाहेर काढून मिश्रण गरम असतानाच त्यात पीठीसाखर व वेलचीपूड, सुका मेवा मिसळा. व परत एक तास झाकण लावून कडेला ठेवून द्या
एक तासा नंतर मिश्रण ताटात काढा ओल्या हाताने चांगले मळा म्हणजे गुठळी रहात नाही.व आपल्या आवडीच्या आकाराचे लाडू वळा. वळताना वर एकेक बेदाणा ,काजू लावा. मस्त दुधाळ चवीचे रवा लाडू तयार !
टीप ;- हे लाडू शक्यतो लवकरात लवकर संपवावेत.ओला नारळ आहे व तूप अजिबात नाही .तर खराब होऊ शकतात.
वर दिलेल्या साहीत्यात फोटोतिल आकारमानाचे दहा ते बारा लाडू होतात.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
13 October 2015
उपवासाची भाजाणी (Fasting Bhajani)
उपवासाची भाजाणी
साहीत्य :-
* शाबूदाणा 1 किलो
* वरी तांदुळ 1 किलो
* राजगिरा 500 ग्रॅम
* जीरे ऐक टेस्पून
कृती ;-
वरील तीनही पदार्थ वेगवेगळे गुलाबी रंगावर भाजून घ्या. शाबूदाणे भाजण्याआधी थोडे तूप चोळावे म्हणजे, भाजताना कढईला चिकटत नाही. फार तांबूस भाजू नये. कारण भाजणी काळपट होते.जीरे कच्चे घाला.
थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणा. किवा प्रमाण कमी असेल तर घरी मिक्सरवर होते.
तयार भाजणी चाळून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. दोन-तीन महिने आरामात टिकते.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
उपवासाचे डोसे ( Fasting Dosa)
उपवास म्हणले की नेहमीचीच शाबूदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. पण झटपट व वेगळे काय करावे ? घरात उपवासाची भाजाणी तयार असेल तर, डोसे केव्हाही काढता येतात. कसे करायचे पहा.
साहीत्य :-
* उपवासाची भाजणी पीठ 2 वाट्या
* ताक अर्धी वाटी
* मीठ चविनुसार
* जीरे अर्धा टीस्पून
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* पाणी गरजेनुसार
* तेल/ तूप
उपवास भाजणी http://swadanna.blogspot.in/2015/10/fasting-bhajani.html?m=0 येथे पहा.
कृती :-
प्रथम उपवासाची भाजणी एका बाऊलमधे घ्या.
त्यामधे मीठ, जीरे , मिरची घाला.एकत्र करा.
आता ताक घाला व शेवटी हलवत-हलवत बघून पाणी घाला. गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. भजीच्या पीठापेक्षाही पातळच ठेवावे.
आता तापलेल्या तव्यावर थोडे तेल /तूप सोडा व तवा फिरवत थोड्या उंचावरूनच डावाने पीठ ओता. एखादा मिनिट झाका. वाफ येईल. नंतर तूप सोडून दुसरी बाजू भाजा.दोन्ही बाजूनी खरपूस भाजा. गरम असतानाच खुसखूषीत डोसा चटणी, दहीसोबत खा.
डोसे, हॉटेलमधल्या रव्या डोश्यासारखे होतात. सोबत उपवासाची एखादी भाजी किंवा नारळ + मिरची + जिरे + दाणे + मीठ + लिंबू अशी चटणी घ्या.. किवा पीनट बटर पण चांगले लागते .
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
17 September 2015
स्ट्राॅबेरी बर्फी ( Strawberry Burfi)
स्ट्राॅबेरी म्हणले की मस्त लाल-गुलाबी रंग व रसाळ ,साधारण आंबटगोड चवीचे फळ डोळ्यासमोर येते. मात्र हे फळ हिवाळ्यातच येते. तसे आजकाल बाराही महीने सर्व मिळते. स्ट्राॅबेरी क्रश, जाम, विविध मिठाया तसेच आईसक्रीम, असे बरेच प्रकार बनवले जातात. आजकाल लहान मुलांची बरीच औषधे, खोकल्यावरच्या गोळ्या ...एकंदरीत त्याचा स्वाद व मोहक रंग सगळ्यांनाच आवडतो. तुम्हालाही आवडेल कशा करायच्या साहीत्य व कृती ...
साहीत्य ;-
* ओल्या नारळाचे खवलेले खोबरे 2 वाट्या
* साखर 1 1/2 (दीड) वाटी
* स्ट्राॅबेरी क्रश पाव ते अर्धी वाटी किवा जाम 2 टेस्पून
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* पिठी साखर 2 टेस्पून
* रोज किवा स्ट्राॅबेरी इसेन्स 5-6 थेंब
कृती :-
प्रथम जाड बुडाची कढई किवा नाॅनस्टीक पॅन घ्या. वर दिलेल्या साहीत्यापैकी पिठीसाखर व इसेंन्स सोडून बाकी सर्व साहीत्य एकत्र करा व मंद आचेवर शिजत ठेवा.
सतत ढवळत रहा.खाली लागण्याची शक्यता असते. करपले तर बर्फीचा रंग व चव बदलते. म्हणून काळजी घ्यावी.
आता पंधरा मिनिटांनी सर्व मिश्रण कढईपासून सुटायला लागेल. मिश्रण आळून येईल. तर आता शेवटी पिठीसाखर व इसेंन्स घालून, गॅस बंद करून चांगले घोटा. कोणत्याही वडीचे मिश्रण जितके जास्त घोटाल, तितके बर्फी चिकट न होता खुटखुटीत होते व लवकर सुकते.
नंतर मिश्रण ताटात घाला व प्लॅस्टीक शिट किवा पिशवी त्यावर घालून हाताने व्यवस्थित थापा. थोडे थंड झाले की सुरीने रेषा पाडून ठेवा.
अर्धा तासाने पुर्ण थंड होईल, मग वड्या काढा व डब्यात ठेवा.
खुप छान गुलाबी लाल रंग येतो व आकर्षक दिसतात. तसेच चवीला पण उत्कृष्टच लागतात.
15 September 2015
कच्चे केळ, बटाटा उपवास थालिपिठ
उपवास आहे म्हटले की, नेमके काही खमंग असे खावे खावे वाटते. त्यातूनही तेलकट नको असे वाटत असते . खिचडी नेहमीच होते .फळांचा कंटाळा येतो. दूध आवडत नाही. मग खायचे काय ? हे सात्विक थालीपिठ करून बघा. उपवास रोजच करावा वाटेल ! कसे करायचे पहा.
साहीत्य :-
* कच्चे केळ 2 नग
* बटाटा 1 मध्यम
* भिजलेला शाबूदाणा 1 वाटी (ऐच्छिक)
* राजगिरा पिठ 1 वाटी
* शिंगाडा पिठ अर्धी वाटी
* भाजक्या शेंगदाण्याचे कूट पाव वाटी
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* जीरे एक टीस्पून
* भाजण्यासाठी तेल/तूप
कृती:-
प्रथम कच्चे केळ व बटाटा उकडून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढून खिसून घ्यावे.
खिसलेल्या लगद्यामधे वर दिलेले सर्व साहीत्य घाला.गरज वाटल्यास राजगिरा व शिगाड्याचे पिठ कमी-जास्त करा व हातानेच नीट एकजीव करून गोळा तयार करा.
तयार पिठाचा साधारण मध्यम आकाराच्या पेरू इतका गोळा घ्या व नाॅनस्टीक तव्यावर हाताने थापून घ्या. तेल/तूप सोडून उलट-सुलट खरपूस भाजून घ्या.
मस्त घट्ट दही किवा हिरवी मिरची भाजून दह्यात चुरडून टाका व चवीला मीठ घाला. मिरचीचा चटका तयार ! खा आरामात.
टीप :- बटाटा न घेता नुसते केळच वापरून केले तर जास्तच चांगले. केळात बटाट्यासारखे फॅट्स नसतात.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
14 September 2015
उकडीचे मोदक बनवताना कोणती खबरदारी घ्याल ?
मोदक, म्हटले की गणपती बाप्पा ! असे समिकरणच आहे.त्यातही उकडीचे मोदक बाप्पाला फार आवडतात. 'उकडीचे मोदक' करणे म्हणजे कौशल्याचे काम मानले जाते. बर्याच गृहीणी 'उकडीचे मोदक' म्हटले की,करायला घाबरतात. जमेल का नाही आपल्याला असे वाटते. परंतु योग्य प्रमाणात सर्व साहीत्य घेतले व पुढील टीप्स लक्षात ठेवल्या तर उकडीचे मोदक बनवविणे अजिबात अवघड नाही.
* मोदकासाठी पिठी तयार करताना तांदुळ, शक्यतो सुवासिक म्हणजे बासमती , आंबेमोहोर व तोही नवा घ्यावा . त्यामुळे उकडीला चिकटपणा चांगला येतो व मोदकाला मुखर्या(चुण्या) पाडणे सोपे जाते. तसेच चवही छान येते. आजकाल बाजारात तयार पिठी मिळते , खात्रीच्या ठिकाणाहून व तपासूनच घ्यावी.
* सर्वात आधी म्हणजे उकड व्यवस्थित वाफली पाहीजे अन्यथा मोदक तुडतूडीत न बनता चिकट होतात.
* आतल्या सारणासाठी नारळ फार जुना, बिन पाण्याचा वापरू नये. त्यामुळे सारण लुसलुशीत न होता, कोरडे व भरभरीत होते.
* नारळ नेहमी खवणीनेच खवून घ्यावा. म्हणजे पाठीचा काळा भाग न येता, स्वच्छ पांढरा चव मिळतो. तुकडे करून मिक्सर मधून काढू नयेत. नाहीतर मोदकसुध्दा काळपट रंगाचे होतात.
* सारणासाठी वापरावयाचा गुळ, पिवळसर केशरी व गोड असावा .खारट नको.
*सारण ओलसर व रवाळ असावे. फार घट्ट किवा कोरडे नसावे. शिजवताना खबरदारी घ्या. तरच वरची पारी व सारण एकमेकांत मिसळून छान चव येते.
* सारण आदले दिवशीच निगुतीने करून फ्रिजमध्ये ठेवावे. दुसरे दिवशी रूम टेंपरेचरला आणून वापरावे. घाई-गडबड वाचेल.
* मोदक तयार करताना उकड गरम असावी . तर छान आकार देता येतो. करताना फाटत नाहीत. यासाठी उकडीचे भांडे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यातच ठेवा.
* उकडीसाठी तेल, तूप , लोणी काहीही चालते. परंतू लोणी वापरले तर , उकड एकदम मऊ, लुसलूशीत होते व मोदक खायलाही मोठे चविष्ट लागतात.घरगुती पांढरे लोणी वापरा.
* मोदक तयार करताना त्याच्या कळ्या पाडणेचे काम कौशल्याचे आहे. त्यासाठी उकड गरम असतानाच तेल व पाण्याचा हात लावून चांगली भरपूर मळून घ्यावि.मुखर्या छान धारदार पाडता येतात . हातावर पारी करून जमत नसेल तर पारी लाटून घ्या.
* पारी कडेने पातळ व मधे थोडी जाडसर ठेवावी. खालून फाटत नाहीत.
* मोदक उकडताना मोदक पात्रात किवा चाळणीवर केळीचे/करदळीचे पान किंवा बटर पेपर तळाला घाला. मलमलचे स्वच्छ ओले कापडसुध्दा चालते. काहीच नसेल तर चाळणीला तेल/ तूप चोळा .
* मोदक उकडायला ठेवताना आधि पाण्यात बुडवून काढा व ठेवा. वाफताना तडकून फुटत नाहीत.
* तयार झाल्यावर काढताना प्रथम गार पाणी शिंपडावे व ओल्या हाताने अलगद उचलावेत. खाली चिकटून फाटणार नाहीत.
आता इतके त्याचे नखरे संभाळून केलेले 'उकडीचे मोदक' बाप्पाला का नाही आवडणार ? नक्कीच आवडतील. व तुम्हाला पण आवडतील ! ते कसे करायचे , साहीत्य व कृतीसाठी पुढे दिलेल्या लिकवर क्लिक करा.
04 September 2015
शेवयाची खीर ( Sevai Kheer )
शेवयाची खीर सर्वाच्याच परिचयाची आहे. ऐत्यावेळी कोण पाहुणा आला किवा नैवेद्याला पट्कन आपण करतो. पण त्यातसुध्दा प्रत्येकाची करण्याची पध्दत निरनिराळी असते. तसेच बरेचवेळा कोणाची पातळ ,अगदी शेवया तळाला व दुध वर असे होते. तर कधी उकडलेल्या शेवयाच जास्त, दूध कमी.इतके की शेवयाचा शिराच खातोय असे वाटते. पण खीर अशी असावी की, ती जास्त घट्ट नको,जास्त पातळ नको रूबरूबीत असावी. कशी करायची पहा.
साहीत्य :-
* बारीक बिना पाॅलिशच्या शेवया 1/2 वाटी
* दूध 1/2 लिटर
* साखर 1/4 वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* पाणी अर्धी वाटी
* तूप 1टेस्पून
* वेलची पूड
* ड्राय फ्रूट्स ऐच्छीक
कृती :-
प्रथम दूध उकळण्यास एका गॅसवर ठेवून द्या.
तोपर्यंत एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून शेवया चांगल्या तांबूस गुलाबी परतवून घ्या.
नंतर त्यामधे गरम पाणी अर्धी वाटी घाला व शेवया चांगल्या शिजून मऊ होऊ देत.
आता दूध उकळून घट्ट झाले का ते बघा. नसेल तर अजून चांगले उकळून आटू दे.मलईसह राहू दे.मलई काढू नका.
आता हे आटीव दूध आधि शिजवून ठेवलेल्या शेवयांमधे घाला. नंतर शेवयासह पाच मिनिट सर्व उकळू दे.
आता गॅस बंद करून साखर, वेलचीपूड ,ड्रायफ्रूट्स घाला.
खायला देताना वरून लोणकढी तूप टाकून गरम असतानाच द्या. नुसती खा किवा पोळी/पुरी सोबत खा . छानच लागते.
टीप :- घरामधे बरेचवेळा पेढे शिल्लक असतात. असतील तर कोणत्याही खीरीमधे एखादा पेढा चुरडून टाका.अजून छान रुबरुबीतपणा येतो.
पौष्टिक सलाद (Healthy Salad )
नेहमीच आहारात कच्या भाज्या, मोड आलेली कडधान्य असावीत असे म्हणतात .पण या धकाधकीत कुठे सगळे रोज करणे व खाणे जमते ? तर हे सर्व व झटपट कसे करून पोटात जाईल ते बघा .
साहीत्य :-
* मूग मोड आलेले
* पातीचा कांदा
* कोबी
* टमाटा
* बीट
* एखादी बारीक चिरून हिरवी मिरची
* कोथिबिर
* लिंबू
* मीठ
* चाट मसाला
कृती :-
वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून , बारीक चिरून घ्याव्यात.
एका बाऊलमधे चिरलेले सर्व साहीत्य व मूग घ्या .त्यावर मीठ, लिंबू, चाट मसाला घाला व हलवा.शक्यतो ऐत्यावेळी मीठ लिंबू मसाला घाला.
जेवताना घ्या किवा आधीच जरी भुक लागल्यावर डिश मधे घेऊन खा किवा सकाळच्या नाष्ट्यात घ्या. यावरच संध्याकाळचे वेळी थोडा चिवडा किवा बारीक शेव घालून मुलांना दिले तरी भेळेसारखेपण होते.
भाज्या घरात असतातच .फक्त हिरवे मूग दोन-तीन दिवसातून मोड आणून ठेवा फ्रिजमधे ! केव्हाही खाता येते व पौष्टीक होते.
ज्या काही उपलब्ध असतील त्या भाज्या आपल्या आवडीच्या प्रमाणात घ्या. फक्त घेताना शक्यतो रोज आलटून पालटून भाज्या घ्या. म्हणजे एक दिवस कोबी तर उद्या त्याजागी काकडी, टोमॅटो आज तर उद्या गाजर, कांदापात/ पालक , लेट्यूस सिमला एकूण काय तर थोडी रंगसंगती व सर्वच आलटून पालटून पोटात जाईल इकडे थोडे लक्ष द्या.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
शाही लाडू (Shahi Laddu)
याच्या नावातच शाहीपण असलेने यात सर्व शाहीच वस्तू वापरल्या आहेत. सामान्यपणे नुसते ड्रायफ्रूट्स काही रोज आपल्या आहारात खाल्ले जात नाहीत. मुलं तर अजिबात खात नाहीत. फक्त बेदाणे मनुके इतकेच वेचून खातात . तर मग काजू, बदाम,अक्रोड,पिस्ते इ.असे सर्वच ड्रायफ्रूट कसे पोटात जातील ? मुलांच्या व आपल्यापण ! तसेच नैवेद्याला व उपवासालापण चालतात. पुढे सांगितल्या प्रमाणे लाडू करून ठेवा. एकदम सोपे व पौष्टीक असेआहेत. रोज एक जरी खाल्ला तरी पुरेसे आहे.
साहीत्य :-
* काजू
* बदाम
* अक्रोड
* पिस्ता सर्व प्रत्येकी एक वाटी
* खारीक पूड 1 वाटी
* काळा अरेबियन खजूर10-15 बिया
* सुके अंजिर 10-15 नग
* बेदाणे 1 वाटी
* मनुका 1 वाटी
* खसखस भाजून 2 टीस्पून
* वेलचीपूड
* जायफळ अर्धे पुड करून
* चांदीचा वर्ख ऐच्छिक
कृती :-
प्रथम सर्व सुकामेवा एका प्लेटमधे वेगवेगळा काढावा .बेदाणे ,मनुक्याच्या असतील तर देठ, खजुराच्या बिया असे सर्व काढून साफ करून घ्या.अंजिराचे तुकडे करा.अक्रोड फोडून घ्या.
आता मिक्सरमधे आधीकाजू, बदाम, पिस्ते, अक्रोड यांची भरड करून घ्या. बाजूला काढून ठेवा.
आता अंजिर,मनुका व बेदाणे मिक्सरमधे घालून वाटा. लगदा तयार होईल.
आता या लगद्यात आधिची भरड व खारिक पावडर मिसळा. खसखस, वेलची,जायफळ पुड घाला व व्यवस्थित हाताने किवा मिक्सरमधेच थोडे फिरवून एकजीव करा. मिश्रण कोरडे वाटले तर थोडे शुध्द तूप घालू शकता.अन्यथा नकोच.
आता तयार मिश्रणाचे लहान-लहान लिंबाच्या आकाराचे लाडू बनवा. शोभेसाठी वरून चांदीचा वर्ख लावा. नाही लावला तरी चालतो.
हवाबंद डब्यात भरून ठेवा.बरेच दिवस टिकतात.
टीप :- सुकामेवा आवडीनुसार कोणताही कमी-अधिक करू शकता. फक्त सुकामेव्याची व खारकेची मिळून भरड, ही तयार लगद्याच्या दुप्पट असावी. तर लाडू वळता येतात.
यामधे आवडत असेल तर डींक पण तुपात तळून घातला तर पौष्टीकपणा अजून वाढतो.
पडवळचे भरीत (Snake Gourd Rayata)
पडवळ ही एक वेल वर्गीय फळ भाजी आहे. बहुतेक सर्वांच्या परिचयाची आहे. पडवळ हे ह्रदयासाठी उत्तम टाँनिक आहे. कमी कँलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी सुध्दा खातात. पडवळाची पाने, रस व बियासुध्दा विविध तक्रारीवर उपयुक्त आहेत. सामान्यपणे आपण पडवळाची भाजीच करणे पसंत करतो पण, भरीत म्हणजेच रायते सुध्दा रूचकर लागते. पडवळाचे भरीत हा एक पारंपरिक पदार्थ आहे. कसा केला साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* पडवळ पाव किलो
* ताजे दही अर्धी वाटी
* चविनुसार मीठ व साखर
* फोडणीसाठी तेल व फोडणी साहीत्य
* हिरवी मिरची एखादी
* कोथंबिर
कृती :-
सर्वात आधि पडवळ स्वच्छ धुवून, चिरून त्याच्या मधील गर व बिया काढून टाका. (बियांची वेगळी चटणी होउ शकते) मोठे -मोठे एक एक इंचाचे तुकडे करून घ्या.
केलेली तुकडे कुकरमधे वाफवून घ्या. शक्यतो डाळ -भाताच्या कुकर सोबत वेगळ्या डब्यात वाफवले तरी चालते .
वाफवलेले तुकडे थंड झाल्यावर हाताने कुस्करावेत व त्यामधे दही, मीठ, साखर घालावे.
आता कढल्यात तेल गरम करून हींग, जिरे, मोहरी व थोड़ी हळद घालून फोडणी करा. फोडणीमधेच मिरचीचे तुकडे घाला. फोडणी थंड होऊ दे.
आता थंड झालेली फोडणी तयार भरीतावर घालावी. वरून बारीक चिरलेली कोथंबिर घालून सर्व एकत्रित व्यवस्थित हलवा.
चटकदार तयार भरीत जेवणात डाव्या बाजूला वाढावे. जेवणाची लज्जत वाढवते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
भरली सिमला मिरची (Stuffed Simala )
सिमला मिरची सर्वाच्या परीचयाची भाजी आहे. यालाच कोणी ढब्बू मिरची तर कोण ढोबळी मिरची पण म्हणतात. ही मिरची हाताशी असेल तर पट्कन कशातही म्हणजे मसाले भात ,पोहे, इ. मधे घालता येते. एक विशिष्ठ चव असते. ती सर्वानाच आवडते. सिमला मिरचीची तीन-चार प्रकारे भाजी बनविता येते. पण कोणत्याही भाजीचा,'मसाला भरलेला प्रकार सर्वाना जास्तच आवडतो. तर आज, "भरलेली सिमला" करू आपण
साहीत्य :-
* लहान आकाराची सिमला 1/4 किलो
* चणा डाळीचे पीठ पाव वाटी
* सुक खोबरे पाव वाटी
* ओले खोबरे पाव वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी
* भाजलेले तिळ एक टेस्पून
* गोडा मसाला 2 टीस्पून
* लाल मिरची पावडर 2 टीस्पून
* हळद
* मीठ चवीनुसार
* चवीला किचित साखर/गुळ
* फोडणी साहीत्य हिंग,जीरे,मोहरी
* तेल
* कोथिंबीर
* कांदा एक मोठा बारीक चिरून
कृती :
प्रथम मिरची धुवून पुसून अर्धे देठ कापून पोटात उभे चिरून घ्या. आरपार चिरू नका. पोटात मसाला भरता आला पाहीजे.
डाळीचे पीठ किंचित भाजून घ्या.कच्चेपणा जाण्यापुरतेच. सुके खोबरेही थोडे परता. एका डिशमधे काढा.
आता थंड झाल्यावर त्यामधे राहीलेले सर्व साहीत्य दाण्याचे कूट,ओले खोबरे,तिळकूट व मसाला, तिखट, मीठ, साखर सर्व घाला.हाताने नीट एकजीव करा.
नंतर चिरून ठेवलेल्या मिरची मधे मसाला भरून घ्या.
आता तेल गरम करून हिंग मोहरी फोडणी करा. त्यात कांदा गुलाबी परता. त्यावर भरलेल्या मिरच्या घाला व अलगद परता . वर ताटली झाकून त्यात पाणी घाला व वाफेवर शिजवा भाजी .दहा मिनिटात छान वाफ येते व शिजते . मधे एक-दोनदा हलवा. गॅस बंद करा. वरून कोथंबिर घाला.
तयार भाजी ,भाकरी किवा पोळीसोबत वाढा. अतिशय रूचकर लागते.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
डाळ,मेथी वडा (Dal, Methi Vada)
२) धुवून बारीक चिरलेली मेथी एक वाटी
३) कांदा बारीक चिरून एक नग
४) कसुरी मेथी एक टीस्पून
५) हिरवी मिरची ,आले ,लसूण पेस्ट
६) मीठ चवीनुसार
७) धना-जीरा पावडर एक टिस्पून
८) हळद ,हिंग
९) तेल टाळण्यासाठी
02 September 2015
फराळी रोल (Fasting Roll)
याचे नांव "फराळी रोल" असे असले तरी हे फक्त उपवास असेल तरच करावे व खावे असे नाही. आपण इतर वेळी सुध्दा करू शकतो .. संध्याकाळचे वेळी खाण्यासाठी किंवा कोणी येणार असेल तर चहा सोबत देण्यासाठी. उपवास आहे म्हणले की नेहमीचीच तीच ती खिचडी खाउन कंटाळा येतो . काही नवीन चटपटीत बरे वाटते जिभेला . तर असे हे खमंग व झट्पट रोल कसे करायचे बघू !
साहित्य :-
१ ) कच्चे बटाटे साल काढून किसून २ नग
२ ) राजगिरा पीठ ४ टेस्पून
३ ) शिंगाडा पीठ २ टेस्पून
४ ) भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २ टेस्पून
५ ) मीठ व लाल तिखट / ही. मिरची चवीनुसार ६ ) जिर पूड १ टिस्पून
७ ) तेल तळणी साठी
कृति
प्रथम किसलेला बटाटा एका बाऊल मधे घ्यावा .
नंतर त्या मधे वरील सर्व साहित्य घालावे व हाताने नीट एकजीव करावे . दहा मि. ठेवा ..
आत मिश्रणाचे लहान लहान गोळे घ्यावेत व हाताने त्याचे साधारण लांबट गोल रोल तयार करून राजगिरा पिठात घोळवा .
नंतर गरम तेलात तांबूस रंगावर तळून टीश्यु पेपर वर काढा .
हिरव्या चटणी सोबत किंवा दह्यात थोडे शेंगदाण्याचे कूट ,लाल तिखट व मीठ घालून एकत्र करा . उपवासाची चटणी तयार करा . रोल सोबत द्या .
आणी जर उपवास नसेल तर टोमॅटो सॉस पण देऊ शकतो .
टिप्स :- बटाट्याच्या ऐवजी साबूदाणा जर भिजलेला तयार असेल तरी तोही वापरू शकतो .
29 August 2015
नारळी भात (Sweet Rice)
आमच्याकडे श्राावण महिन्यातल्या प्रत्येक सणाचे सणाचे पक्वान्न ठरलेले आहे. जसे की ,पंचमीला कानोले , सोमवार सोडण्यासाठी सांजा पोळी ,निरनिराळ्या खिरी,, गणपती उकडिचे मोदक तसेच राखी पोर्णिमा म्हणले की , "गोड नारळीभात " झालाच पहिजे. असा हा पारम्पारिक भात कसा केला जातो पहा !
साहित्य :-
१) बासमती तांदूळ १ वाटी
२) साखर किंवा गुळ १ वाटी
३) ओले खवलेले खोबरे १ १/२ वाटी
४) तूप पाव वाटी
५) फोडणी साठी लवंगा ४- ५
६) वेलची पूड व ड्रायफ्रूट्स आवडिनुसार
७) पाणी २ वाट्या
कृती :-
तांदूळ धुवून १५ मिनट ठेवावे .तोपर्यत गॅस वर पाणी गरम करण्यास ठेवावे .
नंतर गॅस वर पातेल्यात तूप घालून त्यात लवंगा टाका .आता त्यावर तांदूळ टाकून परता.
नंतर गरम पाणी घालून भात शिजत राहू दे . पूर्ण शिजणेच्या आधी शेवटी भातात खोबरे ,साखर व वेलची पूड ,ड्रायफ्रूट्स घालून नीट हलवा .एक वाफ येऊ दे.
पांच मिनिटांनी गॅस बंद करावा व वरून कडेने थोडे तूप सोडावे..म्हणजे चिकट होत नाही भात .
आता वाटिला आतून तुपाचा हात लावून काजू बदमाचे काप घाला व भात भरून मुद पडावि व वरून साजूक तुपाची धार सोडून गरमागरम गोड नारळी भात भाऊरायाला खायला द्या .
टिप :- ४-५ वाट्यापर्यत करायचा असेल तर अशा पध्दतीने झट्पट केला तर चालतो .जास्त मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर भात आधी शिजवुन घ्यावा व नंतर सखरेच्या पाकात टाकून करावा.
शक्यतो गुळच वापरावा .रंग पण छान केशरी येतो व आरोग्याला पण चांगला. साखर घातली तर चिमुटभर खाद्यरंग वापरा .
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.